Wednesday, September 12, 2012

मानसिक पिंड, स्वभाव व्यक्तीच्या हाती नाही

आपल्या अस्तित्वाचे अनेक अंग अथवा घटक असतात. पदार्थमय भौतिक शरीर हा एक घटक, प्राण दुसरा, मन तिसरा, बुद्धी चौथा आणि जाणीव हा आणखी वेगळा घटक आहे. त्याखेरीज आत्मा हाही एक घटक अतिमहत्त्वाचा असल्याचे आध्यात्म मानते, परंतु आत्म्याचे अस्तित्व हा वादाचा विषय आहे. प्राण आणि बुद्धीच्या मधात मन आहे. मन म्हणजे वासना, भावना, विचार अथवा कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना आली किंवा विचार आला असे आपण म्हणतो. म्हणजेच आपण मनाला कल्पनेपेक्षा किंवा विचारापेक्षा वेगळे मानतो. थोडे तटस्थ होऊन आपण आपल्या मनाला न्याहाळले तर असे दिसून येते की, त्यात अनेकानेक भावना, कल्पना, विचार तरंगत येतात. त्यापैकी जी भावना, कल्पना अथवा विचार त्या त्या वेळी आपल्या प्रकृतीला हवीहवीशी वाटते, त्या भावनेच्या, कल्पनेच्या वा विचाराच्या स्वाधीन मनाला करून आपण त्या मागे फरफटत जातो. सामान्यत: मनावर आपला अंकुश नसतो व आपले बाह्य मन हे भोवतालच्या वातावरणातून ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या स्पंदनांना प्रतिसाद देण्यात गुंतले असते. बुद्धी ही बहुतांश मनाच्या दासीसारखे कार्य करते. बुद्धीचे कार्य विश्लेषण तर्क करण्याचे असते. आम्ही वकील लोक आमची बुद्धी पक्षकारांना भाडय़ाने देतो. म्हणजे त्यांना हवे तसे विचार व तर्क सुसंगत पद्धतीने पुरवितो. त्या तर्काचा सत्याशी संबंध असेलच असे नाही. आपली बुद्धी हमखास आपल्या मनाला हवे तसेच घटनांचे विश्लेषण करते व तर्क पुरविते. मन काय आहे? उत्क्रांतीच्या ओघात सस्तन प्राण्यांमध्ये असे वेगळे वैशिष्टय़ निर्माण झाले की, प्रत्येक प्राणी त्याच्या प्रजातीतील इतर प्राण्यांसारखीच प्रकृती धारण करत असला तरी त्याच्याच प्रजातीतील इतर प्राण्यांपेक्षा त्याच्या स्वभावात जाणवण्यासारखे वेगळेपण आढळून येते. मानवामध्ये या व्यक्तिस्वातंर्त्याने कळस गाठला. प्रत्येक माणसाचे मन हे त्याचे अत्यंत खाजगी क्षेत्र असते, ज्यातील घडामोडींबाबत इतर लोक केवळ अंदाज बांधू शकतात; परंतु प्रत्यक्ष जाणू शकत नाहीत. मनुष्येतर प्राण्यांच्या जगण्याच्या प्रेरणा उपज म्हणजे निसर्गदत्त असतात. सोप्या भाषेत असे म्हणता येईल की, त्या त्या प्राणिजातीचे एक सामुदायिक मन असेल जे त्यातील व्यक्तींच्या जीवनाचे संचालन अबोध पातळीवर करत असावे. परंतु मानव हा निसर्गापासून तुटलेला प्राणी आहे. त्याला स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे भान आलेले आहे. 'मी' आणि 'ते' (म्हणजे माझ्याबाहेरील सर्व जग) अशी स्पष्ट विभागणी व्यक्तीच्या मनात झालेली आहे. शिवाय स्मृती व कल्पकता हे दोन वर म्हणा अथवा शाप म्हणा, मानवाला जास्तीचे मिळाले आहेत. त्यामुळे त्याच्या मनात असंख्य स्मृतींचा साठा आहे आणि कल्पकतेच्या बळावर त्याचे मन गतिमान भरार्‍या घेऊ शकते. शिवाय उपजत प्रेरणा कमी झाल्यामुळे मनाला सतत निवड करावी लागते व ते हेलकावे खात राहते. मानवी मनाची खोली व व्याप्ती अथांग आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव उत्क्रांती मानवाच्या मनात अवचेतन स्वरूपात साठविलेली आहे. आपण केवळ आपल्या मनाचा पृष्ठभागच पाहू शकतो. आपल्या जाणिवेच्या कक्षेत नसलेला अर्ध, अवचेतन भाग अतिशय मोठा आहे. परंतु आपल्या क्रिया-प्रतिक्रिया बहुतेक अवचेतन मनातून प्रगटलेल्या असतात. पूर्वजांकडून आनुवंशिकतेने प्राप्त झालेले गुणधर्म, बालपणापासून भोवतालच्या वातावरणातून