kishor Deshpande
Tuesday, February 26, 2013
मानवजातीच्या प्रकृतीचेच दिव्य रूपांतरण व्हायला हवे
भौतिकवादी असोत वा अध्यात्मवादी, आत्म्या-परमात्म्याचे अस्तित्व नाकारणारे असोत वा तशा अस्तित्वावर श्रद्धा असणारे असोत, ज्या ज्या व्यक्तींना जीवनाविषयी आस्था आहे आणि संकुचित स्वार्थापलीकडे समाजाच्या भल्याचा जे विचार करतात, अशा सर्वाना मानवाची सर्वागीण उन्नती कशी साधता येईल, याबाबत समान चिंता असते. प्रत्येक मानवात सुप्त क्षमता दडलेल्या असतात; त्या क्षमता व्यक्तिगणिक वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्येक व्यक्तीला स्वत:मधील क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळावी, त्यासाठी आवश्यक ते स्वातंर्त्य आणि पोषक वातावरण मिळावे, परंतु एकाच्या क्षमतांचा विकास हा दुसर्यांच्या विकासाला बाधक ठरू नये, तर पूरकच ठरावा. मानवी व्यक्तित्वातील ज्या क्षमतांचा विकास हा इतर मानवांना अथवा जीवसृष्टीला दडपणारा व घातक ठरत असेल, त्या क्षमतांना आपण पाशवी अथवा आसुरी मानू व अशा पाशवी, आसुरी इच्छा-आकांक्षांना समाजात व मानवाच्या मनात थारा न मिळावा यासाठी कोणती उपाययोजना करता येईल, याबाबत सर्व प्रकारचे समाजचिंतक विचार करीत असतात.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजातील अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, कुटुंबव्यवस्था इ. सामाजिक रचना या व्यक्तींच्या वागणुकीवर, विचार करण्याच्या पद्धतीवर व भावभावनांवरदेखील सतत परिणामकारक नियंत्रण करत असतात; त्यामुळे या व्यवस्था बदलणे अधिक महत्त्वाचे आहे व सामाजिक रचना बदलल्या, तर व्यक्ती आपोआप बदलतील किंवा व्यक्तींमधील बदल अधिक सुलभ होतील अशा प्रकारे चिंतन करणार्यांना आपण ढोबळमानाने 'समाजवादी' विचारक म्हणू. या विचारसरणीमध्ये निश्चितच तथ्य आहे, परंतु समाजव्यवस्था काही आपोआप बदलत नाही. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उत्पादन साधनामध्ये वेळोवेळी बदल होतात. या बदलांना पचविण्याची क्षमता प्रचलित अर्थ, राज्य, कुटुंबव्यवस्थेत नसल्यास त्या सर्व व्यवस्थादेखील बदलण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. मात्र या व्यवस्था बदलविण्यासाठी काही व्यक्तींनाच पुढाकार घ्यावा लागतो व संघटित प्रयत्न करावे लागतात. ही जी समाजपरिवर्तनासाठी संघटित होणारी व पुढाकार घेणारी माणसं आहेत, त्यांना तरी स्वत:मधील पाशवी, आसुरी वृत्तींचा त्याग करावा लागेलच, अन्यथा त्यांनी बदलविलेल्या सामाजिक, आर्थिक, राज्यव्यवस्थेतही वेगळ्या प्रकारे, जुन्याच पाशवी, आसुरी वृत्तींचे प्राबल्य वाढत जाऊन अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही.
आम्ही जेव्हा सर्व दोषांचे खापर समाजव्यवस्थेवर फोडतो, तेव्हा आमचे स्वत:कडे लक्षच नसते. मानवी स्वभावच असा आहे की, स्वत:मधील उणिवांकडे, दोषांकडे आपले कमी लक्ष असते व इतरांमधील उणिवा, दोष आपल्याला लवकर जाणवतात. अगदी लहानपणीदेखील मी व माझ्या भावाने जर सारख्याच निष्काळजीपणे एखादी वस्तू हाताळली असेल तर 'माझ्या हातून कप पडला' आणि 'त्याने कप फोडला' असे उत्स्फूर्त स्पष्टीकरण आपण आईबापांना देत असतो. म्हणजे माझा दोष काहीच नसून माझ्या हातातून एक चूक घडली आहे; पण भाऊ मात्र दोषी आहे! आज सर्व टीव्ही चॅनल्सवर चालणार्या चर्चा, वृत्तपत्रीय लेख, ठिकठिकाणी होत असलेल्या लोकांच्या गप्पा सर्वत्र दुसर्यांना अथवा व्यवस्थेला दोष देण्याची स्पर्धा कोलाहल निर्माण करीत आहे. स्वत:खेरीज इतर सर्वाच्या हेतूबद्दल शंका घेत राहण्याची वृत्तीदेखील झपाटय़ाने पसरत आहे.
प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगत राहण्याची व स्वत:ची प्रजाती वाढविण्याची मूलभूत प्रेरणा नैसर्गिक व बलवान असल्याचे आपण या आधीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. माझ्या जगण्यासोबत मला माझे कुटुंब, जाती, धर्म, प्रांत व देशाच्याही जगण्याचे उतरत्या क्रमाने मोल वाटते. माझे कुटुंब मला जगू देत नसेल, तर स्वत:च्या कुटुंबासोबत संघर्ष करून मी जगत राहील. तसेच इतर जाती, धर्म, प्रांत व देशांच्या बाबतीतही म्हणता येईल, हे सर्व स्वाभाविक आहे.
परंतु माझ्या जीवनासाठी मला इतरांना फसविणे, लुबाडणे, दडपणे वा नष्ट करणे आवश्यक व योग्य वाटत असेल, तर ती माझ्यातली 'आसुरी' वृत्ती आहे आणि अशी आसुरी वृत्ती माझ्या स्वत:च्याच सर्वागीण उन्नतीला बाधक ठरते. शिवाय या वृत्तीमुळे समाजव्यवस्थादेखील सतत अशांत, अस्थिर व स्फोटक राहते. याउलट सर्वाचे भले व्हावे, सर्वाची उन्नती व्हावी अशी जी इच्छा आपल्या मनात कधीकधी डोकावते, तिला आपल्यातला उन्नत, विकसित व दिव्य अंश म्हणता येईल. या दिव्यत्वाचा विकास सर्व मानवांमध्ये होण्यासाठी आर्थिक, राजकीय, सामाजिक रचनांमध्येही सुयोग्य मूलभूत परिवर्तन घडवून आणता येईल. परंतु हे परिवर्तन करू इच्छिणार्या व्यक्तींना स्वत:मधील दिव्यत्वाचा विकास करण्याकडेदेखील प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे लागेल.
पृथ्वीवरील प्राणिसृष्टीच्या व मानवजातीच्या जीवनाच्या विकासासाठी भय, क्रोध, मोह, मत्सर यांसारख्या विकारांची आणि हिंसक व आक्रमक मनोवृत्तीची याआधीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर गरजही असावी. म्हणूनच ते विकार वारशाने आपल्याला मिळाले आहेत. परंतु उत्क्रांतीच्या यापुढील टप्प्यांना गाठण्यासाठी हे विकार पोषक ठरणार नसून अडथळे ठरू शकतील. अशा विकारांना मानवी मनातून कसे नष्ट करता येईल व मनाची उन्नत अवस्था सहज व नित्याची कशी साधता येईल, हा मोठा प्रश्न आहे. शिक्षण, संस्कार व योग्य आर्थिक, राजकीय व्यवस्थेचे पर्यावरण लाभल्यास असे विकास दूर होऊ शकतील, अशी समाजवादी विचारवंतांना आशा वाटते. उलटपक्षी विकार हे नैसर्गिकच असल्यामुळे ते नष्ट होणे शक्य नाही. कायद्याचे व समाजाचे दडपण व्यक्तीवर असले, तरच ते विकार काबूत राहतील; दाबून ठेवता येतील अशीही एक विचारधारा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभवी साधकांच्या मते विकारांना वारंवार दूर सारावे लागते; ते पुन:पुन्हा डोके वर काढतच असतात; म्हणून चित्तशुद्धीची साधना आध्यात्मिक साधकाला सततच करावी लागते.
