Monday, January 14, 2013

विश्वात एकच सचेतन मूलतत्त्व अस्तित्वात आहे

मागील शतकाच्या पूर्वार्धात सुप्रसिद्ध योगी व तत्त्वज्ञ श्री. अरविंद यांनी सर्व प्राचीन भारतीय दर्शनांचा आढावा घेऊन आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची पुनर्माडणी त्यांच्या .ङळषश ऊर्ळीळपश (दिव्य जीवन) या ग्रंथाद्वारे केली. त्या गं्रथाच्या आधारे आध्यात्मिक विचारसरणीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे नमूद करता येतात. या विश्वात मूलत: एकच तत्त्व अस्तित्वात आहे. ते 'आहे' म्हणून त्याला 'सत्' म्हणायचे. ते जे एकच एक मूलतत्त्व अस्तित्वात आहे, ते जड अथवा अचेतन नसून संपूर्णत: सचेतन/ चिन्मय आहे, म्हणून त्याला 'चित्' म्हणायचे. त्याचप्रमाणे त्या मूलतत्त्वाचा स्वभाव आनंद-स्वरूप आहे, म्हणून त्याला सत्+चित्+आनंद = 'सच्चिदानंद' असे नाव दिले आहे. या सच्चिदानंदाखेरीज दुसरे काहीही अस्तित्वात नाही, म्हणून त्याला 'आत्मतत्त्व' म्हणायचे. ईशावास्य उपनिषदाच्या भाषेत सांगायचे तर..'ते आत्मतत्त्व एकच एक, मुळीच हालचाल न करणारे, पण मनापेक्षाही वेगवान आहे. देव त्याला गाठू शकत नाहीत, मात्र त्याने देवांना केव्हाच गाठलेले आहे.' 'ते दूर आहे आणि ते जवळही आहे. 'ते या सर्वाच्या आत आणि या सर्वाच्या (विश्वाच्या) बाहेरही आहे.' अध्यात्माच्या या कल्पनेनुसार सर्वव्यापी, सर्वातर्यामी, परंतु एकच एक असे ते आत्मतत्त्व/ परब्रह्म/सच्चिदानंद सृष्टीच्या आरंभी असंख्य झाले. जे एक होते त्याने स्वत:ला असंख्य/ अगणित रूपांत/ आकारांत खंडित करून घेतले. ते संपूर्ण सचेतन होते, त्याने स्वत:ला या असंख्य आकारांमध्ये संपूर्ण निश्चेतन/ जड करून घेतले आणि मग त्याने प्रवास सुरू केला असंख्य/ अगणित रूपांतून/ आकारांतून पुन्हा एकत्वाकडे, चैतन्याकडे आणि आनंदाकडे! सृष्टीची उत्क्रांती जडाकडून चेतनेकडे वाटचाल करीत असलेली दिसते. परंतु या सर्व जडाच्या मुळाशी, त्याच्या आत आणि बाहेरही ते आनंदमय चैतन्य गुप्तपणे विराजमान आहेच. सृष्टीच्या निर्मितीचे कारण, निमित्तही तेच आहे आणि निर्मित सृष्टीचे सारे द्रव्य/ घटक त्याच तत्त्वाचे बनलेले आहेत. निर्माता आणि निर्मिती यांच्यात द्वैत/ द्वंद्व नसून निर्माताच निर्मितीतही उतरला आहे. निर्मात्यापासून निर्मिती वेगळी नाही. चैतन्यापासून जड तत्त्व वेगळे नाही. चैतन्यमय व एकच एक असलेल्या सर्वव्यापी आत्मतत्त्वाने अगणित जड कणांमध्ये जे स्वत:ला विभाजित करून घेतले, ते एकदम नव्हे तर टप्प्याटप्प्याने. त्याने प्रथम स्वत:तून कार्यकारी शक्तीची निर्मिती केली, जिला 'परा-प्रकृती' म्हणतात. त्या परा-प्रकृतीच्या माध्यमातून अस्तित्वाच्या अनेक पातळ्या/ लोक/ जगत् निर्माण झाले. त्यापैकी आपल्या दृष्टीस पडणारे भौतिक जगत् ही एकूण समग्र अस्तित्वाची केवळ एक पातळी आहे. भौतिक पातळीच्या आधी मानस लोक, प्राणिक लोक अशा विविध पातळ्या व त्यावरील जगतांची निर्मिती झाली. आज आमचे जे मानवी-जीवन आहे, त्यावर या सर्व पातळ्यांचा (.श्रिरपशी) व त्यातील जगतांचा (ुेीश्रवी) व शक्तींचा (.षेीलशी) प्रभाव सतत असतो. आमच्या सामान्य जाणिवेला भौतिकेतर पातळ्यांवरील अस्तित्वाचे भान नसते व म्हणून आमच्यासाठी ते सर्व 'गुह्यजगत्' आहेत. मात्र या अनेकानेक गुह्य जगतांमधून, त्यांत वास करणार्‍या विविध शक्तींपासून आम्ही नित्य प्रेरणा घेत असतो अथवा त्यांच्या सामर्थ्याचे नकळत 'वाहन' ठरत असतो. भौतिकसृष्टीमध्ये प्राणाचा विकास व्हावा यासाठी प्राणिक पातळीतून भौतिक पातळीवर दबाव येत असतो. तसेच प्राणी-जीवनात मनाचा विविधांगी विकास होण्यासाठी मानस-लोकांतूनही