Tuesday, December 25, 2012
मुक्तीसाठीच माणूस कर्माची जबाबदारीने निवड करतो
सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली? आपल्या जीवनाचे काही प्रयोजन आहे काय? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तत्त्वज्ञानातून शोधण्याचा मानवाने जो प्रयत्न केला, त्यापैकी भौतिकवादी तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे व मर्यादा आपण मागील लेखांकामध्ये जाणून घेतल्या. भारतामध्ये अस्तित्वाच्या मुळाशी पोहोचण्याचे जे प्रयत्न झाले त्यांना 'दर्शनशास्त्र' असे नाव दिले. तत्त्वज्ञानाहून 'दर्शनशास्त्र' वेगळे यासाठी मानले गेले की, तत्त्वज्ञानामध्ये केवळ बुद्धीच्या आधारे तर्कदृष्टय़ा उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो. परंतु 'दर्शन' या शब्दामध्ये निव्वळ तत्त्वज्ञानापेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित अथवा गृहीत आहे. जाणिवेच्या एका उच्च अवस्थेमध्ये प्राप्त झालेले, अनुभूत झालेले ज्ञान म्हणजे 'दर्शन' अशी मान्यता भारतीय परंपरेत आहे. ध्यानमग्न अवस्थेत चेतनेच्या साहाय्याने सत्याचे जे स्वरूप प्राचीन ऋषिमुनींना, योग्यांना, तपस्वींना जाणवले त्याची त्यांनी बौद्धिक स्तरावर केलेली मांडणी म्हणजे त्यांचे 'दर्शन' होय. सांख्य दर्शनाचा उद्गाते कपिल मुनी, वेदोपनिषदांचे रचयिता मानले जाणारे वसिष्ठादी ऋषी, योगशास्त्राचा निर्माता पतंजली, सांख्य आणि योगाची वेदांताशी सांगड घालून भगवद्गीतेत समन्वयी तत्त्वज्ञान गुंफणारा श्रीकृष्ण, वेदांतील कर्मकांडाचा निषेध करून अनात्मवादाचा पुरस्कार करणारा व दु:खमय जीवनात तृष्णात्याग हाच धम्म असल्याची उद्घोष करणारा शाक्यमुनी गौतम बुद्ध, जीव आणि पदार्थ यांचे द्वैत असून त्यांचा कोणीही निर्माता ईश्वर नसल्याचे सांगणारा श्रमण तीर्थकर महावीर इत्यादी सर्व भारतीय तत्त्वज्ञ हे केवळ बुद्धिवादी पंडित नव्हते. आपापल्या जीवनात दीर्घकाळ खडतर तपश्चर्या करून त्यांना जे ज्ञान ध्यानधारणेतून प्राप्त झाले, त्याची मांडणी त्यांनी आपापल्या तत्त्वज्ञानातून केल्यामुळे त्या सर्वाच्या तत्त्वज्ञानास 'दर्शन' असे नाव प्राप्त झाले. अर्थात, यापैकी प्रत्येक महामानवास प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे संपूर्ण सत्य होय असे मानता येणार नाही. कारण आपापल्या ध्यानातून त्यांना जी अनुभूती प्राप्त झाली ती म्हणजे अस्तित्वाचे त्यांना कळलेले एक रूप मानता येईल. अस्तित्वाच्या संपूर्ण सत्याचे दर्शन त्यांना झाले असे मानणे योग्य नव्हे. शिवाय हे ब्रह्मंड आणि पृथ्वीवरील जीवन सतत विकासशील किंवा परिवर्तनशील असल्यामुळे हजारो वर्षापूर्वीचे दर्शन अपूर्ण व आंशिकच असणार.
अमर्याद सृष्टीचा एक अतिशय क्षुद्र घटक असलेला मानव त्या सृष्टीचे संपूर्ण रहस्य कधीच शोधू शकणार नाही, कारण अंशाला पूर्णाचे ज्ञान होऊच शकत नाही, असे मानणार्या तत्त्वज्ञानास 'अ™ोयवाद' म्हणतात. मात्र 'भौतिकवाद' अथवा 'अध्यात्मवाद' हे अ™ोयवादी नाहीत. भौतिकवादाच्या विचारानुसार सर्व सृष्टीचे कारण जड भौतिक पदार्थ किंवा ऊर्जा हेच असल्यामुळे यथाकाळ विज्ञानाच्या साहाय्याने सृष्टीतील सर्व रहस्यांची उकल मानवाला होणारच. अध्यात्मवाद हादेखील सृष्टीमध्ये जाणता न येण्यासारखे रहस्य आहे, असे मानत नाही. कारण प्रत्येक कणात किंवा जीवात पूर्णत्व सामावले असून स्वत:च्या शोधातून पूर्ण गवसू शकते, अशी अध्यात्मवादाची मान्यता आहे.जीव आणि पदार्थ किंवा पुरुष आणि प्रकृती असे दोन स्वतंत्र घटक सृष्टीत असून त्यांच्यात कोणतेही साम्य वा ऐक्य नाही, असे मानणार्या तत्त्वज्ञानास 'द्वैतवाद' म्हणतात. 'सांख्य दर्शन' व 'जैन दर्शन' हे द्वैतवादी आहेत. या दोन्ही दर्शनांमध्ये सृष्टी ही अनादी व अनंत मानलेली आहे. जी अभिव्यक्त झाली ती सृष्टी म्हणजेच प्रकृती आणि तिला जाणणारा, समजणारा तो पुरुष असा भेद कल्पिला आहे. पुरुषाने प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होणे म्हणजेच 'मोक्ष' होय. इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचा जो उपभोग जीव घेतो, त्याने त्याची तृष्णा वाढतच जाते. म्हणून जीवन दु:खमय होते. तृष्णा नष्ट होऊन निदरेष जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट होय, अशीच मांडणी थोडय़ाफार फरकाने बौद्ध, जैन, सांख्य या भारतीय तत्त्वज्ञानांमध्ये आढळून येते. या तिन्ही दर्शनांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. तसेच त्यांनी आत्म्याचेही अस्तित्व नाकारले आहे. परंतु तरीही ही दर्शने भौतिकवादी नाहीत, कारण जीव किंवा पुरुष हा अ-भौतिक घटक प्रकृतीपेक्षा वेगळा मानून प्रकृतीच्या बंधनातून जीवाला मुक्त करण्यावर त्यांचा भर आहे.
लोभ, भय, अहंकार, तृष्णा इ. विकांरातून मुक्त झालेला हा जीव जाईल कुठे? बौद्ध मतानुसार विश्वातील सर्व वस्तू नाशवंत किंवा अनित्य आहेत. देहाच्या मृत्यूनंतर जीवाचा नाश होत नसला तरी अविनाशी, नित्य, सनातन असे कोणतेही तत्त्व अस्तित्वात नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या देहाचे भौतिक घटक हे वैश्विक भौतिक घटकांमध्ये विलीन होतात. मात्र मानसिक किंवा भावनिक घटक मात्र पूर्णत: विलीन होत नाहीत. कर्म व त्यांचे परिणाम यांची एक साखळी पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. परंतु जो पुनर्जन्म होतो, तो अविनाशी आत्म्याचा होत नसून कर्माचे परिणाम भोगणार्या जीवाचा होतो. कर्माला कारणीभूत असणारी तृष्णा जर संपली तर जीवाच्या पुनर्जन्माचे कारणही संपुष्टात येईल व तो जीवही विलीन होईल, म्हणजे परिनिर्वाण साधेल, अशी थोडक्यात भगवान बुद्धांची मांडणी दिसते. संसाराचे हे चक्र कोणी ईश्वर वा परमात्मा चालवीत नसून कर्मामुळेच ते चक्र चालते, कारण प्रत्येक कर्माचा परिणाम हा असतोच. कर्माची प्रेरणा इच्छा, वासना (तृष्णा), हेवा यांसारख्या भावनांमधून उत्पन्न होते आणि दु:ख हाच कर्माचा मुख्य परिणाम आहे. व्यक्ती आपल्या आंतरिक साधनेद्वारे तृष्णेचा त्याग करू शकतो. त्यामुळे तो दु:खमुक्त होईल व संसारचक्रातून त्याची सुटका होईल.