श्री अरविंद असे म्हणतात की, ''विकारांना दाबून ठेवणे अथवा विकारांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करणे (म्हणजे विकारांचे जे विषय असतात, त्यांच्यापासून लांब अंतरावर राहणे)'' या पद्धतींमुळे विकार नष्ट होणार नाहीत. ते साधकाच्या अवचेतन मनात दडून राहतील व संधी मिळताच उफाळून वर येतील. आमच्या प्रकृतीचे असे रूपांतरण आवश्यक आहे की, ज्यामुळे विनाशक, विद्रूप विकारांना अवचेतनेमध्येदेखील थारा मिळणार नाही. आणि असे रूपांतरण एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये होऊन भागणार नाही. कारण मानवजातीच्या सामुदायिक अवचेतनेतून त्या विकारांना दूर सारावयाचे असल्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या प्रकृतीचेच दिव्य रूपांतरण व्हायला हवे. म्हणूनच व्यक्तिगत सिद्धी वा मोक्षासाठी आध्यात्मिक साधना करणे इष्ट नसून ती सर्वासाठी केल्यानेच फलदायी ठरेल.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Monday, January 28, 2013
बुद्धी व तर्कापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती महत्त्वाची
योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्माडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विश्वातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळय़ांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळय़ा, अज्ञानी प्रकृतीच्या, निसर्गाच्या गर्भातून गुप्तपणे त्या प्रकृतीच्या विकासाला आधार देत राहिले. सृष्टीचा विकास धडपडत, चाचपडत झाल्यासारखा दिसतो. कारण बाह्यत: हा जड, अचेतन ऊर्जेचा, पदार्थाचाच प्रवास आहे आणि तरीही त्या प्रवासाला एक दिशा दिसते, कारण त्या दिशेकडे प्रकृतीला पडद्याआडून घेऊन चालणारे चैतन्यही तिच्याच उदरात आहे. हा सर्व प्रवास जडातून चैतन्याकडे, असंवेदनेकडून संवेदनेकडे, अनेकत्वातून एकत्वाकडे, विसंगतीतून सुसंगतीकडे, निम्न पातळीवरून उच्च पातळीकडे म्हणजे सच्चिदानंदाकडे वाटचाल करीत आहे.
तुकडोजी महाराजांनी त्यांच्या काव्यातून अशीच मागणी केली आहे.
'हे प्रार्थना गुरुदेवसे यह स्वर्गसम संसार हो
अतिउच्चतम जीवन रहे, परमार्थमय व्यवहार हो'
ज्ञानदेवांच्या पसायदानातदेखील अशाच आशयाची प्रार्थना आढळून येते. भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातला मौलिक भेद असा आहे की, तार्किक बुद्धीपेक्षा वेगळय़ा पातळीवरील जाणिवेच्या प्रत्यक्ष अनुभूतीला भारतीय आध्यात्मिक दर्शनांनी मोलाचे स्थान दिले. सांख्य, जैन, बौद्ध, वेदांती, अद्वैतवादी अथवा द्वैतवादी अशा सर्वच दार्शनिकांनी केवळ बुद्धीचा कस लावून तार्किक निष्कर्ष काढण्यावर भर न देता स्वत: ध्यानधारणेच्या, योगसाधनेच्या वेगवेगळय़ा पद्धतींचा अवलंब करून आपल्या जाणिवेला एकाग्रतेने उच्चतर पातळय़ांवर केंद्रित करून जी अनुभूती त्यांना झाली, तिचे वर्णन बुद्धीच्या पातळीवर तात्त्विक मांडणीद्वारे शक्य होईल तितके केलेले आहे. बुद्ध, महावीर, कृष्ण, शंकर (आचार्य), गोरख, कबीर, नामदेव, तुकाराम ही नावे भारतीयांसाठी फक्त फिलॉसॉफर्स किंवा कवी म्हणून वंदनीय नाहीत, तर आपापल्या जीवनात खडतर तपस्येतून त्यांनी 'अ-लौकिक'असे काही अनुभवले व बाह्य विश्वात प्रसारित केले, त्यामुळे ते पूजनीय ठरले आहेत.पाश्चात्त्यांचा भर ग्रीक तत्त्वज्ञांच्या प्राचीन काळापासून बुद्धी व तार्किक विचारांवर राहिला आहे. बुद्धी कितीही सूक्ष्म, तरल व उत्तुंग झेप घेणारी असली तरी तिच्या प्राकृतिक मर्यादा आहेत. त्यामुळे बहुतेक पाश्चात्त्य तत्त्वज्ञ अखेरीस अ™ोयवादाचा आश्रय घेतात. बुद्धीच्या पातळीपेक्षा वेगळा अनुभव जाणिवेत आला तरी, त्या अनुभवाला दुय्यम स्थान देऊन तार्किक बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहण्याकडेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञांचा कल असतो. भारतीय दार्शनिकांनी मात्र अनुभूतीपेक्षा दुय्यम स्थान तार्किक बुद्धीला दिले.
श्री. अरविंदांचे बालपणापासून सर्व शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. भारतातील बुरसटलेल्या धार्मिक वातावरणापासून व परंपरांपासून त्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशानेच त्यांच्या वडिलांनी त्यांची बालपणीच इंग्लंडला रवानगी केली. त्यांनी चुकूनही भारतीय संस्कृतीच्या संपर्कात येऊ नये, याचीही दक्षता घेतली. त्यामुळे इंग्लंडच्या वास्तव्यात श्री. अरविंदांनी केवळ पाश्चात्य तत्त्वज्ञान, साहित्य व संस्कृतीचा अभ्यास केला. इंग्लंडमध्येच ते आयसीएसची परीक्षा इतर सर्व विषयांत उत्तीर्ण झाले. परंतु सरकारी नोकरीचा तिटकारा असल्यामुळे मुद्दाम अश्वारोहणाच्या परीक्षेकडे फिरकले नाहीत. सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात देऊ केलेली नोकरी स्वीकारून श्री. अरविंद तरुणपणी जेव्हा भारतात परतले, तेव्हा भारताच्या किनार्यावरच त्यांना प्रथम एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती मिळाली. पुढे स्वातंर्त्य चळवळीतील मतवादी गटाकडे खेचून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. एका बॉम्ब प्रकरणात अटक होऊन वर्षभर त्यांना तुरुंगवास घडला. त्या काळातच त्यांना सातत्याने अनेक आध्यात्मिक अनुभव येत गेले व त्यांची योग साधना अधिक वेगवान झाली. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी निवडक सहकार्यांसह पॉंडिचेरी (पुदुच्चेरी) येथेच कायमचे वास्तव्य केले व तीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी तिथे एकांतात साधना केली.
पॉंडिचेरी येथील वास्तव्यात श्री. अरविंदांनी स्थापन केलेल्या आश्रमाची सूत्रे त्यांच्या पट्टशिष्या मूळ फ्रेंच नागरिक असलेल्या माताजींनी सांभाळली. त्या आश्रम जीवनात त्यांनी शेती, उद्योग, शिक्षण, व्यायाम, संगीत व कलाक्षेत्रात विविध अभिनव प्रयोग केले. जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्यांनी आध्यात्मिक साधनेसाठी वज्र्य वा त्याज्य मानले नाही. म्हणूनच या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा आवाका प्रचंड मोठा वाटतो. कोणत्याही संकुचित धर्म, संप्रदायवादी, वर्ण, जातिवादी, वंशवादी अथवा राष्ट्रवादी भूमिकेस त्यांच्या अध्यात्मात मुळीच स्थान नाही. तसेच एखादी विशिष्ट अनुभूती अंतिम सत्याचे स्थान घेऊ शकत नाही, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. महावीर, बुद्ध, कृष्ण, शंकराचार्य इत्यादी महामानवांच्या अनुभूती सत्यच आहेत, परंतु त्या सत्याचा एकेक पैलू दर्शविणार्या आहेत, समग्रसत्य नव्हे, असे श्री. अरविंदांचे प्रतिपादन दिसते. परमसत्याचे एक स्वरूप स्थिर, शांत, अविचल, सर्वव्यापी ब्रह्मचेतनेचे आहे तर दुसरे स्वरूप अत्यंत गतिमान, क्रियाशील, आनंदमयी चेतनेचेही आहे. नीरव, निराकार, स्तब्ध शून्यवत् असेही परमसत्याचे आणखी एक रूप आहे. ज्याप्रमाणे पदार्थातील अणू हा स्थिर भासतो, परंतु प्रत्यक्षात प्रचंड गतिमान आहे, त्याचप्रमाणे ध्यानावस्थेतील आमच्या जाणिवेला अस्तित्वाच्या वेगवेगळय़ा पातळय़ांवर वैश्विक सत्याची वेगवेगळी अनुभूती येऊ शकते. भौतिक पातळीपेक्षा अधिक उच्चस्तरांवर अस्तित्वात असलेल्या अति-चेतन पातळय़ांवरील दिव्य सामर्थ्यांना या भौतिक पातळीवर उतरून भौतिक प्रकृतीचा एकूण प्रवासही त्याच दिशेने आहे. परंतु हा प्रवास जडातून, अवचेतनेतून, अज्ञानातून, अंधकारातून होत असल्यामुळे त्याची गती संथ व वेडीवाकडी वाटते. मानव हा भौतिक जगात परमात्म्याचाच सर्वाधिक सचेतन अंश असल्यामुळे जागरूकतेने व तळमळीने स्वत:मधील ईशत्व प्रकटवून मानव उत्क्रांतीची ही गती वाढवू शकतो, हे श्री. अरविंदांच्या योग-तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु आमच्या प्राणिक, मानसिक इच्छा, वासना तृप्त व्हाव्या म्हणून दिव्य सामर्थ्यांची भक्ती करणे वेगळे आणि परमोच्च परमात्म्याने आमच्यात प्रकटून त्यांच्या कार्याचे आम्ही स्वत:ला केवळ साधन, उपकरण होऊ देणे वेगळे. ही दुसर्या प्रकारची साधनाच अध्यात्मास अभिप्रेत आहे.