झालेले संस्कार, आपल्या व्यक्तिगत अनुभवांतून झालेले शिक्षण इत्यादी बाबी आपल्या सचेतन मनाची जडणघडण करण्यात साहाय्यभूत ठरतातच. परंतु या सर्व गोष्टी सारख्या असूनही दोन जुळय़ा भावा-बहिणींचे स्वभाव अतिशय भिन्न असल्याचेही आपण नेहमी पाहतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना असे एक संस्कृत वचन आहे. प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगळा असतो. म्हणजे बाह्य जगाकडून आपल्यावर होणार्‍या क्रियेला प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद वेगवेगळा राहू शकतो. कोणत्या विषयात रुची घ्यायची, कोणत्या माहितीकडे दुर्लक्ष करायचे हे प्रत्येक व्यक्तीने अजाणताच ठरविलेले असते. एकाच घटनेमागील कारणांचे निष्कर्ष प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे आढळतात. बाह्य जगाविषयीचे एक स्वतंत्र चित्र प्रत्येक व्यक्तीच्या मनात अबोध पातळीवर बनलेले असते आणि ते वेगवेगळे असते. तसेच स्वत:च्या पिंडाचे, स्वभावाचे जोरदार समर्थनदेखील प्रत्येक व्यक्ती स्वत:शी करत असतो. तसे समर्थन त्याने केले नाही तर तो दुबळा ठरतो व त्याच्या व्यक्तीत्वाला टोक येत नाही. विकार, संवेदना, सद्गुण, दुगरुण, आळस, कर्तृत्व सारे काही आपल्या मनात आहे. भौतिक जगातील भौतिक घडामोडींइतकेच मानसिक घडामोडींचे क्षेत्र विशाल आहे. कोणता मानसिक पिंड/स्वभाव घेऊन जन्माला यावे हे व्यक्तीच्या हाती नाही. बौद्धिक आटापिटा करून तो बदलताही येत नाही. परिस्थितीच्या रेटय़ाने हादरून टाकणार्‍या विपरीत अनुभवातून होणार्‍या शिक्षणामुळे नाईलाजाने, जगणे अधिक सुसह्य व्हावे म्हणून थोडाफार स्वभावात बदल होतो पण तो वरवरचाच! शालेय शिक्षणामुळे स्वभाव बदलत नाही. आपल्या मनाच्या उथळ पृष्ठभागातच आपली जाणीव गुंतली असते. आपल्या पिंडाला साजेसे विश्लेषण बाह्य घटनांचे करून आपल्या आत आपोआप प्रतिक्रिया निर्माण होत राहतात. सहसा आपले मन सतत या भानगडीत गुंतले असल्यामुळे अशांत व अस्वस्थ असते. परंतु आपल्या पिंडाचा एक आंतरिक हिस्साही असतो, जो तुलनेने अधिक स्वस्थ असतो. त्याला आपण अंत:करण म्हणतो. पश्चात्ताप हा अंत:करणाच्या उपस्थितीमुळेच होतो व तो आपल्याला असंख्य वेळा होत राहतो. बहुधा एखाद्या आकस्मिक घटनेवर आकस्मिक प्रतिक्रिया दिल्यानंतर काही वेळाने मनाची उत्तेजना कमी झाल्यावर आपल्याला चुकल्यासारखे वाटते; कारण अंत:करणातून जाणिवेपर्यंत येणारी स्पंदने स्वीकारण्याच्या अवस्थेत आपण आधी नव्हतो व आता आलो. मन व अंत:करण या काय वस्तू आहेत हे आपण सर्व एका अबोध पातळीवर जाणतो, परंतु त्यांची व्याख्या करणे महाकठीण आहे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, विज्ञान, धर्म हे आपापल्या परीने मनाची व्याख्या करून पाहतात. परंतु आपली व्याख्या अपूर्ण आहे, याचेही भान सर्व शास्त्रांना आहे. अवचेतन मनात बुडी मारून त्याचा तळ शोधण्याचे मानसशास्त्रीय प्रयत्न व मज्जातंतूंच्या विद्युत-रासायनिक उत्तेजनांचा अभ्यास करून त्याद्वारे मनाची व्याख्या करू पाहणारे विज्ञानाचे प्रयत्नदेखील सध्यातरी प्राथमिक अवस्थेतच आहेत. ध्यान व योगासारख्या पद्धतींचा ताळमेळ वैज्ञानिक प्रयोगांशी करून मनाचा शोध घेण्याचे प्रयत्न अलीकडे सुरू झाले आहेत. मनापासून जाणिवेला वेगळे करून त्या जाणिवेच्या साहाय्याने स्वत:च्या मनाचा तळ शोधण्याच्या अनेक पद्धती प्राचीन काळापासून विकसित झालेल्या आहेत. (लेखक हे नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत) भ्रमणध्वनी - 9881574954