प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत तपस्येवर किंवा साधनेवर भगवान महावीरानेही (जैन दर्शनाने) भर दिला. अनादी अनंत अशा आत्म्याचे व सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा ईश्वराचे अस्तित्व त्यानेही नाकारले. परंतु सृष्टी अनित्य, विनाशी आहे असे मात्र जैन दर्शन मानत नाही. त्यांच्या मते जीव भौतिक सृष्टी हे अनादी-अनंत असून कर्मबंधनापासून मुक्त झालेले जीव हे आणखी उच्च लोकांत वास करतात. मात्र पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन या जीवनापासून मुक्ती मिळविणे हेच असल्याची मांडणी बौद्ध व जैन या दोन्ही दर्शनांमध्ये समान आढळते. थोडय़ाफार फरकाने अशीच मांडणी शंकराचार्यांच्या मायावादातही आढळून येते. शंकराचार्यांनी अमर, अविनाशी आत्म्याचे व सर्वव्यापी, सनातन ब्रह्मचे अस्तित्व असल्याचे जरी प्रतिपादन केले तरी व्यक्तसृष्टी किंवा प्रकृती ही केवळ आभासात्मक माया असल्यामुळे आत्म्याचा भ्रम नाहीसा होऊन (म्हणजे तो या लौकिक जीवनाच्या मोहातून मुक्त होऊन) स्वत:च्या ब्रह्मरूपी मूळ स्वरूपात विलीन होणे, हेच त्यांच्याही मते जीवनाचे खरे उद्दिष्ट ठरते. कर्म-बंधनातून मुक्ती मिळावी या इच्छेने मनुष्य निदान नैतिक अंगाने तरी बर्यावाईटाचा विचार करून जबाबदारीने कर्माची निवड करू शकतो, हा वरील तिन्ही दर्शनांचा लौकिक अर्थाने चांगला भाग मानता येईल. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ आपण भोगत आहोत. ते पूर्वकर्म बदलणे आपल्या हाती नाही. परंतु भविष्यात किंवा पुढील जन्मी आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू नये म्हणून अनैतिक कर्म करू नये. लोभ, मोह, मद, अहंकार बाळगू नये व दुसर्या व्यक्तीला दुखवू नये; इतक्या सामान्य अर्थाने सामान्य जनांच्या पातळीवर या दर्शनांचा प्रसार झाला. मात्र जीवनापासून पलायन करणे हाच जीवनाचा खरा उद्देश होय, असा जो खोल अर्थ वरील तत्त्वज्ञानांमध्ये गृहीत आहे, तो बुद्धीला न पटणारा, विज्ञानाच्या व काळाच्या कसोटीवर न उतरलेला आहे. शून्यात अथवा ब्रह्मत विलीन होणे किंवा पृथ्वीलोक सोडून अन्य (स्वर्गासम) लोकांत वास करणे, हेच जर मानवी जीवनाचे उद्दिष्ट असेल तर जीवनाचा विविधांगी विकास का झाला? आणि जगण्याची व आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा इतकी मूलभूत स्वरूपात का टिकून राहिली?
Friday, December 14, 2012
चैतन्याच्या अनुभूतीचे वस्तुनिष्ठ संशोधन आवश्यक
विश्वाच्या व आमच्या जीवनाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय, याबाबत परस्परविरोधी धारणा असलेले भौतिकवाद व अध्यात्मवाद हे दोन विचारप्रवाह समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील एका लेखात भौतिकवादाची तात्त्विक भूमिका थोडक्यात मांडली होती. सृष्टीच्या मुळाशी केवळ जड/निश्चेतन पदार्थ/ऊर्जा असून कोणतीही ज्ञानी, चैतन्यमय अथवा सामर्थ्यशाली अशी वेगळी शक्ती नसल्याचा भौतिकवादाचा दावा आहे. सर्व प्रकारचे चैतन्य हे जडातूनच उगवले असून कोणत्याही जीवाला/चेतनेला देहाबाहेर वेगळे अस्तित्व नसते. सृष्टीच्या निर्मितीमागे कोणताही हेतू नाही. मनुष्य हाच ज्ञात सृष्टीतील सर्वात ज्ञानी व समर्थ प्राणी असल्यामुळे कशासाठी जगायचे हे मानवालाच ठरवायचे आहे. ईश्वर ही एक काल्पनिक धारणा असून त्याच्या प्राप्तीसाठी खटाटोप करणे निर्थक असते. ईश्वराच्या कल्पनेने, त्याच्या कोपाच्या भयाने व त्याच्या प्राप्तीच्या इच्छेने मानवाला नैतिक वागणुकीचे वळण मिळते ही बाब काही प्रमाणात खरी असली, तरी त्यातून दांभिकताही बळावते व धार्मिक मनुष्य अधिक दांभिक असल्याचे दिसून येते. त्यापेक्षा सत्य जाणून मनुष्याने स्वत:ची व समाजाची फसगत न करणे इष्ट ठरेल. अशा प्रकारची भौतिकवादाची थोडक्यात तात्त्विक मांडणी आहे.
भौतिकवादी मनुष्य हा जसा व्यक्तिवादी, आत्मकेंद्रित व स्वार्थपरायण असू शकतो, तसेच तो समाजशील, मानवतावादी व अत्यंत त्यागीदेखील असू शकतो. तो मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, लोकशाही राज्यव्यवस्थेचा समर्थक, हुकूमशाही किंवा सैनिकशाहीचा पाठीराखा अथवा लोकशाही, समाजवादाचा, साम्यवादाचा वा अराजकवादाचादेखील पाईक असू शकतो. सारांश, भौतिकवादी विचारसरणीमध्ये वरील सर्व आर्थिक/राजकीय विचारांना स्थान आहे. सामाजिक बाबतीत भौतिकवादी मनुष्य समाजव्यवस्था टिकून रहावी व माणसांनी एकमेकांसोबत सलोख्याने रहावे या कारणांसाठी नैतिक आचरणाचा आग्रह धरू शकतो. तसाच तो स्वत:ला मृत्यूनंतर अस्तित्व राहणार नसल्याच्या धारणेमुळे बेबंद, चंगळवाद व अनैतिक जीवन जगण्याचेही समर्थन करू शकतो.
वस्तुनिष्ठ (जलक्षशलींर्ळीश) व तर्कशुद्ध (ीरींळेपरश्र) विचार करण्याची शिस्त, ही भौतिकवादाने मानवजातीला दिलेली अमूल्य देणगी मानावी लागेल. तशी शिस्त नसली आणि आपल्याला
अंत:स्फूर्तीने एखाद्या वस्तूचे वा विषयाचे आकलन झाल्यासारखे वाटले तर त्या आकलनात आपले पूर्वग्रह, स्वभावाची बैठक, प्राणिक आवेग वगैरे मिसळून व्यक्तिगणिक आकलनात फरक पडू शकतो.
भौतिकवादी विचारसरणीची आमच्या मानवी समाजाला दुसरी देणगी म्हणजे विज्ञानाचा प्रसार ही होय. सर्व वैज्ञानिक भौतिकवादी विचाराचे नसतात. किंबहुना अध्र्याहून अधिक वैज्ञानिक वा शास्त्रज्ञ हे ईश्वरावर श्रद्धा असणारेच आढळतात. परंतु मागील 3-4 शतकांमध्ये तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात भौतिकवादी विचारसरणीचे प्राबल्य पाश्चात्त्य देशांमध्ये बळावले. त्यामुळे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध विचारांना मोलाचे स्थान मिळाले. ती शिस्त बाळगून सृष्टीरचनेतील नियम व त्यामागील तत्त्वे शोधून काढण्याकडे प्रगत बुद्धीच्या मानवाचा कल वाढला. त्यांनी संशोधनामध्येही अशीच शिस्त बाळगली. एखाद्या पदार्थाच्या अथवा ऊर्जेच्या विशिष्ट वर्तणुकीला जर 'नियम' म्हणायचे असेल, तर त्या पदार्थाची वा ऊर्जेची समाजन वातावरणात सर्व काळी व सर्व जागी तशीच वर्तणूक आढळून येणे आवश्यक मानण्यात आले. असे घडले तरच विज्ञानदृष्टय़ा तो नियम सिद्ध झाल्याचे मानले जाते. वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण करणारा वैज्ञानिक त्या निरीक्षणात स्वत:चे पूर्वग्रह, धारणा, संस्कार, इच्छा इत्यादींचे मिश्रण होऊ देत नाही. ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असणारे वैज्ञानिक /शास्त्रज्ञदेखील याच पद्धतीने वस्तुनिष्ठ दृष्टी बाळगून प्रयोग करतात व प्रयोगात आढळणार्या घटनांचे तर्कशुद्ध बुद्धीने विश्लेषण करतात. तसे त्यांनी केले नाही तर विज्ञान प्रगतीच करू शकणार नाही. विज्ञानाच्या घोडदौडीमुळे मानवजातीला जे अद्भुत लाभ झाले आहेत, त्यांचे श्रेय बर्याच अंशी भौतिकवादाला निश्चितपणे दिले पाहिजे.