आमच्या भौतिक इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कोण्या देवाच्या, समाधिस्थ संताच्या, गुरूच्या सामर्थ्यांची पूजा करतो व त्याविषयी भक्तिभाव बाळगतो. परंतु या भावनेतून, वासनेतून केलेली पूजा, भक्ती आध्यात्मिक साधनेचा हिस्सा होऊ शकत नाही. आमच्या प्रकृतीचे त्यामुळे उन्नत रूपांतरण होऊ शकत नाही, उलट आम्ही अधिकच दुर्बल व परावलंबी होतो. मात्र अंतरात्म्याचा शोध घेऊन त्याच्या हाती सूत्रे सोपविल्यास आमची स्वभाव-प्रकृती तर उन्नत, शांत, समंजस, शहाणी, ज्ञानी, सक्षम, प्रेमळ व सामर्थ्यवान होतेच; शिवाय भोवतालच्या जगावरही त्याचे चांगले परिणाम होताना जाणवतात. म्हणून ही आध्यात्मिक साधना मानवाला दुर्बल अथवा परावलंबी करत नसून जगण्यासाठी अधिक सक्षम व स्वावलंबी बनविते.
(लेखक नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
Monday, January 14, 2013
विश्वात एकच सचेतन मूलतत्त्व अस्तित्वात आहे
मागील शतकाच्या पूर्वार्धात सुप्रसिद्ध योगी व तत्त्वज्ञ श्री. अरविंद यांनी सर्व प्राचीन भारतीय दर्शनांचा आढावा घेऊन आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची पुनर्माडणी त्यांच्या .ङळषश ऊर्ळीळपश (दिव्य जीवन) या ग्रंथाद्वारे केली. त्या गं्रथाच्या आधारे आध्यात्मिक विचारसरणीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे नमूद करता येतात.
या विश्वात मूलत: एकच तत्त्व अस्तित्वात आहे. ते 'आहे' म्हणून त्याला 'सत्' म्हणायचे. ते जे एकच एक मूलतत्त्व अस्तित्वात आहे, ते जड अथवा अचेतन नसून संपूर्णत: सचेतन/ चिन्मय आहे, म्हणून त्याला 'चित्' म्हणायचे. त्याचप्रमाणे त्या मूलतत्त्वाचा स्वभाव आनंद-स्वरूप आहे, म्हणून त्याला सत्+चित्+आनंद = 'सच्चिदानंद' असे नाव दिले आहे. या सच्चिदानंदाखेरीज दुसरे काहीही अस्तित्वात नाही, म्हणून त्याला 'आत्मतत्त्व' म्हणायचे. ईशावास्य उपनिषदाच्या भाषेत सांगायचे तर..'ते आत्मतत्त्व एकच एक, मुळीच हालचाल न करणारे, पण मनापेक्षाही वेगवान आहे. देव त्याला गाठू शकत नाहीत, मात्र त्याने देवांना केव्हाच गाठलेले आहे.'
'ते दूर आहे आणि ते जवळही आहे.
'ते या सर्वाच्या आत आणि या सर्वाच्या (विश्वाच्या) बाहेरही आहे.'
अध्यात्माच्या या कल्पनेनुसार सर्वव्यापी, सर्वातर्यामी, परंतु एकच एक असे ते आत्मतत्त्व/ परब्रह्म/सच्चिदानंद सृष्टीच्या आरंभी असंख्य झाले. जे एक होते त्याने स्वत:ला असंख्य/ अगणित रूपांत/ आकारांत खंडित करून घेतले. ते संपूर्ण सचेतन होते, त्याने स्वत:ला या असंख्य आकारांमध्ये संपूर्ण निश्चेतन/ जड करून घेतले आणि मग त्याने प्रवास सुरू केला असंख्य/ अगणित रूपांतून/ आकारांतून पुन्हा एकत्वाकडे, चैतन्याकडे आणि आनंदाकडे! सृष्टीची उत्क्रांती जडाकडून चेतनेकडे वाटचाल करीत असलेली दिसते. परंतु या सर्व जडाच्या मुळाशी, त्याच्या आत आणि बाहेरही ते आनंदमय चैतन्य गुप्तपणे विराजमान आहेच. सृष्टीच्या निर्मितीचे कारण, निमित्तही तेच आहे आणि निर्मित सृष्टीचे सारे द्रव्य/ घटक त्याच तत्त्वाचे बनलेले आहेत. निर्माता आणि निर्मिती यांच्यात द्वैत/ द्वंद्व नसून निर्माताच निर्मितीतही उतरला आहे. निर्मात्यापासून निर्मिती वेगळी नाही. चैतन्यापासून जड तत्त्व वेगळे नाही.
चैतन्यमय व एकच एक असलेल्या सर्वव्यापी आत्मतत्त्वाने अगणित जड कणांमध्ये जे स्वत:ला विभाजित करून घेतले, ते एकदम नव्हे तर टप्प्याटप्प्याने. त्याने प्रथम स्वत:तून कार्यकारी शक्तीची निर्मिती केली, जिला 'परा-प्रकृती' म्हणतात. त्या परा-प्रकृतीच्या माध्यमातून अस्तित्वाच्या अनेक पातळ्या/ लोक/ जगत् निर्माण झाले. त्यापैकी आपल्या दृष्टीस पडणारे भौतिक जगत् ही एकूण समग्र अस्तित्वाची केवळ एक पातळी आहे. भौतिक पातळीच्या आधी मानस लोक, प्राणिक लोक अशा विविध पातळ्या व त्यावरील जगतांची निर्मिती झाली. आज आमचे जे मानवी-जीवन आहे, त्यावर या सर्व पातळ्यांचा (.श्रिरपशी) व त्यातील जगतांचा (ुेीश्रवी) व शक्तींचा (.षेीलशी) प्रभाव सतत असतो. आमच्या सामान्य जाणिवेला भौतिकेतर पातळ्यांवरील अस्तित्वाचे भान नसते व म्हणून आमच्यासाठी ते सर्व 'गुह्यजगत्' आहेत. मात्र या अनेकानेक गुह्य जगतांमधून, त्यांत वास करणार्या विविध शक्तींपासून आम्ही नित्य प्रेरणा घेत असतो अथवा त्यांच्या सामर्थ्याचे नकळत 'वाहन' ठरत असतो.
भौतिकसृष्टीमध्ये प्राणाचा विकास व्हावा यासाठी प्राणिक पातळीतून भौतिक पातळीवर दबाव येत असतो. तसेच प्राणी-जीवनात मनाचा विविधांगी विकास होण्यासाठी मानस-लोकांतूनही असाच दबाव व प्रभाव कार्यरत असतो. अर्थात भौतिक पदार्थातही सुप्त रूपाने प्राण, मन इ. घटक अस्तित्वात असल्यामुळेच वरच्या लोकांतून येणारे दबाव जडातून प्राणाला व प्राणातून मनाला उमलण्यास साहाय्यभूत ठरतात.
सृष्टीच्या निर्मितीचा उद्देश हाच आहे की, परमात्मा असंख्य रूपे व आकार घेऊन त्या सर्व वरपांगी जड व अचेतन भासणार्या रूपांमधून पुन्हा चैतन्याचा संपूर्ण विकास करुन एकत्व साधू इच्छित आहे. आमच्यापैकी प्रत्येक मानवात, पशुपक्ष्यात, वनस्पती व जड पदार्थातदेखील खोलवर तो परमात्माच दडलेला असून तो आमच्यातून प्रकटू इच्छितो. ज्याप्रमाणे आम्हाला स्वत:मधील अवचेतन अंगाचे भान नसते त्याचप्रमाणे या अति-चेतन दिव्य अंगाचेदेखील भान नसते. मात्र समग्र मानवी इतिहासाचे अवलोकन केल्यास मानवतेला स्वत:च्या मर्यादा ओलांडून अधिक साहसी, निर्भय, पराक्रमी, ज्ञानी, सुंदर व प्रेमळ होण्याची तसेच इतरांसोबत एकत्व साधण्याची प्रबळ आंतरिक ओढ परमात्म्याशी असलेल्या आमच्या नेणिवेतील आंतरिक संबंधामुळेच निर्माण होते. या आध्यात्मिक दर्शनानुसार मानवी जीवनाचा हेतू व उद्दिष्ट स्पष्ट आहे. स्वत:मधील अंतरात्म्याला हुडकून काढणे, त्याच्याशी संलग्न राहण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या हाती आमच्या जीवनाची सूत्रे सोपविणे व आपल्या पूर्ण वैभवासह आमच्यातून त्या परमात्म्याने प्रकटावे व भूलोकीचे सर्व जीवन अधिकाधिक दिव्य, चैतन्यमय, संपन्न, प्रसन्न व सुसंवादी होत जावे; त्यातच जीवनाची सार्थकता आहे. प्रकृती अतिशय कठोर व अपरिवर्तनीय असून त्यामुळे जीवन दु:खद ठरते व म्हणून या प्रकृतीचा व जीवनाचा त्याग करून मानवी जीवाने मोक्षाचा वा निर्वाणाचा ध्यास घ्यावा, ही विचारसरणी श्री अरविंदांच्या आध्यात्मिक मांडणीमध्ये मुळीच समर्थनीय ठरत नाही. उलट प्रकृतीने स्वत:मध्ये परिवर्तन घडवूनच उत्क्रांतीचे इतके टप्पे पार केले आहेत.