2 comments:

  1. लेखातील आपले विचार स्वतंत्र मूलगामी आहेत. अशा प्रकारच्या वैचारिक मांडणीत मला एक गोष्ट कायमच खटकत आली आहे. ती म्हणजे, इतर सर्व प्राणीमात्रांपेक्षा मानवाला वरचढ अथवा श्रेष्ठ ठरविण्याचा आपणा सर्व मनुष्य जातीचा प्रयत्न. हा केवळ अहंगंडच नव्हे तर हे कदाचित आपणा सर्वांचेच मूलभूत अज्ञान आहे. उत्क्रांती खरोखरच घडली की नाही याबाबत व्यक्तिशः माझ्या मनात संशय आहे, असे असले तरी आजच्या प्रचलित मान्यतेनुसार जर ती घडली असे गृहीत धरले, तर त्याद्वारे केवळ मानवच उत्क्रांत होऊन श्रेष्ठ झाला असे मानणे तर्कदृष्ट्या विसंगत वाटते. मानवाचे मन, बुद्धी ही वेगळी आणि श्रेष्ठ असे आपणच मानवांनी म्हणणे हे मनुष्य समाजाने केवळ आपणच आपली पाठ थोपटून घेण्यासारखे वाटते.एका छोट्या संदर्भात आज अमेरिकेत राहणाऱ्या अमेरिकनांना जसे अमेरिकेबाहेरील जग माहीतच नसते (कारण त्यांची भौतिक समृद्धी त्यांना सखोल विचारांपासून वंचित करते) तसे आपण सर्वांचे झाले आहे काय? माझ्या एका मित्राची याबाबत फिरकी(!)घेताना मी त्याला विचारले होते, 'माणसाची प्रगती झालेली आपल्याला जशी दिसते तशी घोड्यांची कुठे झालेली दिसते आणि अशी ती आपल्याला दिसत नाही त्या अर्थी ती झालीच नाही असा तुझा दावा असेल तर आपण घोड्यांना विचारू यात त्यांना तरी माणसाची प्रगती जाणवते का ते!' या प्रश्नातला विनोदाचा भाग सोडला तरी त्यात मला तथ्य दिसते ते असे की सर्व प्राणी आपापल्या वेगवेगळ्या पातळीवर जगतात. त्यात आधी उणे करणे चूक आहे. अस्तित्वाच्या एका पातळीवर आपला परस्परांशी संबंध येतो, पण ते आकलन कधीच परिपूर्ण असू शकत नाही. कुणा एकाने म्हटलेच आहे, The best proof for the supremacy of man in world is that no other being has so far challenged it!
    डॉ संजीव मंगरूळकर

    ReplyDelete
    Replies
    1. the very fact that human beings have been able to attain partial mastery over nature unlike other primates shows that humans are more advanced.We do not come across any evidence suggesting any history of civilization of other animals. i do agree that man should not be carried away by any sense of supremacy, because he is also a child of nature like plants and animals. The problem is the sense of separation.

      Delete