परंतु काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भौतिकवाद समाधानकारक अशी देऊ शकत नाही. ही अफाट सृष्टी केवळ अपघाती योगायोगांच्या लांबलचक मालिकेतून निर्माण झाली व कार्यरत आहे, हा भौतिकवादी विचार बुद्धीचे व मनाचेदेखील सर्वागीण समाधान करू शकत नाही. सभोवतालच्या व दूरवरच्या सृष्टीचे आम्ही अधिक बारकाईने निरीक्षण केले तर ही बुद्धिहीन, आंधळय़ा जड पदार्थाची/ऊर्जेची करामत वाटत नाही. वनस्पती, कीटक, पशुपक्षी व मानवात असलेले चैतन्य जडातूनच उगवले असे मानले, तरी ते चैतन्य बीजरूपाने जडात वास करत असणारच! त्याशिवाय ते उगवणार कसे? शिवाय आमच्या ज्ञानेंद्रियांना व तार्किक बुद्धीला जे कळत नाही, ते अस्तित्वात असूच शकत नाही, असे मानणे योग्य नाही. कारण मानवाच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीलाही मर्यादा आहेत. मानवाच्या व मानवसदृश प्राण्यांच्या उत्क्रांतीक्रमातील आगमनापूर्वीचे प्राणी-जगतदेखील असे म्हणू शकले असते की, तर्क-बुद्धी नावाची गोष्ट या सृष्टीत अस्तित्वात असूच शकत नाही! आमच्या अंतर्मनाचे व मनाच्या अवचेतन भागाचे नियमन व नियंत्रण करणारी आमच्या जागृत मनापेक्षा अधिक ज्ञानी असणारी यंत्रणा कार्यरत असते, हेदेखील आपण स्वत:चे निरीक्षण केल्यास समजू शकतो. जडाच्या आधारे चैतन्याचा अधिकाधिक विकास साधणे, अशी स्पष्ट दिशा उत्क्रांतीमध्ये आढळून येते. सृष्टीच्या मुळाशी जर फक्त अज्ञानी जड तत्त्वच असते तर त्याला ही नेमकी दिशा कशी धरता आली असती? एखाद्या आंधळय़ाने धडपडत, चाचपडत, झोकांडय़ा खात वाटचाल करावी तसे उत्क्रांतीचे स्वरूप दिसते खरे, परंतु त्या वाटचालीला एक निश्चित दिशा आहे, त्यात एक सुसंगती आहे, ती कुठून आली? शिवाय प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगण्याची व वंशवद्धीची जी उपजत, मूलभूत व बलवान प्रेरणा आढळून येते, तिच्या उगमस्थानाचा व कारणाचा समाधानकारक खुलासा भौतिकवाद करत नाही. जर सृष्टीच्या मुळाशी अचेतन, जड तत्त्वच असेल, तर ते जडभौतिक तत्त्व सजीवांच्या रूपात चेतनेला टिकवून ठेवण्यासाठी व वृद्धिंगत करण्यास असा आणि इतका अट्टाहास कसा करू शकेल? जगत राहण्याची व अधिकाधिक सचेतन होत राहण्याची ही आदिम प्रेरणा भौतिक पदार्थातून उगवणे शक्य वाटत नाही.
पृथ्वीवर काही वेगवेगळय़ा जागी आजपावेतो असंख्य मानवांना जी इंद्रियातीत चैतन्याच्या अस्तित्वाची अनुभूती झाली आहे, त्या अनुभूतीचे अधिक वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, संशोधन व आकलन करणे आवश्यक आहे. तसे न करता उथळपणे 'तो त्यांचा भ्रम होता' असे झटकून टाकणे उचित नव्हे. विशेषत: तशा अनुभूती येणार्या व्यक्तींचे आंतरिक व बाह्य जीवन बदलते काय व कशा प्रकारचे ते बदल होतात, याबाबतदेखील अद्याप पुरेसे संशोधन वस्तुनिष्ठपणे झालेले आढळून येत नाही. अतिंद्रिय वा आध्यात्मिक अनुभूतींचे व ज्यांना त्या अनुभूती येतात, त्या व्यक्तींचे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारे संशोधन करणे भौतिकवादी व्यक्तींना कठीण जाते. कारण तशा विज्ञाननिष्ठ संशोधनाकरिता 'ज्ञात भौतिक सृष्टीखेरीज वेगळे असे काहीही अस्तित्वात नाही' हा आपला पूर्वग्रहदेखील बाजूला ठेवावा लागतो.
ज्या सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थकणांचे व ऊर्जेच्या तरंगाचे सैद्धांतिक स्वरूपात का होईना, (गणिती पद्धतीने) अस्तित्व विज्ञानाला शक्य वाटत आहे, त्या सूक्ष्म कणांचे अथवा ऊर्जा-लहरींचे अस्तित्व शे-दीडशे वर्षापूर्वी वैज्ञानिकांना माहीतही नव्हते. हिग्ज-बोसॉन (गॉड पार्टिकल) या अणूतील सूक्ष्म कणाचे अस्तित्व केवळ गणितीय आधारावर शक्य मानले जात होते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा तर नुकताच मिळाला. सृष्टीमध्ये आम्हाला माहीत असलेल्या तत्त्वाखेरीज इतरही तत्त्व अस्तित्वात असू शकतात, ही संभावना विज्ञानाला नेहमी गृहीत धरावी लागते. भौतिक अथवा जड पदार्थाच्या सर्वात सूक्ष्म स्वरूपाचा शोध घेताना फोटॉनसारखे अतिसूक्ष्म कण ऊर्जातरंगाच्या रूपातदेखील वावरत असल्याचे विज्ञानाला आढळून आले. त्याहून अधिक सूक्ष्मात शोध घेता-घेता कदाचित भौतिक-अभौतिक असा भेददेखील वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Tuesday, November 27, 2012
भ्रामकशक्तीवरील विश्वासामुळे माणूस हतबल होतो
याविश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? या प्रश्नांचा वेध विज्ञान घेत नाही. हे विश्व कसे निर्माण झाले व त्यातील पदार्थाच्या किंवा ऊर्जेच्या विशिष्ट स्थिती व हालचालींमागे कोणते नियम किंवा सूत्र दडले असतात, हे शोधण्याचे कार्य विज्ञान करते. प्रत्येक शास्त्राने स्वत:भोवती एक मर्यादा आखून घेतली असते आणि त्या मर्यादेमुळेच संशोधनात शिस्त बाळगून नेमक्या दिशेने वाटचाल करता येते. असे असले तरी आपापल्या विषयातील काही गूढ समस्यांची उकल होण्यासाठी इतर विषयांच्या साहाय्याने संशोधन करणे भाग पडते. जसे पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांना एकमेकांच्या व गणिताच्याही मदतीची गरज भासते. त्याचप्रमाणे जीवशास्त्राला (बायोलॉजी) देखील पदार्थविज्ञान (फिजिक्स) व रसायनशास्त्राची (केमिस्ट्री) मदत घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकता येत नाही. सृष्टीचे अधिक गुंतागुंतीचे व्यवहार शोधण्यासाठी नवनव्या विज्ञानशाखादेखील उघडण्यात आल्या आहेत.
विश्वाची निर्मिती का व कशासाठी झाली? आमच्या जीवनाचे प्रयोजन काय? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणार्या शास्त्राला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक विचारांचा जो शिरकाव आहे, त्याला तूर्त बाजूला ठेवून आपण या विश्वाच्या व जीवनाच्या प्रयोजनाबाबत केवळ दोन परस्परविरुद्ध प्रवाह जाणून घेण्याचा प्रयत्न करू.जे दोन मतप्रवाह भौतिकवाद व अध्यात्मवाद या नावांनी ओळखले जातात. या दोन्ही विचारसरणींना पुन्हा अनेकानेक शाखाही फुटलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या बुद्धीला व अंत:करणाला काही अंशी समाधान प्राप्त करून देणार्या शाखांमधील उत्तम व उन्नत अंश एकत्रित करून आपण प्रथम भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा विचार करू.