विश्वप्रकृतीमध्येही परमात्म्याची दिव्य शक्ती गुप्तपणे कार्यरत असून प्रकृतीला अधिकाधिक लवचीक व चैतन्यमय करण्यासाठी ती दिव्य शक्ती अनेक प्रकारे झटत आहे. परमात्म्याच्या त्या दिव्य सामर्थ्याचे आवाहन करून मनुष्य स्वत:ची प्रकृती बदलण्यासाठी जर प्रयत्नरत राहिला तर त्याच्याही प्रकृतीचे दिव्य रूपांतर होऊ शकते व सोबतच विश्वप्रकृतीच्या उत्क्रांतीलादेखील त्याचा हातभार सजगपणे लागू शकतो, असे श्री. अरविंद म्हणतात.
अधिक सोप्या व व्यावहारिक भाषेत सांगायचे म्हणजे जर मला माझ्या जीवनात अडचणी असतील तर त्या अडचणी बाह्य जगातील इतर शक्तींमुळे किती व माझ्याच स्वभावातील उणिवांमुळे किती, हे मी स्वत:ला न्याहाळून तपासू शकतो. पैकी बाह्य जगामुळे निर्माण झालेल्या सर्व अडचणी सोडविणे मला शक्य नसते. परंतु माझ्या स्वभावातील ज्या उणिवेमुळे एखादी अडचण निर्माण होत असल्याचे माझ्या लक्षात येते, ती स्वभावातील उणीव दूर करणेदेखील माझ्यासाठी सोपे काम नसते. मात्र माझ्या अंतरंगातील अंतरात्म्याशी माझी जाणीव जसजशी निगडित होत जाईल व परमात्म्याचे आवाहन करून ती स्वभावातील उणीव दूर करण्यासाठी मी जितक्या आर्ततेने त्याचे साहाय्य मागत राहील, तसतसे माझ्या स्वभावात अधिकाधिक चांगले बदल घडत जाताना आढळतील व त्याचसोबत बाह्य जगातील अडचणी मला कमी त्रासदायक ठरू लागतील. माझ्या प्रकृतीमधील हे परिवर्तन बाह्य जगाच्या प्रकृती-परिवर्तनालाही काही प्रमाणात चालना देत राहील. माझी आणि विश्वाची प्रकृती अधिकाधिक दिव्य, ज्ञानी, सशक्त, सुदृढ, लवचीक, प्रेमळ, सचेतन व आनंदमय होत जाईल.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Tuesday, December 25, 2012
मुक्तीसाठीच माणूस कर्माची जबाबदारीने निवड करतो
सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली? आपल्या जीवनाचे काही प्रयोजन आहे काय? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तत्त्वज्ञानातून शोधण्याचा मानवाने जो प्रयत्न केला, त्यापैकी भौतिकवादी तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे व मर्यादा आपण मागील लेखांकामध्ये जाणून घेतल्या. भारतामध्ये अस्तित्वाच्या मुळाशी पोहोचण्याचे जे प्रयत्न झाले त्यांना 'दर्शनशास्त्र' असे नाव दिले. तत्त्वज्ञानाहून 'दर्शनशास्त्र' वेगळे यासाठी मानले गेले की, तत्त्वज्ञानामध्ये केवळ बुद्धीच्या आधारे तर्कदृष्टय़ा उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो. परंतु 'दर्शन' या शब्दामध्ये निव्वळ तत्त्वज्ञानापेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित अथवा गृहीत आहे. जाणिवेच्या एका उच्च अवस्थेमध्ये प्राप्त झालेले, अनुभूत झालेले ज्ञान म्हणजे 'दर्शन' अशी मान्यता भारतीय परंपरेत आहे. ध्यानमग्न अवस्थेत चेतनेच्या साहाय्याने सत्याचे जे स्वरूप प्राचीन ऋषिमुनींना, योग्यांना, तपस्वींना जाणवले त्याची त्यांनी बौद्धिक स्तरावर केलेली मांडणी म्हणजे त्यांचे 'दर्शन' होय. सांख्य दर्शनाचा उद्गाते कपिल मुनी, वेदोपनिषदांचे रचयिता मानले जाणारे वसिष्ठादी ऋषी, योगशास्त्राचा निर्माता पतंजली, सांख्य आणि योगाची वेदांताशी सांगड घालून भगवद्गीतेत समन्वयी तत्त्वज्ञान गुंफणारा श्रीकृष्ण, वेदांतील कर्मकांडाचा निषेध करून अनात्मवादाचा पुरस्कार करणारा व दु:खमय जीवनात तृष्णात्याग हाच धम्म असल्याची उद्घोष करणारा शाक्यमुनी गौतम बुद्ध, जीव आणि पदार्थ यांचे द्वैत असून त्यांचा कोणीही निर्माता ईश्वर नसल्याचे सांगणारा श्रमण तीर्थकर महावीर इत्यादी सर्व भारतीय तत्त्वज्ञ हे केवळ बुद्धिवादी पंडित नव्हते. आपापल्या जीवनात दीर्घकाळ खडतर तपश्चर्या करून त्यांना जे ज्ञान ध्यानधारणेतून प्राप्त झाले, त्याची मांडणी त्यांनी आपापल्या तत्त्वज्ञानातून केल्यामुळे त्या सर्वाच्या तत्त्वज्ञानास 'दर्शन' असे नाव प्राप्त झाले. अर्थात, यापैकी प्रत्येक महामानवास प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे संपूर्ण सत्य होय असे मानता येणार नाही. कारण आपापल्या ध्यानातून त्यांना जी अनुभूती प्राप्त झाली ती म्हणजे अस्तित्वाचे त्यांना कळलेले एक रूप मानता येईल. अस्तित्वाच्या संपूर्ण सत्याचे दर्शन त्यांना झाले असे मानणे योग्य नव्हे. शिवाय हे ब्रह्मंड आणि पृथ्वीवरील जीवन सतत विकासशील किंवा परिवर्तनशील असल्यामुळे हजारो वर्षापूर्वीचे दर्शन अपूर्ण व आंशिकच असणार.
अमर्याद सृष्टीचा एक अतिशय क्षुद्र घटक असलेला मानव त्या सृष्टीचे संपूर्ण रहस्य कधीच शोधू शकणार नाही, कारण अंशाला पूर्णाचे ज्ञान होऊच शकत नाही, असे मानणार्या तत्त्वज्ञानास 'अ™ोयवाद' म्हणतात. मात्र 'भौतिकवाद' अथवा 'अध्यात्मवाद' हे अ™ोयवादी नाहीत. भौतिकवादाच्या विचारानुसार सर्व सृष्टीचे कारण जड भौतिक पदार्थ किंवा ऊर्जा हेच असल्यामुळे यथाकाळ विज्ञानाच्या साहाय्याने सृष्टीतील सर्व रहस्यांची उकल मानवाला होणारच. अध्यात्मवाद हादेखील सृष्टीमध्ये जाणता न येण्यासारखे रहस्य आहे, असे मानत नाही. कारण प्रत्येक कणात किंवा जीवात पूर्णत्व सामावले असून स्वत:च्या शोधातून पूर्ण गवसू शकते, अशी अध्यात्मवादाची मान्यता आहे.जीव आणि पदार्थ किंवा पुरुष आणि प्रकृती असे दोन स्वतंत्र घटक सृष्टीत असून त्यांच्यात कोणतेही साम्य वा ऐक्य नाही, असे मानणार्या तत्त्वज्ञानास 'द्वैतवाद' म्हणतात. 'सांख्य दर्शन' व 'जैन दर्शन' हे द्वैतवादी आहेत. या दोन्ही दर्शनांमध्ये सृष्टी ही अनादी व अनंत मानलेली आहे. जी अभिव्यक्त झाली ती सृष्टी म्हणजेच प्रकृती आणि तिला जाणणारा, समजणारा तो पुरुष असा भेद कल्पिला आहे. पुरुषाने प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजेच 'मोक्ष' होय. इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा जो उपभोग जीव घेतो, त्याने त्याची तृष्णा वाढतच जाते. म्हणून जीवन दु:खमय होते. तृष्णा नष्ट होऊन निदरेष जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट होय, अशीच मांडणी थोडय़ाफार फरकाने बौद्ध, जैन, सांख्य या भारतीय तत्त्वज्ञानांमध्ये आढळून येते. या तिन्ही दर्शनांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. तसेच त्यांनी आत्म्याचेही अस्तित्व नाकारले आहे. परंतु तरीही ही दर्शने भौतिकवादी नाहीत, कारण जीव किंवा पुरुष हा अ-भौतिक घटक प्रकृतीपेक्षा वेगळा मानून प्रकृतीच्या बंधनातून जीवाला मुक्त करण्यावर त्यांचा भर आहे.
