Monday, January 28, 2013

बुद्धी व तर्कापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती महत्त्वाची

योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्माडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विश्वातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळय़ांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळय़ा, अज्ञानी प्रकृतीच्या, निसर्गाच्या गर्भातून गुप्तपणे त्या प्रकृतीच्या विकासाला आधार देत राहिले. सृष्टीचा विकास धडपडत, चाचपडत झाल्यासारखा दिसतो. कारण बाह्यत: हा जड, अचेतन ऊर्जेचा, पदार्थाचाच प्रवास आहे आणि तरीही त्या प्रवासाला एक दिशा दिसते, कारण त्या दिशेकडे प्रकृतीला पडद्याआडून घेऊन चालणारे चैतन्यही तिच्याच उदरात आहे. हा सर्व प्रवास जडातून चैतन्याकडे, असंवेदनेकडून संवेदनेकडे, अनेकत्वातून एकत्वाकडे, विसंगतीतून सुसंगतीकडे, निम्न पातळीवरून उच्च पातळीकडे म्हणजे सच्चिदानंदाकडे वाटचाल करीत आहे. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या काव्यातून अशीच मागणी केली आहे. 'हे प्रार्थना गुरुदेवसे यह स्वर्गसम संसार हो अतिउच्चतम जीवन रहे, परमार्थमय व्यवहार हो' ज्ञानदेवांच्या पसायदानातदेखील अशाच आशयाची प्रार्थना आढळून येते. भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातला मौलिक भेद असा आहे की, तार्किक बुद्धीपेक्षा वेगळय़ा पातळीवरील जाणिवेच्या प्रत्यक्ष अनुभूतीला भारतीय आध्यात्मिक दर्शनांनी मोलाचे स्थान दिले. सांख्य, जैन, बौद्ध, वेदांती, अद्वैतवादी अथवा द्वैतवादी अशा सर्वच दार्शनिकांनी केवळ बुद्धीचा कस लावून तार्किक निष्कर्ष काढण्यावर भर न देता स्वत: ध्यानधारणेच्या, योगसाधनेच्या वेगवेगळय़ा पद्धतींचा अवलंब करून आपल्या जाणिवेला एकाग्रतेने उच्चतर पातळय़ांवर केंद्रित करून जी अनुभूती त्यांना झाली, तिचे वर्णन बुद्धीच्या पातळीवर तात्त्विक मांडणीद्वारे शक्य होईल तितके केलेले आहे. बुद्ध, महावीर, कृष्ण, शंकर (आचार्य), गोरख, कबीर, नामदेव, तुकाराम ही नावे भारतीयांसाठी फक्त फिलॉसॉफर्स किंवा कवी म्हणून वंदनीय नाहीत, तर आपापल्या जीवनात खडतर तपस्येतून त्यांनी 'अ-लौकिक'असे काही अनुभवले व बाह्य विश्वात प्रसारित केले, त्यामुळे ते पूजनीय ठरले आहेत.पाश्चात्त्यांचा भर ग्रीक तत्त्वज्ञांच्या प्राचीन काळापासून बुद्धी व तार्किक विचारांवर राहिला आहे. बुद्धी कितीही सूक्ष्म, तरल व उत्तुंग झेप घेणारी असली तरी तिच्या प्राकृतिक मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक पाश्चात्त्य तत्त्वज्ञ अखेरीस अ™ोयवादाचा आश्रय घेतात. बुद्धीच्या पातळीपेक्षा वेगळा अनुभव जाणिवेत आला तरी, त्या अनुभवाला दुय्यम स्थान देऊन तार्किक बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहण्याकडेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञांचा कल असतो. भारतीय दार्शनिकांनी मात्र अनुभूतीपेक्षा दुय्यम स्थान तार्किक बुद्धीला दिले. श्री. अरविंदांचे बालपणापासून सर्व शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. भारतातील बुरसटलेल्या धार्मिक वातावरणापासून व परंपरांपासून त्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशानेच त्यांच्या वडिलांनी त्यांची बालपणीच इंग्लंडला रवानगी केली. त्यांनी चुकूनही भारतीय संस्कृतीच्या संपर्कात येऊ नये, याचीही दक्षता घेतली. त्यामुळे इंग्लंडच्या वास्तव्यात श्री. अरविंदांनी केवळ पाश्चात्य तत्त्वज्ञान, साहित्य व संस्कृतीचा अभ्यास केला. इंग्लंडमध्येच ते आयसीएसची परीक्षा इतर सर्व विषयांत उत्तीर्ण झाले. परंतु सरकारी नोकरीचा तिटकारा असल्यामुळे मुद्दाम अश्वारोहणाच्या परीक्षेकडे फिरकले नाहीत. सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात देऊ केलेली नोकरी स्वीकारून श्री. अरविंद तरुणपणी जेव्हा भारतात परतले, तेव्हा भारताच्या किनार्‍यावरच त्यांना प्रथम एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती मिळाली. पुढे स्वातंर्त्य चळवळीतील मतवादी गटाकडे खेचून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. एका बॉम्ब प्रकरणात अटक होऊन वर्षभर त्यांना तुरुंगवास घडला. त्या काळातच त्यांना सातत्याने अनेक आध्यात्मिक अनुभव येत गेले व त्यांची योग साधना अधिक वेगवान झाली. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी निवडक सहकार्‍यांसह पॉंडिचेरी (पुदुच्चेरी) येथेच कायमचे वास्तव्य केले व तीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी तिथे एकांतात साधना केली. पॉंडिचेरी येथील वास्तव्यात श्री. अरविंदांनी स्थापन केलेल्या आश्रमाची सूत्रे त्यांच्या पट्टशिष्या मूळ फ्रेंच नागरिक असलेल्या माताजींनी सांभाळली. त्या आश्रम जीवनात त्यांनी शेती, उद्योग, शिक्षण, व्यायाम, संगीत व कलाक्षेत्रात विविध अभिनव प्रयोग केले. जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्यांनी आध्यात्मिक साधनेसाठी वज्र्य वा त्याज्य मानले नाही. म्हणूनच या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा आवाका प्रचंड मोठा वाटतो. कोणत्याही संकुचित धर्म, संप्रदायवादी, वर्ण, जातिवादी, वंशवादी अथवा राष्ट्रवादी भूमिकेस त्यांच्या अध्यात्मात मुळीच स्थान नाही. तसेच एखादी विशिष्ट अनुभूती अंतिम सत्याचे स्थान घेऊ शकत नाही, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. महावीर, बुद्ध, कृष्ण, शंकराचार्य इत्यादी महामानवांच्या अनुभूती सत्यच आहेत, परंतु त्या सत्याचा एकेक पैलू दर्शविणार्‍या आहेत, समग्रसत्य नव्हे, असे श्री. अरविंदांचे प्रतिपादन दिसते. परमसत्याचे एक स्वरूप स्थिर, शांत, अविचल, सर्वव्यापी ब्रह्मचेतनेचे आहे तर दुसरे स्वरूप अत्यंत गतिमान, क्रियाशील, आनंदमयी चेतनेचेही आहे. नीरव, निराकार, स्तब्ध शून्यवत् असेही परमसत्याचे आणखी एक रूप आहे. ज्याप्रमाणे पदार्थातील अणू हा स्थिर भासतो, परंतु प्रत्यक्षात प्रचंड गतिमान आहे, त्याचप्रमाणे ध्यानावस्थेतील आमच्या जाणिवेला अस्तित्वाच्या वेगवेगळय़ा पातळय़ांवर वैश्विक सत्याची वेगवेगळी अनुभूती येऊ शकते. भौतिक पातळीपेक्षा अधिक उच्चस्तरांवर अस्तित्वात असलेल्या अति-चेतन पातळय़ांवरील दिव्य सामर्थ्यांना या भौतिक पातळीवर उतरून भौतिक प्रकृतीचा एकूण प्रवासही त्याच दिशेने आहे. परंतु हा प्रवास जडातून, अवचेतनेतून, अज्ञानातून, अंधकारातून होत असल्यामुळे त्याची गती संथ व वेडीवाकडी वाटते. मानव हा भौतिक जगात परमात्म्याचाच सर्वाधिक सचेतन अंश असल्यामुळे जागरूकतेने व तळमळीने स्वत:मधील ईशत्व प्रकटवून मानव उत्क्रांतीची ही गती वाढवू शकतो, हे श्री. अरविंदांच्या योग-तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु आमच्या प्राणिक, मानसिक इच्छा, वासना तृप्त व्हाव्या म्हणून दिव्य सामर्थ्यांची भक्ती करणे वेगळे आणि परमोच्च परमात्म्याने आमच्यात प्रकटून त्यांच्या कार्याचे आम्ही स्वत:ला केवळ साधन, उपकरण होऊ देणे वेगळे. ही दुसर्‍या प्रकारची साधनाच अध्यात्मास अभिप्रेत आहे. आमच्या भौतिक इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कोण्या देवाच्या, समाधिस्थ संताच्या, गुरूच्या सामर्थ्यांची पूजा करतो व त्याविषयी भक्तिभाव बाळगतो. परंतु या भावनेतून, वासनेतून केलेली पूजा, भक्ती आध्यात्मिक साधनेचा हिस्सा होऊ शकत नाही. आमच्या प्रकृतीचे त्यामुळे उन्नत रूपांतरण होऊ शकत नाही, उलट आम्ही अधिकच दुर्बल व परावलंबी होतो. मात्र अंतरात्म्याचा शोध घेऊन त्याच्या हाती सूत्रे सोपविल्यास आमची स्वभाव-प्रकृती तर उन्नत, शांत, समंजस, शहाणी, ज्ञानी, सक्षम, प्रेमळ व सामर्थ्यवान होतेच; शिवाय भोवतालच्या जगावरही त्याचे चांगले परिणाम होताना जाणवतात. म्हणून ही आध्यात्मिक साधना मानवाला दुर्बल अथवा परावलंबी करत नसून जगण्यासाठी अधिक सक्षम व स्वावलंबी बनविते. (लेखक नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

No comments:

Post a Comment