भौतिकवाद असे मानतो की, या सृष्टीच्या मुळाशी कोणतीही चैतन्यमय, ज्ञानयुक्त शक्ती नसून केवळ जडपदार्थ किंवा ऊर्जा आहे. प्राण, मन, बुद्धी हे तत्त्व जडातूनच विकसित झाले असून पदार्थमय भौतिक देहाच्या बाहेर त्यांचे वेगळे अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे या सृष्टीत ईश्वर अथवा आत्म्याचे तर मुळीच अस्तित्व नाही. मृत्यूनंतर सर्व प्राण्यांचे अस्तित्व संपते. पुनर्जन्माच्या कल्पनेला कोणताही आधार नाही. सृष्टीचे संचालन तिच्या पदार्थाच्या अंगभूत गतितत्त्वांनी व नियमांनी होत असते. बाहेरून सृष्टीचे नियमन वा विकास करणारी शक्ती कोणतीही नाही. जडपदार्थातून पृथ्वीवर जीवन उगवले, ते पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या विशिष्ट अंतरामुळे व येथील वातावरणामुळे. तसेच प्रतिकूल पर्यावरणाशी झुंजत इथे प्राण्यांचे अनेकानेक प्रकारचे देह घडत गेले व स्वाभाविकपणे त्यापैकी काही प्राणीजातींमध्ये मनाचा व बुद्धीचा विकास होत गेला. मनाशी व बुद्धीशी संबंधित प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असतात. मानवाचा मेंदू सर्वात मोठा असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांच्या तुलनेत भावभावना, कल्पकता व बुद्धी अधिक आहे.
मनुष्येतर प्राण्यांना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान नसते. त्यांच्या सर्व प्रेरणा उपजत व नैसर्गिक असतात. त्यामुळे ते सर्व प्राणी निसर्गाचाच एक अभिन्न भाग असल्यासारखे जगतात. त्यांच्यात व बाह्य सृष्टीत आंतरिक एकत्व असते. परंतु मानवामध्ये मन-बुद्धीच्या विकासाने एक वेगळाच टप्पा गाठला. मी व बाह्य जग या वेगवेगळ्या वस्तू आहेत, असे भान मानवाला त्याच्या आदिम अवस्थेपासून प्रकर्षाने आले. बाह्य जग सुंदर, कृपाळू आहे तसेच ते प्रसंगी हिंस्र व क्रूरही वागत असल्याचा नित्य अनुभव मानवाला येतो. आईच्या गर्भात एकत्वाची अनुभूती घेत पहुडलेले बालक जसे बाहेर येताच असुरक्षित वाटून भयभीत होतो तसेच काहीसे निसर्गापासून तुटल्याच्या जाणिवेने मानवाचे झाले. त्याला हे वेगळेपण नकोसे वाटते. त्यामुळे ते एका विश्वव्यापी ईश्वराची कल्पना करून त्याच्याशी तादात्म्य साधू पाहतो. आपल्या एकाकीपणावर व दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्या काल्पनिक विश्वेश्वराची भक्ती हा चांगला उपाय त्याला वाटतो.
शिवाय वादळवारे, अतिवृष्टी, वणवे, भूकंप, ज्वालामुखींचे स्फोट, पूर यांसारखे निसर्गाचे रौद्ररूप आणि इंद्रियांना सुखावणारे लोभस रूप अशी दोन्ही रूपे न्याहाळताना प्रत्येक प्राकृतिक शक्तींचे नियंत्रण करणारी एखादी देवता असावी व त्या देवतेचा रोष झाल्याने नैसर्गिक संकटे येत असावी, अशीही
आदिमानवाची समजूत झाली. त्यामुळे मरुत, वरुण, सूर्य, इंद्र अशा देवता विविध नैसर्गिक शक्तींच्या कारक असल्याचे कल्पून यज्ञासारख्या विधीने त्या देवतांना आवाहन करणे व आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंची आहुती देऊन त्या देवतांना प्रसन्न करून घेणे, अशासारखे उपाय मनुष्य करू लागला.
ईश्वराचे अथवा देवतांचे अस्तित्व कल्पून त्यांची पूजा करणे, भक्ती करणे ही मानवी मनाची वरील कारणांमुळे गरज होती. प्रतिकूल सृष्टीत जिवंत राहण्यासाठी या कल्पनेने त्याला भक्कम आधार दिला. या सृष्टीत शाश्वत असे काही असेल तर ती केवळ भौतिक पदार्थमय ऊर्जा होय. जीवन अशाश्वत असते. जीवनापूर्वी व मृत्यूनंतर प्राण्यांचे कोणतेही अस्तित्व नसते. आत्मा-परमात्मा नावाची कोणतीही वस्तू व शक्ती नाही. सृष्टीचा कोणी निर्माता नाही. असा कोणी निर्माता असता तर ब्रह्मंडात व पृथ्वीवरसुद्धा जी अतिशय उधळमाधळ आढळून येते, तशी ती राहिली नसती. उत्क्रांती ही एक सरळ रेषेत व्यवस्थितपणे आखीव स्वरूपात झाली असती. पृथ्वीवरची निसर्गाची एकूण उत्क्रांती ही झोकांडय़ा खात, चाचपडत, धडपडत, चुकतमाकत, आंधळ्याने वाट शोधावी तशी झालेली दिसते. ईश्वराला जीवनाचा विकास जर सृष्टीत करावयाचा होता, तर हे करोडो-करोडो ग्रह-तारे, बहुतांश जीवरहितच दिसतात. आपल्या सूर्यमालेत तर फक्त पृथ्वीवरच जीवन उमलल्याचे दिसते. शिवाय जीवन कष्टमय, यातनादायी आहे. भोवतालचे पर्यावरण हे जीवनास पोषक कमी व मारकच जास्त आहे. शिवाय क्रौर्य, हिंसा, दुष्टावा, मत्सर, दारिद्रय़, शोषण या बाबी ईश्वराने का निर्माण कराव्या? तो परपीडनात आनंद घेणारा (सॅडीस्ट) आहे काय?
ईश्वर, आत्मा, परमात्मा, देवदेवता यांच्या असण्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. भ्रामकशक्तींवर विश्वास ठेवून मनुष्य हतबल व परावलंबी होतो. जी शक्ती अस्तित्वातच नाही ती आपले साहाय्य कशी करणार? कोणत्याही अतिभौतिक शक्तीच्या असण्यावर विश्वास ठेवणे व आपल्या समस्या सोडविण्यासाठी अशा शक्तीच्या साहाय्याची याचना करणे म्हणजे अंधश्रद्धेपायी आत्मवंचना करून स्वसामर्थ्य गमावून बसणे होय.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Monday, November 19, 2012
उजवं मन सर्जनशील, तर डावं विश्लेषण करणारं
मानवी मेंदूच्या निओ कॉर्टेक्स नावाच्या वरच्या आवरणातील डावे व उजवे अर्धगोल कशा प्रकारे काम करतात हे डॉ. जिल टेलर या प्रसिद्ध अमेरिकन मेंदूरचना शास्त्रज्ञाने तिला स्वत:ला तरुण वयात जेव्हा पॅरालिसीसचा झटका आला त्या वेळी प्रत्यक्ष अनुभवले व तिच्या अनुभवांचे कथन चित्रा बेडेकर यांनी 'मेंदूच्या अंतरंगात' या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सामान्य वाचकांना समजणार्या पद्धतीने केले आहे. वैज्ञानिकांसाठी असा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत दुर्मिळ असतो. मेंदूतील असंख्य मज्जातंतूच्या जाळ्याची रचना समजून घेणे व बाहेरून ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या माहितीवर प्रक्रिया होत असताना मेंदूतील हे मज्जातंतूंचे वेगवेगळे सर्किटस् कशा प्रकारे उद्दीपित होतात याचे निरीक्षण व परीक्षण दुसर्या व्यक्तींवर प्रयोग करून शास्त्रज्ञांकडून केले जाते; परंतु मेंदूच्या एका भागात बिघाड झाल्यावर दुसरा भाग कार्यरत असताना नेमका कसा अनुभव येतो, हे डॉ. जिल टेलर यांना स्वत:च्या आजारपणात अनुभवता आले व आपल्या शास्त्रीय माहितीच्या प्रत्यक्ष अनुभवासोबत पडताळा घेऊन त्यांनी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांची कार्यपद्धती जगाला विशद केली. त्या अगदी भिन्नभिन्न कार्यपद्धती चित्रा बेडेकर यांच्याच शब्दात मागील लेखांकापासून आपण वाचत आहोत. कोणत्याही घटनेचे डावा अर्धगोल सुटय़ासुटय़ा तुकडय़ांद्वारे भूतकाळाशी त्या घटनेला जोडून विश्लेषण करतो व याउलट उजवा अर्धगोल मात्र समग्रपणे केवळ वर्तमानात व सर्व विश्वाची जुळवून ती घटना समजून घेतो असा मूलभूत फरक आपण पाहिला. त्यासंदर्भात चित्रा बेडेकर पुढे लिहितात : दोन अर्धगोलांमध्ये दडलेल्या आपल्या
व्यक्तिमत्त्वातल्या दोन भिन्न प्रवृत्ती कोणत्याही गोष्टींचा भिन्न प्रकारे विचार करतात. भावनांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्करण करतात आणि आपल्या शरीरावरसुद्धा वेगळ्या प्रकारचे परिणाम घडवून आणतात. डाव्या आणि उजव्या अर्धगोलांमुळे दिसून येणार्या प्रवृत्तींचा ढोबळमानाने आढावा घेतला तरी त्यांच्यातला फरक प्रकर्षाने जाणवतो.