लोभ, भय, अहंकार, तृष्णा इ. विकांरातून मुक्त झालेला हा जीव जाईल कुठे? बौद्ध मतानुसार विश्वातील सर्व वस्तू नाशवंत किंवा अनित्य आहेत. देहाच्या मृत्यूनंतर जीवाचा नाश होत नसला तरी अविनाशी, नित्य, सनातन असे कोणतेही तत्त्व अस्तित्वात नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या देहाचे भौतिक घटक हे वैश्विक भौतिक घटकांमध्ये विलीन होतात. मात्र मानसिक किंवा भावनिक घटक मात्र पूर्णत: विलीन होत नाहीत. कर्म व त्यांचे परिणाम यांची एक साखळी पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. परंतु जो पुनर्जन्म होतो, तो अविनाशी आत्म्याचा होत नसून कर्माचे परिणाम भोगणार्या जीवाचा होतो. कर्माला कारणीभूत असणारी तृष्णा जर संपली तर जीवाच्या पुनर्जन्माचे कारणही संपुष्टात येईल व तो जीवही विलीन होईल, म्हणजे परिनिर्वाण साधेल, अशी थोडक्यात भगवान बुद्धांची मांडणी दिसते. संसाराचे हे चक्र कोणी ईश्वर वा परमात्मा चालवीत नसून कर्मामुळेच ते चक्र चालते, कारण प्रत्येक कर्माचा परिणाम हा असतोच. कर्माची प्रेरणा इच्छा, वासना (तृष्णा), हेवा यांसारख्या भावनांमधून उत्पन्न होते आणि दु:ख हाच कर्माचा मुख्य परिणाम आहे. व्यक्ती आपल्या आंतरिक साधनेद्वारे तृष्णेचा त्याग करू शकतो. त्यामुळे तो दु:खमुक्त होईल व संसारचक्रातून त्याची सुटका होईल.
प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत तपस्येवर किंवा साधनेवर भगवान महावीरानेही (जैन दर्शनाने) भर दिला. अनादी अनंत अशा आत्म्याचे व सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा ईश्वराचे अस्तित्व त्यानेही नाकारले. परंतु सृष्टी अनित्य, विनाशी आहे असे मात्र जैन दर्शन मानत नाही. त्यांच्या मते जीव भौतिक सृष्टी हे अनादी-अनंत असून कर्मबंधनापासून मुक्त झालेले जीव हे आणखी उच्च लोकांत वास करतात. मात्र पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन या जीवनापासून मुक्ती मिळविणे हेच असल्याची मांडणी बौद्ध व जैन या दोन्ही दर्शनांमध्ये समान आढळते. थोडय़ाफार फरकाने अशीच मांडणी शंकराचार्यांच्या मायावादातही आढळून येते. शंकराचार्यांनी अमर, अविनाशी आत्म्याचे व सर्वव्यापी, सनातन ब्रह्मचे अस्तित्व असल्याचे जरी प्रतिपादन केले तरी व्यक्तसृष्टी किंवा प्रकृती ही केवळ आभासात्मक माया असल्यामुळे आत्म्याचा भ्रम नाहीसा होऊन (म्हणजे तो या लौकिक जीवनाच्या मोहातून मुक्त होऊन) स्वत:च्या ब्रह्मरूपी मूळ स्वरूपात विलीन होणे, हेच त्यांच्याही मते जीवनाचे खरे उद्दिष्ट ठरते. कर्म-बंधनातून मुक्ती मिळावी या इच्छेने मनुष्य निदान नैतिक अंगाने तरी बर्यावाईटाचा विचार करून जबाबदारीने कर्माची निवड करू शकतो, हा वरील तिन्ही दर्शनांचा लौकिक अर्थाने चांगला भाग मानता येईल. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ आपण भोगत आहोत. ते पूर्वकर्म बदलणे आपल्या हाती नाही. परंतु भविष्यात किंवा पुढील जन्मी आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू नये म्हणून अनैतिक कर्म करू नये. लोभ, मोह, मद, अहंकार बाळगू नये व दुसर्या व्यक्तीला दुखवू नये; इतक्या सामान्य अर्थाने सामान्य जनांच्या पातळीवर या दर्शनांचा प्रसार झाला. मात्र जीवनापासून पलायन करणे हाच जीवनाचा खरा उद्देश होय, असा जो खोल अर्थ वरील तत्त्वज्ञानांमध्ये गृहीत आहे, तो बुद्धीला न पटणारा, विज्ञानाच्या व काळाच्या कसोटीवर न उतरलेला आहे. शून्यात अथवा ब्रह्मत विलीन होणे किंवा पृथ्वीलोक सोडून अन्य (स्वर्गासम) लोकांत वास करणे, हेच जर मानवी जीवनाचे उद्दिष्ट असेल तर जीवनाचा विविधांगी विकास का झाला? आणि जगण्याची व आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा इतकी मूलभूत स्वरूपात का टिकून राहिली?
Friday, December 14, 2012
चैतन्याच्या अनुभूतीचे वस्तुनिष्ठ संशोधन आवश्यक
विश्वाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचारप्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे जडातूनच उगवले असून कोणत्याही जीवाला/चेतनेला देहाबाहेर वेगळे अस्तित्व नसते. सृष्टीच्या निर्मितीमागे कोणताही हेतू नाही. मनुष्य हाच ज्ञात सृष्टीतील सर्वात ज्ञानी व समर्थ प्राणी असल्यामुळे कशासाठी जगायचे हे मानवालाच ठरवायचे आहे. ईश्वर ही एक काल्पनिक धारणा असून त्याच्या प्राप्तीसाठी खटाटोप करणे निर्थक असते. ईश्वराच्या कल्पनेने, त्याच्या कोपाच्या भयाने व त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने मानवाला नैतिक वागणुकीचे वळण मिळते ही बाब काही प्रमाणात खरी असली, तरी त्यातून दांभिकताही बळावते व धार्मिक मनुष्य अधिक दांभिक असल्याचे दिसून येते. त्यापेक्षा सत्य जाणून मनुष्याने स्वत:ची व समाजाची फसगत न करणे इष्ट ठरेल. अशा प्रकारची भौतिकवादाची थोडक्यात तात्त्विक मांडणी आहे.
भौतिकवादी मनुष्य हा जसा व्यक्तिवादी, आत्मकेंद्रित व स्वार्थपरायण असू शकतो, तसेच तो समाजशील, मानवतावादी व अत्यंत त्यागीदेखील असू शकतो. तो मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, लोकशाही राज्यव्यवस्थेचा समर्थक, हुकूमशाही किंवा सैनिकशाहीचा पाठीराखा अथवा लोकशाही, समाजवादाचा, साम्यवादाचा वा अराजकवादाचादेखील पाईक असू शकतो. सारांश, भौतिकवादी विचारसरणीमध्ये वरील सर्व आर्थिक/राजकीय विचारांना स्थान आहे. सामाजिक बाबतीत भौतिकवादी मनुष्य समाजव्यवस्था टिकून रहावी व माणसांनी एकमेकांसोबत सलोख्याने रहावे या कारणांसाठी नैतिक आचरणाचा आग्रह धरू शकतो. तसाच तो स्वत:ला मृत्यूनंतर अस्तित्व राहणार नसल्याच्या धारणेमुळे बेबंद, चंगळवाद व अनैतिक जीवन जगण्याचेही समर्थन करू शकतो.
वस्तुनिष्ठ (जलक्षशलींर्ळीश) व तर्कशुद्ध (ीरींळेपरश्र) विचार करण्याची शिस्त, ही भौतिकवादाने मानवजातीला दिलेली अमूल्य देणगी मानावी लागेल. तशी शिस्त नसली आणि आपल्याला
अंत:स्फूर्तीने एखाद्या वस्तूचे वा विषयाचे आकलन झाल्यासारखे वाटले तर त्या आकलनात आपले पूर्वग्रह, स्वभावाची बैठक, प्राणिक आवेग वगैरे मिसळून व्यक्तिगणिक आकलनात फरक पडू शकतो.