असाच दबाव व प्रभाव कार्यरत असतो. अर्थात भौतिक पदार्थातही सुप्त रूपाने प्राण, मन इ. घटक अस्तित्वात असल्यामुळेच वरच्या लोकांतून येणारे दबाव जडातून प्राणाला व प्राणातून मनाला उमलण्यास साहाय्यभूत ठरतात. सृष्टीच्या निर्मितीचा उद्देश हाच आहे की, परमात्मा असंख्य रूपे व आकार घेऊन त्या सर्व वरपांगी जड व अचेतन भासणार्‍या रूपांमधून पुन्हा चैतन्याचा संपूर्ण विकास करुन एकत्व साधू इच्छित आहे. आमच्यापैकी प्रत्येक मानवात, पशुपक्ष्यात, वनस्पती व जड पदार्थातदेखील खोलवर तो परमात्माच दडलेला असून तो आमच्यातून प्रकटू इच्छितो. ज्याप्रमाणे आम्हाला स्वत:मधील अवचेतन अंगाचे भान नसते त्याचप्रमाणे या अति-चेतन दिव्य अंगाचेदेखील भान नसते. मात्र समग्र मानवी इतिहासाचे अवलोकन केल्यास मानवतेला स्वत:च्या मर्यादा ओलांडून अधिक साहसी, निर्भय, पराक्रमी, ज्ञानी, सुंदर व प्रेमळ होण्याची तसेच इतरांसोबत एकत्व साधण्याची प्रबळ आंतरिक ओढ परमात्म्याशी असलेल्या आमच्या नेणिवेतील आंतरिक संबंधामुळेच निर्माण होते. या आध्यात्मिक दर्शनानुसार मानवी जीवनाचा हेतू व उद्दिष्ट स्पष्ट आहे. स्वत:मधील अंतरात्म्याला हुडकून काढणे, त्याच्याशी संलग्न राहण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या हाती आमच्या जीवनाची सूत्रे सोपविणे व आपल्या पूर्ण वैभवासह आमच्यातून त्या परमात्म्याने प्रकटावे व भूलोकीचे सर्व जीवन अधिकाधिक दिव्य, चैतन्यमय, संपन्न, प्रसन्न व सुसंवादी होत जावे; त्यातच जीवनाची सार्थकता आहे. प्रकृती अतिशय कठोर व अपरिवर्तनीय असून त्यामुळे जीवन दु:खद ठरते व म्हणून या प्रकृतीचा व जीवनाचा त्याग करून मानवी जीवाने मोक्षाचा वा निर्वाणाचा ध्यास घ्यावा, ही विचारसरणी श्री अरविंदांच्या आध्यात्मिक मांडणीमध्ये मुळीच समर्थनीय ठरत नाही. उलट प्रकृतीने स्वत:मध्ये परिवर्तन घडवूनच उत्क्रांतीचे इतके टप्पे पार केले आहेत. विश्वप्रकृतीमध्येही परमात्म्याची दिव्य शक्ती गुप्तपणे कार्यरत असून प्रकृतीला अधिकाधिक लवचीक व चैतन्यमय करण्यासाठी ती दिव्य शक्ती अनेक प्रकारे झटत आहे. परमात्म्याच्या त्या दिव्य सामर्थ्याचे आवाहन करून मनुष्य स्वत:ची प्रकृती बदलण्यासाठी जर प्रयत्नरत राहिला तर त्याच्याही प्रकृतीचे दिव्य रूपांतर होऊ शकते व सोबतच विश्वप्रकृतीच्या उत्क्रांतीलादेखील त्याचा हातभार सजगपणे लागू शकतो, असे श्री. अरविंद म्हणतात. अधिक सोप्या व व्यावहारिक भाषेत सांगायचे म्हणजे जर मला माझ्या जीवनात अडचणी असतील तर त्या अडचणी बाह्य जगातील इतर शक्तींमुळे किती व माझ्याच स्वभावातील उणिवांमुळे किती, हे मी स्वत:ला न्याहाळून तपासू शकतो. पैकी बाह्य जगामुळे निर्माण झालेल्या सर्व अडचणी सोडविणे मला शक्य नसते. परंतु माझ्या स्वभावातील ज्या उणिवेमुळे एखादी अडचण निर्माण होत असल्याचे माझ्या लक्षात येते, ती स्वभावातील उणीव दूर करणेदेखील माझ्यासाठी सोपे काम नसते. मात्र माझ्या अंतरंगातील अंतरात्म्याशी माझी जाणीव जसजशी निगडित होत जाईल व परमात्म्याचे आवाहन करून ती स्वभावातील उणीव दूर करण्यासाठी मी जितक्या आर्ततेने त्याचे साहाय्य मागत राहील, तसतसे माझ्या स्वभावात अधिकाधिक चांगले बदल घडत जाताना आढळतील व त्याचसोबत बाह्य जगातील अडचणी मला कमी त्रासदायक ठरू लागतील. माझ्या प्रकृतीमधील हे परिवर्तन बाह्य जगाच्या प्रकृती-परिवर्तनालाही काही प्रमाणात चालना देत राहील. माझी आणि विश्वाची प्रकृती अधिकाधिक दिव्य, ज्ञानी, सशक्त, सुदृढ, लवचीक, प्रेमळ, सचेतन व आनंदमय होत जाईल. (लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

No comments:

Post a Comment