आपल्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलाला जगाची पर्वा नसते. तो फक्त वर्तमान क्षणाचाच विचार करतो. म्हणून उजव्या मनाची प्रवृत्ती आनंदी, उत्साही, स्नेहमय असते. उजवं मन कृतज्ञतेने भरलेलं असतं. ते मन समाधानी, दयाळू, संवर्धन जोपासणारं आणि चिरंतन आशावादी असतं. तुलना करणं, न्यायनिवाडा करणं ही त्याची प्रवृत्ती नसते. उजव्या मनासाठी सर्व काही सलग, अखंड, एकमेकांपासून वेगळं न करता येण्याजोगं असतं. त्यामुळे उजवं मन सर्व काही, सर्व जण यांना समान लेखतं.
उजव्या मनाची प्रवृत्ती धाडसी, समृद्धीची स्तुती करणारी, सामाजिकरीत्या जुळवून घेणारी असते. ते मन शब्दांपलीकडच्या संवादाला अतिशय संवेदनशील असतं. सहानुभाव बाळगणारं असतं. दुसर्यांच्या भावना बिनचूक ओळखणारं असतं. आपण ज्याला दैवी शक्ती, अंत:प्रेरणा किंवा सर्वोच्च जाणीव म्हणतो त्याचं अधिष्ठान आपल्या उजव्या मनात असतं.
नेहमीच्या चौकटीच्या आणि बंधनांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची उजव्या मनाची प्रवृत्ती असते. त्यामुळे वर्तमान क्षणातल्या सर्व शक्यता पडताळून नवा दृष्टिकोन बाळगण्याची त्या मनाची वृत्ती असते. उजवं मन अतिशय सर्जनशील असतं आणि गोंधळ ही सर्जनशीलतेची पहिली पायरी असते याचा ते मन स्वीकार करतं. ते अतिशय चपळ, चंचल असतं. शरीरातल्या पेशींकडून येणार्या सूक्ष्म संदेशांना, सूक्ष्मातिसूक्ष्म सूचनांना उजवं मन अतिशय संवेदनशील असतं. अनुभवातून आणि स्पर्शातून ते मन सतत काहीतरी शिकत असतं.
उजव्या मनाला भूतकाळाचं ओझं बाळगण्याची गरज नसते आणि भविष्यात काय घडेल याची चिंता नसते. त्यामुळे वर्तमान क्षणातलं स्वातंर्त्य ते मन साजरं करतं. आपल्या केवळ शरीराचंच नव्हे, तर मनाचंसुद्धा स्वास्थ्य सांभाळण्याची जबाबदारी उजव्या मनावर सोपवलेली असते. उजवं मन सृष्टीतल्या सर्व गोष्टीत, प्राणिमात्रात समानता शोधत असतं. माणुसकीला ते मन सर्वाधिक मौल्यवान मानतं.
या तुलनेत डाव्या अर्धगोलाच्या प्रवृत्तीत खूपच फरक असतो. आपलं डावं मन बारीकसारीक तपशिलांनी ओतप्रोत भरलेलं असतं आणि आयुष्याला घडय़ाळाच्या काटय़ावर चालवणारं असतं. माणसाच्या एकूण प्रवृत्तीची गंभीर बाजू या डाव्या मनाकडे सोपवलेली असते. भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमान क्षणात निर्णय घेणारं ते मन असतं. वेगळेपणाच्या, भिन्नतेच्या काटेकोर मर्यादा सदैव लक्षात घेत चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक यासंदर्भात निवाडा करत असतं. वर्तमान क्षणाची उजव्या मनाने जमवलेली सर्व माहिती आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन डावं मन त्या माहितीला व्यवस्थित हाताळण्याजोग्या पद्धतीने रचून ठेवतं. भाषा हे डाव्या मनाचं विचार करण्याचं माध्यम असतं आणि खुद्द डावं मन हे माणसाचं बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचं माध्यम असतं. सतत चालणार्या आत्मसंवादातून आपण इतर जगापेक्षा अलग आहोत याचं भान आपल्यामध्ये डावं मन सदैव जागृत ठेवत असतं. आपल्याकडे येत राहणार्या माहितीचं उत्तम व्यवस्थापन करण्याची आणि चिकित्सकपणे त्या माहितीचं काटेकोर विश्लेषण करण्याची प्रचंड क्षमता डाव्या मनाकडे असते. ते मन पूर्णतावादी (परफेक्शनिस्ट) असतं. एकाच वेळी अनेक कामं करण्याची विलक्षण हातोटी डाव्या मनाकडे असते. क्रमवारीने विचार करण्यात वाकबगार असल्यामुळे प्रत्यक्ष जबाबदार्या हाताळण्याचं त्या मनाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असतं. वेगवेगळी न्यूरोसर्किट्स ओळखण्याची निसर्गदत्त देणगी डाव्या मनाला लाभलेली असते. अशा न्यूरोसर्किट्सच्या मदतीने प्रचंड माहितीचा क्षणार्धात फडशा पाडण्याचं कसब त्या मनाकडे असतं.
डाव्या मनाकडे आणखी एक अजब गुण असतो. बाहेरच्या जगाकडून अव्याहत येत असलेल्या माहितीचा अर्थ लावण्यासाठी त्या माहितीला सूत्ररूपात गुंफण्याचं किंवा त्यातून कथासूत्र रचण्याचं चातुर्य त्या मनाकडे असतं. पण प्रत्यक्ष मिळणार्या माहितीत जर कुठे त्रुटी असतील तर स्वत:च त्या त्रुटी भरून काढण्याची चलाखी डाव्या मनाकडे असते. बेमालूम कथानक रचून तेच सत्य म्हणून पुढे रेटण्याची विलक्षण हातोटी या मनाकडे असते. त्यामुळे आपल्याला खरं किती ठाऊक आहे आणि 'आपल्याला ठाऊक आहे' असं आपल्याला किती वाटतंय या दोन्हीत प्रचंड तफावत असू शकते.
या पचेंद्रियांच्या पलीकडे असणारं एक सहावं इंद्रिय म्हणजे आपल्या मेंदूचा उजवा अर्धगोल. त्याचा पुरेपूर अनुभव जिलने स्ट्रोकनंतर सात-साडेसात वर्षे घेतल्यामुळे ऊर्जेचं गतिशास्त्र (एनर्जी डायनॅमिक्स) आणि अंत:स्फूर्ती याविषयी ती स्वानुभव सांगते. जिलच्या म्हणण्यानुसार आपण सर्व जण ऊर्जायुक्त सजीव आहोत. विश्वातल्या ऊर्जेचं आकलन करून तिचं न्यूरॉन्सच्या सांकेतिक लिपीत रूपांतर करण्यासाठी आपल्या मेंदूची रचना झाली आहे. आपल्या पचेंद्रियांमार्फत ऊर्जेचं आकलन करून घेण्याच्या कामात डाव्या अर्धगोलाची मर्यादा आडवी येते; परंतु अंत:स्फूर्तीने सूक्ष्मातल्या सूक्ष्म ऊर्जेचं गतिशास्त्र आकलन करून घेण्यासाठी उजव्या अर्धगोलाची रचना झाली आहे. स्ट्रोकच्या अनुभवानंतर आपल्या अंत:प्रेरणेचा पुरेपूर वापर जिल करीत असते.