भौतिकवादी विचारसरणीची आमच्या मानवी समाजाला दुसरी देणगी म्हणजे विज्ञानाचा प्रसार ही होय. सर्व वैज्ञानिक भौतिकवादी विचाराचे नसतात. किंबहुना अध्र्याहून अधिक वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ हे ईश्वरावर श्रद्धा असणारेच आढळतात. परंतु मागील 3-4 शतकांमध्ये तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भौतिकवादी विचारसरणीचे प्राबल्य पाश्चात्त्य देशांमध्ये बळावले. त्यामुळे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध विचारांना मोलाचे स्थान मिळाले. ती शिस्त बाळगून सृष्टीरचनेतील नियम व त्यामागील तत्त्वे शोधून काढण्याकडे प्रगत बुद्धीच्या मानवाचा कल वाढला. त्यांनी संशोधनामध्येही अशीच शिस्त बाळगली. एखाद्या पदार्थाच्या अथवा ऊर्जेच्या विशिष्ट वर्तणुकीला जर 'नियम' म्हणायचे असेल, तर त्या पदार्थाची वा ऊर्जेची समाजन वातावरणात सर्व काळी व सर्व जागी तशीच वर्तणूक आढळून येणे आवश्यक मानण्यात आले. असे घडले तरच विज्ञानदृष्टय़ा तो नियम सिद्ध झाल्याचे मानले जाते. वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण करणारा वैज्ञानिक त्या निरीक्षणात स्वत:चे पूर्वग्रह, धारणा, संस्कार, इच्छा इत्यादींचे मिश्रण होऊ देत नाही. ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असणारे वैज्ञानिक /शास्त्रज्ञदेखील याच पद्धतीने वस्तुनिष्ठ दृष्टी बाळगून प्रयोग करतात व प्रयोगात आढळणार्या घटनांचे तर्कशुद्ध बुद्धीने विश्लेषण करतात. तसे त्यांनी केले नाही तर विज्ञान प्रगतीच करू शकणार नाही. विज्ञानाच्या घोडदौडीमुळे मानवजातीला जे अद्भुत लाभ झाले आहेत, त्यांचे श्रेय बर्याच अंशी भौतिकवादाला निश्चितपणे दिले पाहिजे.
परंतु काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भौतिकवाद समाधानकारक अशी देऊ शकत नाही. ही अफाट सृष्टी केवळ अपघाती योगायोगांच्या लांबलचक मालिकेतून निर्माण झाली व कार्यरत आहे, हा भौतिकवादी विचार बुद्धीचे व मनाचेदेखील सर्वागीण समाधान करू शकत नाही. सभोवतालच्या व दूरवरच्या सृष्टीचे आम्ही अधिक बारकाईने निरीक्षण केले तर ही बुद्धिहीन, आंधळय़ा जड पदार्थाची/ऊर्जेची करामत वाटत नाही. वनस्पती, कीटक, पशुपक्षी व मानवात असलेले चैतन्य जडातूनच उगवले असे मानले, तरी ते चैतन्य बीजरूपाने जडात वास करत असणारच! त्याशिवाय ते उगवणार कसे? शिवाय आमच्या ज्ञानेंद्रियांना व तार्किक बुद्धीला जे कळत नाही, ते अस्तित्वात असूच शकत नाही, असे मानणे योग्य नाही. कारण मानवाच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीलाही मर्यादा आहेत. मानवाच्या व मानवसदृश प्राण्यांच्या उत्क्रांतीक्रमातील आगमनापूर्वीचे प्राणी-जगतदेखील असे म्हणू शकले असते की, तर्क-बुद्धी नावाची गोष्ट या सृष्टीत अस्तित्वात असूच शकत नाही! आमच्या अंतर्मनाचे व मनाच्या अवचेतन भागाचे नियमन व नियंत्रण करणारी आमच्या जागृत मनापेक्षा अधिक ज्ञानी असणारी यंत्रणा कार्यरत असते, हेदेखील आपण स्वत:चे निरीक्षण केल्यास समजू शकतो. जडाच्या आधारे चैतन्याचा अधिकाधिक विकास साधणे, अशी स्पष्ट दिशा उत्क्रांतीमध्ये आढळून येते. सृष्टीच्या मुळाशी जर फक्त अज्ञानी जड तत्त्वच असते तर त्याला ही नेमकी दिशा कशी धरता आली असती? एखाद्या आंधळय़ाने धडपडत, चाचपडत, झोकांडय़ा खात वाटचाल करावी तसे उत्क्रांतीचे स्वरूप दिसते खरे, परंतु त्या वाटचालीला एक निश्चित दिशा आहे, त्यात एक सुसंगती आहे, ती कुठून आली? शिवाय प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगण्याची व वंशवद्धीची जी उपजत, मूलभूत व बलवान प्रेरणा आढळून येते, तिच्या उगमस्थानाचा व कारणाचा समाधानकारक खुलासा भौतिकवाद करत नाही. जर सृष्टीच्या मुळाशी अचेतन, जड तत्त्वच असेल, तर ते जडभौतिक तत्त्व सजीवांच्या रूपात चेतनेला टिकवून ठेवण्यासाठी व वृद्धिंगत करण्यास असा आणि इतका अट्टाहास कसा करू शकेल? जगत राहण्याची व अधिकाधिक सचेतन होत राहण्याची ही आदिम प्रेरणा भौतिक पदार्थातून उगवणे शक्य वाटत नाही.
पृथ्वीवर काही वेगवेगळय़ा जागी आजपावेतो असंख्य मानवांना जी इंद्रियातीत चैतन्याच्या अस्तित्वाची अनुभूती झाली आहे, त्या अनुभूतीचे अधिक वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, संशोधन व आकलन करणे आवश्यक आहे. तसे न करता उथळपणे 'तो त्यांचा भ्रम होता' असे झटकून टाकणे उचित नव्हे. विशेषत: तशा अनुभूती येणार्या व्यक्तींचे आंतरिक व बाह्य जीवन बदलते काय व कशा प्रकारचे ते बदल होतात, याबाबतदेखील अद्याप पुरेसे संशोधन वस्तुनिष्ठपणे झालेले आढळून येत नाही. अतिंद्रिय वा आध्यात्मिक अनुभूतींचे व ज्यांना त्या अनुभूती येतात, त्या व्यक्तींचे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारे संशोधन करणे भौतिकवादी व्यक्तींना कठीण जाते. कारण तशा विज्ञाननिष्ठ संशोधनाकरिता 'ज्ञात भौतिक सृष्टीखेरीज वेगळे असे काहीही अस्तित्वात नाही' हा आपला पूर्वग्रहदेखील बाजूला ठेवावा लागतो.
ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थकणांचे व ऊर्जेच्या तरंगाचे सैद्धांतिक स्वरूपात का होईना, (गणिती पद्धतीने) अस्तित्व विज्ञानाला शक्य वाटत आहे, त्या सूक्ष्म कणांचे अथवा ऊर्जा-लहरींचे अस्तित्व शे-दीडशे वर्षापूर्वी वैज्ञानिकांना माहीतही नव्हते. हिग्ज-बोसॉन (गॉड पार्टिकल) या अणूतील सूक्ष्म कणाचे अस्तित्व केवळ गणितीय आधारावर शक्य मानले जात होते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा तर नुकताच मिळाला. सृष्टीमध्ये आम्हाला माहीत असलेल्या तत्त्वाखेरीज इतरही तत्त्व अस्तित्वात असू शकतात, ही संभावना विज्ञानाला नेहमी गृहीत धरावी लागते. भौतिक अथवा जड पदार्थाच्या सर्वात सूक्ष्म स्वरूपाचा शोध घेताना फोटॉनसारखे अतिसूक्ष्म कण ऊर्जातरंगाच्या रूपातदेखील वावरत असल्याचे विज्ञानाला आढळून आले. त्याहून अधिक सूक्ष्मात शोध घेता-घेता कदाचित भौतिक-अभौतिक असा भेददेखील वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Tuesday, November 27, 2012
भ्रामकशक्तीवरील विश्वासामुळे माणूस हतबल होतो
याविश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? या प्रश्नांचा वेध विज्ञान घेत नाही. हे विश्व कसे निर्माण झाले व त्यातील पदार्थाच्या किंवा ऊर्जेच्या विशिष्ट स्थिती व हालचालींमागे कोणते नियम किंवा सूत्र दडले असतात, हे शोधण्याचे कार्य विज्ञान करते. प्रत्येक शास्त्राने स्वत:भोवती एक मर्यादा आखून घेतली असते आणि त्या मर्यादेमुळेच संशोधनात शिस्त बाळगून नेमक्या दिशेने वाटचाल करता येते. असे असले तरी आपापल्या विषयातील काही गूढ समस्यांची उकल होण्यासाठी इतर विषयांच्या साहाय्याने संशोधन करणे भाग पडते. जसे पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांना एकमेकांच्या व गणिताच्याही मदतीची गरज भासते. त्याचप्रमाणे जीवशास्त्राला (बायोलॉजी) देखील पदार्थविज्ञान (फिजिक्स) व रसायनशास्त्राची (केमिस्ट्री) मदत घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकता येत नाही. सृष्टीचे अधिक गुंतागुंतीचे व्यवहार शोधण्यासाठी नवनव्या विज्ञानशाखादेखील उघडण्यात आल्या आहेत.
विश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? आमच्या जीवनाचे प्रयोजन काय? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणार्या शास्त्राला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक विचारांचा जो शिरकाव आहे, त्याला तूर्त बाजूला ठेवून आपण या विश्वाच्या व जीवनाच्या प्रयोजनाबाबत केवळ दोन परस्परविरुद्ध प्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्न करू.जे दोन मतप्रवाह भौतिकवाद व अध्यात्मवाद या नावांनी ओळखले जातात. या दोन्ही विचारसरणींना पुन्हा अनेकानेक शाखाही फुटलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या बुद्धीला व अंत:करणाला काही अंशी समाधान प्राप्त करून देणार्या शाखांमधील उत्तम व उन्नत अंश एकत्रित करून आपण प्रथम भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा विचार करू.
भौतिकवाद असे मानतो की, या सृष्टीच्या मुळाशी कोणतीही चैतन्यमय, ज्ञानयुक्त शक्ती नसून केवळ जडपदार्थ किंवा ऊर्जा आहे. प्राण, मन, बुद्धी हे तत्त्व जडातूनच विकसित झाले असून पदार्थमय भौतिक देहाच्या बाहेर त्यांचे वेगळे अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे या सृष्टीत ईश्वर अथवा आत्म्याचे तर मुळीच अस्तित्व नाही. मृत्यूनंतर सर्व प्राण्यांचे अस्तित्व संपते. पुनर्जन्माच्या कल्पनेला कोणताही आधार नाही. सृष्टीचे संचालन तिच्या पदार्थाच्या अंगभूत गतितत्त्वांनी व नियमांनी होत असते. बाहेरून सृष्टीचे नियमन वा विकास करणारी शक्ती कोणतीही नाही. जडपदार्थातून पृथ्वीवर जीवन उगवले, ते पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या विशिष्ट अंतरामुळे व येथील वातावरणामुळे. तसेच प्रतिकूल पर्यावरणाशी झुंजत इथे प्राण्यांचे अनेकानेक प्रकारचे देह घडत गेले व स्वाभाविकपणे त्यापैकी काही प्राणीजातींमध्ये मनाचा व बुद्धीचा विकास होत गेला. मनाशी व बुद्धीशी संबंधित प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असतात. मानवाचा मेंदू सर्वात मोठा असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत भावभावना, कल्पकता व बुद्धी अधिक आहे.
मनुष्येतर प्राण्यांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान नसते. त्यांच्या सर्व प्रेरणा उपजत व नैसर्गिक असतात. त्यामुळे ते सर्व प्राणी निसर्गाचाच एक अभिन्न भाग असल्यासारखे जगतात. त्यांच्यात व बाह्य सृष्टीत आंतरिक एकत्व असते. परंतु मानवामध्ये मन-बुद्धीच्या विकासाने एक वेगळाच टप्पा गाठला. मी व बाह्य जग या वेगवेगळ्या वस्तू आहेत, असे भान मानवाला त्याच्या आदिम अवस्थेपासून प्रकर्षाने आले. बाह्य जग सुंदर, कृपाळू आहे तसेच ते प्रसंगी हिंस्र व क्रूरही वागत असल्याचा नित्य अनुभव मानवाला येतो. आईच्या गर्भात एकत्वाची अनुभूती घेत पहुडलेले बालक जसे बाहेर येताच असुरक्षित वाटून भयभीत होतो तसेच काहीसे निसर्गापासून तुटल्याच्या जाणिवेने मानवाचे झाले. त्याला हे वेगळेपण नकोसे वाटते. त्यामुळे ते एका विश्वव्यापी ईश्वराची कल्पना करून त्याच्याशी तादात्म्य साधू पाहतो. आपल्या एकाकीपणावर व दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्या काल्पनिक विश्वेश्वराची भक्ती हा चांगला उपाय त्याला वाटतो.
शिवाय वादळवारे, अतिवृष्टी, वणवे, भूकंप, ज्वालामुखींचे स्फोट, पूर यांसारखे निसर्गाचे रौद्ररूप आणि इंद्रियांना सुखावणारे लोभस रूप अशी दोन्ही रूपे न्याहाळताना प्रत्येक प्राकृतिक शक्तींचे नियंत्रण करणारी एखादी देवता असावी व त्या देवतेचा रोष झाल्याने नैसर्गिक संकटे येत असावी, अशीही
आदिमानवाची समजूत झाली. त्यामुळे मरुत, वरुण, सूर्य, इंद्र अशा देवता विविध नैसर्गिक शक्तींच्या कारक असल्याचे कल्पून यज्ञासारख्या विधीने त्या देवतांना आवाहन करणे व आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंची आहुती देऊन त्या देवतांना प्रसन्न करून घेणे, अशासारखे उपाय मनुष्य करू लागला.
ईश्वराचे अथवा देवतांचे अस्तित्व कल्पून त्यांची पूजा करणे, भक्ती करणे ही मानवी मनाची वरील कारणांमुळे गरज होती. प्रतिकूल सृष्टीत जिवंत राहण्यासाठी या कल्पनेने त्याला भक्कम आधार दिला. या सृष्टीत शाश्वत असे काही असेल तर ती केवळ भौतिक पदार्थमय ऊर्जा होय. जीवन अशाश्वत असते. जीवनापूर्वी व मृत्यूनंतर प्राण्यांचे कोणतेही अस्तित्व नसते. आत्मा-परमात्मा नावाची कोणतीही वस्तू व शक्ती नाही. सृष्टीचा कोणी निर्माता नाही. असा कोणी निर्माता असता तर ब्रह्मंडात व पृथ्वीवरसुद्धा जी अतिशय उधळमाधळ आढळून येते, तशी ती राहिली नसती. उत्क्रांती ही एक सरळ रेषेत व्यवस्थितपणे आखीव स्वरूपात झाली असती. पृथ्वीवरची निसर्गाची एकूण उत्क्रांती ही झोकांडय़ा खात, चाचपडत, धडपडत, चुकतमाकत, आंधळ्याने वाट शोधावी तशी झालेली दिसते. ईश्वराला जीवनाचा विकास जर सृष्टीत करावयाचा होता, तर हे करोडो-करोडो ग्रह-तारे, बहुतांश जीवरहितच दिसतात. आपल्या सूर्यमालेत तर फक्त पृथ्वीवरच जीवन उमलल्याचे दिसते. शिवाय जीवन कष्टमय, यातनादायी आहे. भोवतालचे पर्यावरण हे जीवनास पोषक कमी व मारकच जास्त आहे. शिवाय क्रौर्य, हिंसा, दुष्टावा, मत्सर, दारिद्रय़, शोषण या बाबी ईश्वराने का निर्माण कराव्या? तो परपीडनात आनंद घेणारा (सॅडीस्ट) आहे काय?
ईश्वर, आत्मा, परमात्मा, देवदेवता यांच्या असण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. भ्रामकशक्तींवर विश्वास ठेवून मनुष्य हतबल व परावलंबी होतो. जी शक्ती अस्तित्वातच नाही ती आपले साहाय्य कशी करणार? कोणत्याही अतिभौतिक शक्तीच्या असण्यावर विश्वास ठेवणे व आपल्या समस्या सोडविण्यासाठी अशा शक्तीच्या साहाय्याची याचना करणे म्हणजे अंधश्रद्धेपायी आत्मवंचना करून स्वसामर्थ्य गमावून बसणे होय.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Monday, November 19, 2012
उजवं मन सर्जनशील, तर डावं विश्लेषण करणारं
मानवी मेंदूच्या निओ कॉर्टेक्स नावाच्या वरच्या आवरणातील डावे व उजवे अर्धगोल कशा प्रकारे काम करतात हे डॉ. जिल टेलर या प्रसिद्ध अमेरिकन मेंदूरचना शास्त्रज्ञाने तिला स्वत:ला तरुण वयात जेव्हा पॅरालिसीसचा झटका आला त्या वेळी प्रत्यक्ष अनुभवले व तिच्या अनुभवांचे कथन चित्रा बेडेकर यांनी 'मेंदूच्या अंतरंगात' या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सामान्य वाचकांना समजणार्या पद्धतीने केले आहे. वैज्ञानिकांसाठी असा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत दुर्मिळ असतो. मेंदूतील असंख्य मज्जातंतूच्या जाळ्याची रचना समजून घेणे व बाहेरून ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या माहितीवर प्रक्रिया होत असताना मेंदूतील हे मज्जातंतूंचे वेगवेगळे सर्किटस् कशा प्रकारे उद्दीपित होतात याचे निरीक्षण व परीक्षण दुसर्या व्यक्तींवर प्रयोग करून शास्त्रज्ञांकडून केले जाते; परंतु मेंदूच्या एका भागात बिघाड झाल्यावर दुसरा भाग कार्यरत असताना नेमका कसा अनुभव येतो, हे डॉ. जिल टेलर यांना स्वत:च्या आजारपणात अनुभवता आले व आपल्या शास्त्रीय माहितीच्या प्रत्यक्ष अनुभवासोबत पडताळा घेऊन त्यांनी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांची कार्यपद्धती जगाला विशद केली. त्या अगदी भिन्नभिन्न कार्यपद्धती चित्रा बेडेकर यांच्याच शब्दात मागील लेखांकापासून आपण वाचत आहोत. कोणत्याही घटनेचे डावा अर्धगोल सुटय़ासुटय़ा तुकडय़ांद्वारे भूतकाळाशी त्या घटनेला जोडून विश्लेषण करतो व याउलट उजवा अर्धगोल मात्र समग्रपणे केवळ वर्तमानात व सर्व विश्वाची जुळवून ती घटना समजून घेतो असा मूलभूत फरक आपण पाहिला. त्यासंदर्भात चित्रा बेडेकर पुढे लिहितात : दोन अर्धगोलांमध्ये दडलेल्या आपल्या
व्यक्तिमत्त्वातल्या दोन भिन्न प्रवृत्ती कोणत्याही गोष्टींचा भिन्न प्रकारे विचार करतात. भावनांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्करण करतात आणि आपल्या शरीरावरसुद्धा वेगळ्या प्रकारचे परिणाम घडवून आणतात. डाव्या आणि उजव्या अर्धगोलांमुळे दिसून येणार्या प्रवृत्तींचा ढोबळमानाने आढावा घेतला तरी त्यांच्यातला फरक प्रकर्षाने जाणवतो.