डॉ. जिल टेलर यांच्या मते, दुसर्याच्या जखमेवर हात ठेवून आपण ध्यानधारणा करून ती जखम बरी व्हायला मदत करू शकतो. रेकी, फेंगशूईसारख्या पद्धतींमध्ये ऊर्जेच्या गतिशास्त्राचं विज्ञान दडलं असावं, असं त्याचं मत दिसते. अंत:प्रेरणेने ऊर्जेच्या गतिशास्त्राचं कसं आकलन आणि उपयोग करायचा याची आपल्या उजव्या मनाला संपूर्ण स्पष्टता असते, असा डॉ. जिल टेलर यांचा ठाम विश्वास आहे; परंतु वैज्ञानिकदृष्टय़ा हे पचनी पडणं कठीण आहे. अशी स्वत:ची वेगळी टीप चित्रा बेडेकर यांनी पुस्तकाच्या अखेरच्या भागात जोडली आहे.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Wednesday, October 31, 2012
डॉ. जिल टेलरचे मनोवेधक अनुभव
डॉ.जिल टेलर या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेंदूरचना शास्त्रज्ञ (neuro-scientist) आहेत. मानवी मेंदूतील पेशींचा मनोविकारांशी नेमका काय संबंध असतो, याबाबतीत संशोधन करीत असताना वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी डॉ. टेलर यांना स्वत:लाच ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्नव होऊन मेंदूची डावी बाजू दुखापतग्रस्त झाली व त्यामुळे शरीराचा उजवा हिस्सा पांगळा झाला. त्यांच्या मेंदूची शल्यक्रिया करून लिंबाच्या आकाराची साकळलेल्या रक्ताची गाठ काढून टाकण्यात आली. त्यानंतर विलक्षण जिद्द, चिकाटी व परिश्रमांच्या परिणामी डॉ. टेलर सुमारे आठ वर्षानंतर पूर्ववत नॉर्मल होऊ शकल्या. त्या मेंदूतील बिघाडाच्या अवस्थेत त्यांना जे अनुभव आले त्यांचे वर्णन त्यांनी My Stroke of Insight (A Brain Scientist Personal Journey) या 2008 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले आहे. त्यांचे हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून जगभर गाजले व 2008 साली टाईम मासिकाने जगतातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला. डॉ. जिल टेलर यांचे ते मूळ पुस्तक मला अद्याप मिळाले नाही; परंतु चित्रा बेडेकर यांनी डॉ. टेलर यांच्या अनुभवांची कथा 'मेंदूच्या अंतरंगात' या पुस्तकात अतिशय समर्पक भाषेत सादर केली आहे. चित्रा बेडेकर या स्वत: संरक्षण खात्यातील संशोधन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी पदावर होत्या व लोकविज्ञान चळवळीशीही त्या निगडित आहेत.
आपल्या मेंदूचे जे वरचे आवरण असते त्याचे डावा व उजवा असे दोन अर्धगोल हिस्से असून ते दोन्ही भाग एका सेतूने एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डाव्या व उजव्या अर्धगोलांत माहितीची सतत देवाणघेवाण सुरू असते व ते एकमेकांना पूरक असे कार्य करीत असतात. मात्र ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत पोचलेल्या माहितीवर कशा प्रकारे संस्करण करायचे, याची प्रत्येक अर्धगोलाची कार्यपद्धती अगदी परस्परभिन्न असते. मानवी मेंदूच्या या वरच्या आवरणांमध्ये ज्या चेतापेशी .(neurons) असतात त्या इतर कोणत्याही प्राण्याच्या मेंदूत आढळून येत नाहीत. मानवी मेंदूच्या या बाह्य आवरणाला neo-cortex असे नाव आहे. आपल्या मेंदूच्या आतल्या भागातील पेशी मात्र इतर सस्तन प्राण्यांसारख्याच असतात. मानवी मेंदूच्या डाव्या व उजव्या अर्धगोलांच्या भिन्नभिन्न कार्यपद्धतीचे सुरेख वर्णन चित्रा बेडेकरांनी डॉ. जिल टेलर यांच्या पक्षाघाताच्या घटनेच्या संदर्भात जे केले आहे ते त्यांच्याच शब्दांत वाचणे योग्य राहील. त्या लिहितात :''माणसाच्या मेंदूचा डावा अर्धगोल 'बुद्धिवादी' असतो. बुद्धी वापरून परिस्थितीचा सतत अर्थ लावत असतो. उलट उजवा अर्धगोल अंत:प्रेरणेने, अंत:स्फूर्तीने चालतो. डाव्याला कालप्रवाहाचं भान असतं तर उजवा वर्तमान क्षणातच मग्न असतो. डावा भाषा वापरतो, शब्दांमार्फत बोलत राहतो, उजवा नि:शब्दपणे अनुभव घेत असतो. डावा मेंदू परिस्थितीचे तुकडे करून विश्लेषण करतो तर उजव्याला समग्रतेचं सर्वसमावेशक भान असतं. डाव्या मेंदूच्या प्रेरणांच्या प्रभावाखाली आपण प्रत्येक क्षणी जगाशी व्यवहार करीत राहतो, इतरांशी शब्दबंबाळ बोलत, ऐकत राहतो, काल-आज-उद्याच्या चक्रात अविरत धावत राहतो. आपण एकटे आहोत, एकाकी आहोत, असुरक्षित आहोत आणि सतत धडपड केल्याशिवाय, स्वार्थ साधल्याशिवाय टिकू शकणार नाही असं आपल्याला वाटत असतं. जिलच्या मेंदूचा डावा अर्धगोल जेव्हा निकामी झाला तेव्हा तिला उजव्या मेंदूच्या प्रभावाखाली एक वेगळा विलक्षण अनुभव आला. जणू एक साक्षात्कार झाला! मी संपूर्ण विश्वाशी एकरूप आहे असा समग्रतेचा अफाट अनुभव तिला आला. तो कालातीत होता, 'स्व'च्या पलीकडचा होता, शब्दांच्या पलीकडचा होता. एका असीम आंतरिक शांततेचा तो अनुभव होता.''
आपलं हे उजवं मन म्हणजेच उजव्या अर्धगोलाची कार्यपद्धती कोणताही सुटा, अलग क्षण अगदी स्पष्टपणे जसाच्या तसा आठवण्याची क्षमता आपल्याला देतं. आपल्या अवतीभवतीच्या गोष्टीचं एकमेकांशी कसं नातं आहे हे लक्षात ठेवण्यासाठीच आपल्या या उजव्या मनाची म्हणजेच मेंदूच्या उजव्या अर्धगोलाची योजना झालेली आहे. निरनिराळ्या वस्तूंमधल्या सीमारेषा धूसर होऊन मनाने चितारलेलं एकच विशाल, व्यामिश्र चित्र आपण आठवू शकतो. दृश्य, हालचाली, गुणधर्म यांची सरमिसळ असणारं प्रत्येक क्षणाचं ते परिपूर्ण चित्र असत.ं
आपल्या उजव्या मनाला वर्तमान क्षणाशिवाय दुसरा कोणताच काळ ठाऊक नसतो. उजव्या मनासाठी प्रत्येक क्षण विविध संवेदनांनी ओतप्रोत भरलेला असतो. आनंदाचा अनुभवसुद्धा त्या वर्तमान क्षणातच नांदत असतो. आपल्यापेक्षा विशाल असणार्या कशाशी तरी आपण जोडलेले आहोत याचा अनुभवसुद्धा वर्तमान क्षणातच येत असतो. आपल्या उजव्या मनासाठी आदिअंतविरहित, समृद्ध असा वर्तमान क्षण म्हणजेच सर्व काही असत.ं
कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे करण्यासाठी नेमून दिलेली नियम आणि बंधनांची जी चौकट असते ती उजव्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसते. त्या चौकटीबाहेर अंत:प्रेरणेने विचार करायला हे मन मुक्त असतं. प्रत्येक नव्या क्षणासोबत येणार्या शक्यतांचा हे उजवं मन सर्जनशीलपणे वेध घेतं. कोणत्याही अडथळ्याशिवाय, न्यायनिवाडय़ाशिवाय आपल्यातल्या कलात्मक प्रवाहांना मुक्तपणे हे मन वाहू देतं. उजव्या मनासाठी वर्तमान क्षण म्हणजे जणू प्रत्येक जण, प्रत्येक वस्तू एकात्मिकपणे एकमेकांशी जोडलेले असण्याची वेळ असते. मानवजातनामक एका व्यापक कुटुंबाचे आपण सर्व सदस्य असल्याप्रमाणे उजवं मन सर्वाना समान लेखतं. विश्वातल्या या सुंदर ग्रहावर माणसाचं जीवन टिकून राहण्यासाठी माणसामाणसांतल्या नात्याची या मनाला जाणीव असते. सर्व माणसांमधली सामाईकता हे मन ओळखून असतं. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी कशी जोडलेली असते आणि आपण सर्व जण एकत्र येऊन कसं एक पूर्णत्व आकारलेलं असतं याचं एक विशाल रेखाटन या मनाला दिसत असतं. दुसर्याविषयी सहानुभाव वाटण्याची, त्याच्या भूमिकेत शिरून त्याच्या भावना जाणण्याची क्षमता आपल्या मेंदूच्या उजवीकडच्या कॉर्टेक्सच्या पुढच्या भागामुळे आपल्याला लाभलेली असते.