आपल्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलाला जगाची पर्वा नसते. तो फक्त वर्तमान क्षणाचाच विचार करतो. म्हणून उजव्या मनाची प्रवृत्ती आनंदी, उत्साही, स्नेहमय असते. उजवं मन कृतज्ञतेने भरलेलं असतं. ते मन समाधानी, दयाळू, संवर्धन जोपासणारं आणि चिरंतन आशावादी असतं. तुलना करणं, न्यायनिवाडा करणं ही त्याची प्रवृत्ती नसते. उजव्या मनासाठी सर्व काही सलग, अखंड, एकमेकांपासून वेगळं न करता येण्याजोगं असतं. त्यामुळे उजवं मन सर्व काही, सर्व जण यांना समान लेखतं.
उजव्या मनाची प्रवृत्ती धाडसी, समृद्धीची स्तुती करणारी, सामाजिकरीत्या जुळवून घेणारी असते. ते मन शब्दांपलीकडच्या संवादाला अतिशय संवेदनशील असतं. सहानुभाव बाळगणारं असतं. दुसर्यांच्या भावना बिनचूक ओळखणारं असतं. आपण ज्याला दैवी शक्ती, अंत:प्रेरणा किंवा सर्वोच्च जाणीव म्हणतो त्याचं अधिष्ठान आपल्या उजव्या मनात असतं.
नेहमीच्या चौकटीच्या आणि बंधनांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची उजव्या मनाची प्रवृत्ती असते. त्यामुळे वर्तमान क्षणातल्या सर्व शक्यता पडताळून नवा दृष्टिकोन बाळगण्याची त्या मनाची वृत्ती असते. उजवं मन अतिशय सर्जनशील असतं आणि गोंधळ ही सर्जनशीलतेची पहिली पायरी असते याचा ते मन स्वीकार करतं. ते अतिशय चपळ, चंचल असतं. शरीरातल्या पेशींकडून येणार्या सूक्ष्म संदेशांना, सूक्ष्मातिसूक्ष्म सूचनांना उजवं मन अतिशय संवेदनशील असतं. अनुभवातून आणि स्पर्शातून ते मन सतत काहीतरी शिकत असतं.
उजव्या मनाला भूतकाळाचं ओझं बाळगण्याची गरज नसते आणि भविष्यात काय घडेल याची चिंता नसते. त्यामुळे वर्तमान क्षणातलं स्वातंर्त्य ते मन साजरं करतं. आपल्या केवळ शरीराचंच नव्हे, तर मनाचंसुद्धा स्वास्थ्य सांभाळण्याची जबाबदारी उजव्या मनावर सोपवलेली असते. उजवं मन सृष्टीतल्या सर्व गोष्टीत, प्राणिमात्रात समानता शोधत असतं. माणुसकीला ते मन सर्वाधिक मौल्यवान मानतं.
या तुलनेत डाव्या अर्धगोलाच्या प्रवृत्तीत खूपच फरक असतो. आपलं डावं मन बारीकसारीक तपशिलांनी ओतप्रोत भरलेलं असतं आणि आयुष्याला घडय़ाळाच्या काटय़ावर चालवणारं असतं. माणसाच्या एकूण प्रवृत्तीची गंभीर बाजू या डाव्या मनाकडे सोपवलेली असते. भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमान क्षणात निर्णय घेणारं ते मन असतं. वेगळेपणाच्या, भिन्नतेच्या काटेकोर मर्यादा सदैव लक्षात घेत चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक यासंदर्भात निवाडा करत असतं. वर्तमान क्षणाची उजव्या मनाने जमवलेली सर्व माहिती आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन डावं मन त्या माहितीला व्यवस्थित हाताळण्याजोग्या पद्धतीने रचून ठेवतं. भाषा हे डाव्या मनाचं विचार करण्याचं माध्यम असतं आणि खुद्द डावं मन हे माणसाचं बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचं माध्यम असतं. सतत चालणार्या आत्मसंवादातून आपण इतर जगापेक्षा अलग आहोत याचं भान आपल्यामध्ये डावं मन सदैव जागृत ठेवत असतं. आपल्याकडे येत राहणार्या माहितीचं उत्तम व्यवस्थापन करण्याची आणि चिकित्सकपणे त्या माहितीचं काटेकोर विश्लेषण करण्याची प्रचंड क्षमता डाव्या मनाकडे असते. ते मन पूर्णतावादी (परफेक्शनिस्ट) असतं. एकाच वेळी अनेक कामं करण्याची विलक्षण हातोटी डाव्या मनाकडे असते. क्रमवारीने विचार करण्यात वाकबगार असल्यामुळे प्रत्यक्ष जबाबदार्या हाताळण्याचं त्या मनाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असतं. वेगवेगळी न्यूरोसर्किट्स ओळखण्याची निसर्गदत्त देणगी डाव्या मनाला लाभलेली असते. अशा न्यूरोसर्किट्सच्या मदतीने प्रचंड माहितीचा क्षणार्धात फडशा पाडण्याचं कसब त्या मनाकडे असतं.
डाव्या मनाकडे आणखी एक अजब गुण असतो. बाहेरच्या जगाकडून अव्याहत येत असलेल्या माहितीचा अर्थ लावण्यासाठी त्या माहितीला सूत्ररूपात गुंफण्याचं किंवा त्यातून कथासूत्र रचण्याचं चातुर्य त्या मनाकडे असतं. पण प्रत्यक्ष मिळणार्या माहितीत जर कुठे त्रुटी असतील तर स्वत:च त्या त्रुटी भरून काढण्याची चलाखी डाव्या मनाकडे असते. बेमालूम कथानक रचून तेच सत्य म्हणून पुढे रेटण्याची विलक्षण हातोटी या मनाकडे असते. त्यामुळे आपल्याला खरं किती ठाऊक आहे आणि 'आपल्याला ठाऊक आहे' असं आपल्याला किती वाटतंय या दोन्हीत प्रचंड तफावत असू शकते.
या पचेंद्रियांच्या पलीकडे असणारं एक सहावं इंद्रिय म्हणजे आपल्या मेंदूचा उजवा अर्धगोल. त्याचा पुरेपूर अनुभव जिलने स्ट्रोकनंतर सात-साडेसात वर्षे घेतल्यामुळे ऊर्जेचं गतिशास्त्र (एनर्जी डायनॅमिक्स) आणि अंत:स्फूर्ती याविषयी ती स्वानुभव सांगते. जिलच्या म्हणण्यानुसार आपण सर्व जण ऊर्जायुक्त सजीव आहोत. विश्वातल्या ऊर्जेचं आकलन करून तिचं न्यूरॉन्सच्या सांकेतिक लिपीत रूपांतर करण्यासाठी आपल्या मेंदूची रचना झाली आहे. आपल्या पचेंद्रियांमार्फत ऊर्जेचं आकलन करून घेण्याच्या कामात डाव्या अर्धगोलाची मर्यादा आडवी येते; परंतु अंत:स्फूर्तीने सूक्ष्मातल्या सूक्ष्म ऊर्जेचं गतिशास्त्र आकलन करून घेण्यासाठी उजव्या अर्धगोलाची रचना झाली आहे. स्ट्रोकच्या अनुभवानंतर आपल्या अंत:प्रेरणेचा पुरेपूर वापर जिल करीत असते.
डॉ. जिल टेलर यांच्या मते, दुसर्याच्या जखमेवर हात ठेवून आपण ध्यानधारणा करून ती जखम बरी व्हायला मदत करू शकतो. रेकी, फेंगशूईसारख्या पद्धतींमध्ये ऊर्जेच्या गतिशास्त्राचं विज्ञान दडलं असावं, असं त्याचं मत दिसते. अंत:प्रेरणेने ऊर्जेच्या गतिशास्त्राचं कसं आकलन आणि उपयोग करायचा याची आपल्या उजव्या मनाला संपूर्ण स्पष्टता असते, असा डॉ. जिल टेलर यांचा ठाम विश्वास आहे; परंतु वैज्ञानिकदृष्टय़ा हे पचनी पडणं कठीण आहे. अशी स्वत:ची वेगळी टीप चित्रा बेडेकर यांनी पुस्तकाच्या अखेरच्या भागात जोडली आहे.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Subscribe to:
Comments (Atom)