'यांच्या तुलनेत आपल्या मेंदूचा डावा अर्धगोल म्हणजे अगदी दुसरं टोक असतं. माहितीवर संस्करण करण्याची त्याची तर्हासुद्धा संपूर्णपणे वेगळी असते. उजव्या अर्धगोलाने निर्माण केलेल्या प्रत्येक समग्र, संपन्न क्षणाला कालक्रमानुसार एकत्र गुंफण्याचं काम डावा अर्धगोल करतो. हा क्षण ज्या तपशिलांनी बनलेला आहे त्याची तुलना क्रमाने आधीच्या क्षणातल्या तपशिलांशी तो करतो. सलगपणे, पद्धतशीरपणे त्या तपशिलांची जुळणी करून आपला डावा अर्धगोल वेळ किंवा काळ ही संकल्पना तयार करतो. त्यामुळेच भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ अशी त्या क्षणांची विभागणी आपण करत असतो. अशा कालदर्शक रचनेमुळे कोणती गोष्ट कशाच्या आधी घडायला हवी हे आपण ठरवू शकतो. म्हणजे आपल्या बूट आणि मोज्यांकडे तर बूट घालण्याआधी मोजे घालायला हवेत हे ठरवायला आपला डावा अर्धगोल मदत करतो. कोणत्याही कृतीचं निगामी पद्धतीने (deductive method) तो आकलन करून घेत असतो. म्हणजे 'अ' हा 'ब' पेक्षा मोठा आहे, 'ब' हा 'क' पेक्षा मोठा आहे. म्हणून 'अ' हा 'क' पेक्षा मोठा आहे असं निगामी तर्कशास्त्र आपला डावा अर्धगोल वापरत असतो.
मानवी मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीबाबत डॉ. जिल टेलर यांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाचे चित्रा बेडेकर यांनी केलेले आणखी वर्णन आपण पुढील लेखात पाहू.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Thursday, October 18, 2012
'आत्मभान' हे मानवाला मिळालेले विशेष वरदान
जड पदार्थापासून मानवापर्यंत जी पृथ्वीवर उत्क्रांती झाली तिचे स्थूल निरीक्षण करता असे म्हणता येईल, की सुरुवातीस अचेतन, अबोध, निरानंद असलेला निसर्ग सजीव रूप घेऊन अधिकाधिक सचेतन, अधिकाधिक संवेदनशील, ज्ञानी आणि अधिकाधिक आनंदी होत गेला. यापैकी 'आनंद' या शब्दाला अनेकांचा आक्षेप असू शकतो. कारण सजीवांच्या जीवनात धडपड, कष्ट, वेदना व दु:ख कदाचित आनंदापेक्षा अधिक आहेत. परंतु स्वाभाविक प्रेरणा तपासली असता ती आनंदप्राप्तीचीच आहे, असे म्हणावे लागेल. जगण्यात आनंद नसता किंवा अधिकाधिक आनंदप्राप्तीसाठी जगणे नसते, तर जगणे ही मूलभूत प्रेरणा म्हणून टिकू शकली नसती. आधुनिक मानवीमनाने बरीच विकृत वळणे घेऊन जगण्यातला नैसर्गिक आनंद गढूळ करून टाकला ही बाब वेगळी. परंतु आहार, निद्रा, मैथुनासारख्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याबरोबर जो भाव पशुपक्षी व निसर्गापासून अद्याप फार दूर न गेलेल्या मानवातही उमटतो तो आनंदाचाच असतो. इतकेच काय, लहान बालकेसुद्धा खूप भूक लागली नसेल, झोपेला आले नसतील व शारीरिक व्यथा/वेदना नसेल तर सर्वकाळ आनंदीच असतात.
विविध इंद्रियांकरवी स्वत:चे विविध पैलू जाणणे, स्वत:चाच विविध प्रकारे उपभोग घेणे हेही उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत राहिला. स्वत:चे रूप न्याहाळण्यासाठी त्याने सजीवांच्या रूपात दृष्टी विकसित केली. नाद ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, गंधासाठी नाक, चवीसाठी जीभ व आत स्रवणार्या ग्रंथी असे स्वत:चाच आस्वाद अनेक अंगांनी घेण्यासाठी निसर्ग सजीवसृष्टीच्या माध्यमातून उमलत गेला. विकसित होत गेला. स्वत:च स्वत:चा भक्षक रूपाने उपभोग घेत राहिला व स्वत:च स्वत:चे भक्षही झाला. सजीवांमध्ये उत्क्रांतिक्रमात विकसित होत गेलेल्या प्रत्येक इंद्रियाला आनंदाचीच ओढ असते. जे अन्न आनंद देत नाही ते जिभेला नकोसे वाटते. जो नाद आनंद देत नाही तो कानांना कर्कश वाटतो. जो स्पर्श पुलकीत करत नाही तो त्वचेला असह्य वाटतो. जे दृश्य आनंददायी नसते ते डोळ्यांना बघवत नाही.
असे म्हणतात, की सृष्टीमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते जाणण्याच्या साधनांचा विकासच उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत आहे. इंद्रियांच्या विकासापाठोपाठ किंवा सोबतच मनही उगवले व विकसित झाले. उत्क्रांतीच्या वरच्या पातळीवरील मनुष्येतर प्राण्यांमध्ये भावभावना व विचार करण्याची क्षमता कमीअधिक प्रमाणात निश्चितच आढळून येते. परंतु मानवी पातळीवर उत्क्रांतीने झेप घेतली. त्यातून मनाचा भव्य व विविधांगी विस्तार जो झाला त्याने फारच वरचा टप्पा गाठला. आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) हा मानवात असलेला व मानवेतर पशूंमध्ये अभावाने आढळणारा विशेष गुण आहे.
मनुष्येतर प्राणी बहुधा त्यांच्या नैसर्गिक उपजत प्रेरणांनी संचालित असे जीवन जगतात. परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला मात्र उपजत प्रेरणा कमी व बुद्धी म्हणजेच शिक्षणकौशल्य व विचारक्षमता अधिक मिळाली. इतर प्राण्यांची पिले जन्मत:च किंवा जन्मल्यावर लवकरच स्वत:चे अन्न मिळविण्यास सक्षम होतात. इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत मानवाचे मूल मात्र सर्वाधिक काळ परावलंबी असते. परंतु त्यांचा मेंदू इतर सर्व प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मानवाच्या या परावलंबी बालकांच्या रक्षण-पोषणासाठी मानवाला सामूहिक जीवनपद्धतीचा अंगीकार करावा लागला. समूहाला भाषेची गरज असते. कारण भाषेशिवाय समूहातील व्यक्ती एकमेकांशी निगडित कसे राहणार? आधी इशार्यांच्या स्वरूपात असलेली भाषा हळूहळू ध्वनी, शब्द व वाक्यरूपात विकसित होत गेली. भाषेच्या विकासासोबतच विचारक्षमताही आपोआप विकसित होत गेली किंवा विचारक्षमतेमुळे भाषा विकसित होत गेली, असेही म्हणता येईल.
मानवेतर प्राण्यांना भोवतालच्या सृष्टीचे भान असते. परंतु स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे व स्वत:मधील वासना-भावना-इच्छा-विचार यांचे वेगळे भान त्यांना नसते. असे आत्मभान हे मानवाला मिळालेले विशेष वरदान म्हणता येईल. अर्थात, आधुनिक साहित्यात आत्मभान हा शाप मानणारा एक प्रवाह आहे. परंतु मनाने निरोगी असणार्या कोणत्याही मानवाला आत्मभान हे वरदानस्वरूपच वाटावे. आपणच आपल्याला आतूनबाहेरून पाहता येणे व आपण तसे पाहत आहोत किंवा पाहू शकतो याचीही स्वतंत्रपणे जाणीव असणे म्हणजे आत्मभान! स्वत:ला पाहणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा, वासना, विचार, भावना वगैरे न्याहाळता येणे व समजता येणे. अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे तर एखादी वासना देहात/मनात उत्पन्न होणे ही एक बाब व अशी वासना माझ्यात उत्पन्न झाली आहे हे समजणे व मी हे समजतो आहे याचेही भान असणे ही दुसरी बाब. पहिला प्रकार सर्व प्राण्यांत आढळेल. दुसरा प्रकार मात्र फक्त मानवांतच दिसून येतो.
भोवतालच्या सृष्टीला समजून घेण्यासाठी, अन्न मिळविण्यासाठी व प्रतिकूल निसर्गावर मात करण्यासाठी मानवाला उपजत प्रेरणांपेक्षा विचारशक्तीचा उपयोग अधिक करावा लागला. इतर प्राण्यांच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो, की या गोष्टींसाठी प्राण्यांना निसर्गानेच उपजत प्रेरणा (इन्स्टिक्ट) बहाल केल्या आहेत किंवा उत्क्रांतीच्या ओघात प्रत्येक प्राणिजातीच्या सामुदायिक प्रकृतीमध्ये त्या उपजत प्रेरणा विकसित होत गेल्या असाव्यात. मानवी मुलाला मात्र उपजत प्रेरणांच्या अभावी शिक्षणावर अधिक भर द्यावा लागतो. अगदी खाद्यपदार्थापासून हे शिक्षण सुरू होते. आपल्या देहाला पोषक खाद्य कोणते व घातक कोणते, याबाबत मानवेतर प्राणी जन्मत: अधिक समंजस असतात. मानवाचे मूल मात्र दिसेल ती वस्तू तोंडात टाकू पाहते. परंतु निरीक्षण, अनुभव-विश्लेषण, निष्कर्ष इ. पद्धतींनी मानवी बुद्धी विकसित होत गेली. निरीक्षण-विश्लेषण-तर्कसंगती-निष्कर्ष हे बुद्धीचे गुण आहेत. पूर्वग्रहरहित, अनाग्रही, शुद्ध विवेकशील विचार ( ठशरीेप) ही निसर्गाने मनाच्या स्वरूपात गाठलेली उत्क्रांतीमधील सर्वोच्च अवस्था आहे. परंतु ती अवस्था जरी निसर्गाला मानवी देहात गाठता येत असली तरी फारच तुरळक प्रमाणात ती मानवजातीत आढळते. याचे महत्त्वाचे एक कारण बहुधा असे असावे, की मानवाला उत्क्रांतीच्या आधीच्या टप्प्यांचेही ओझे वाहावे लागते. म्हणजे त्याची विवेकीबुद्धी त्याला काहीही सांगत असली तरी त्याचा पदार्थमय देह, त्या देहाच्या मर्यादा, त्या देहातील जगण्याची व पुनरुत्पादित होण्याची धडपड करत असलेला प्राण, त्या अनुषंगाने येणारे इच्छांचे, वासनांचे आवेग, नैसर्गिक उपजत प्रेरणेपासून काहीसे दुरावल्यामुळे दोलायमान असलेले, विकृतीकडे सहज झुकणारे व आत्मभानामुळे 'अहं'चा परिपोष करू पाहणारे मन हे इतर तत्त्व त्याला अन्यान्य दिशांनी ओढू पाहतात व या सर्वापासून तटस्थ होऊन जगता येणे दुष्कर वाटते. अनेक महामानवांनी मनाची अत्यंत विवेकशील बुद्धीचे वैभव प्रकट करणारी अवस्था निश्चितच गाठली आहे. मात्र देहाच्या प्राणिक वासना व भावभावनांच्या आणि मनबुद्धीच्या वेगवेगळ्या मागण्यांमध्ये संतुलन कसे साधावे, हा यक्षप्रश्न मानवजातीकडून अद्यापही उत्तराची अपेक्षा बाळगून आहे.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Saturday, October 6, 2012
मनात साठविलेलं काहीही पुसलं जात नाही
मानवी मनाचा आवाका, खोली व व्याप्ती अतिप्रचंड असल्याचे आपण मागील लेखात पाहिले. एकतर जे गुणसूत्र जीन्स (सशपशी)च्या रूपात आपल्याला पितरांकडून मिळतात त्यातच पृथ्वीवरील सजीव उत्क्रांतीचे गडद अनुभव साठविलेले असतात. जे आपल्या मनात समाविष्ट होतात. शिवाय असे म्हणतात, की अगदी जन्मल्यापासून आपण डोळ्यांनी जे जे पाहतो, कानांनी जे जे ऐकतो, त्वचेने जे जे स्पर्श अनुभवतो, नाकाने जे जे वास घेतो व जिभेने ज्या ज्या चवी अनुभवतो ते सर्व काही आपल्या मनात साठविले जाते. काहीही पुसल्या जात नसतं. फक्त आपल्या जागृत मनाला त्यांची विस्मृती होते. मात्र सर्व आठवणी आपल्या सुप्त मनात साठविल्या जातात. याखेरीज सर्व वासना, भावना, विचार, कल्पनादेखील सुप्त मनात साठविलेल्या असतात. याचाच अर्थ, ज्याचे आम्हांला भान असते ते आमचे जागृत मन. हे आमच्या मनाचे समुद्रातून वर आलेल्या हिमनगांसारखे अगदी वरवरचे टोक असते आणि खाली पसरलेल्या अथांग सुप्त/ अवचेतन मनाचा आम्हांला पत्ताच नसतो. कदाचित आमच्या सुप्त मनाचा हा मोठा हिस्सा आतल्याआत मानवजातीच्या सामुदायिक सुप्त मनाशीही जोडलेला असू शकतो.
निसर्गाचे असेही स्वरूप आहे, जे आमच्या मर्यादित दृष्टीला दिसत नाही. दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानेच आमच्या दृष्टीचा विस्तार करून आम्ही सृष्टीच्या महाकाय व सूक्ष्म रूपाचे काही अंश पाहू शकतो. तार्किक बुद्धिमत्तेच्या/गणिताच्या साहाय्याने उर्वरित सृष्टीबाबत आडाखे बांधू शकतो. सृष्टीत असेही ध्वनी आहेत जे आमचे कान ऐकू शकत नाहीत. असे गंध आहेत ज्यांचा आमच्या नाकास पत्ता लागत नाही. भौतिक शरीराच्या या मर्यादा आहेत. आमचे डोळे अतितीव्र प्रकाशकिरणे सहन करू शकत नाहीत. आमचे कान तीव्र ध्वनिलहरी सहन करू शकत नाहीत. आमच्या जागृत मनालाही प्रकृतीने विस्मृतीचा वर दिलेला आहे अन्यथा ते मनातला प्रचंड गोंगाट सहन करू शकले नसते.
परंतु आमच्या जाणिवेच्या पलीकडे आमच्या सुप्त/अवचेतन मनात एक अशी आमच्या जागृतावस्थेपेक्षा ज्ञानी यंत्रणा निश्चितच कार्यशील असावी जी त्या सुप्तमनाच्या प्रचंड गोदामातून वेळोवेळी, सतत आमच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला साजेशा आठवणी, कल्पना, भावना, गुणी विचार हुडकून काढते व जागृतावस्थेकडे पाठवून देते. ही यंत्रणा आमच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेपण संघटित ठेवते. अशी यंत्रणा नसती तर आपण सर्व वेडे झालो असतो किंवा असेही म्हणता येईल, की ज्या मानवाच्या अवचेतन मनातील अशी निवड व संघटन करणारी यंत्रणा विस्कळीत होते, कमजोर होते अथवा नष्ट होते ते वेडे होतात. अशीच ज्ञानी यंत्रणा आमच्या देहाची निर्मिती, पोषण व विकासात गुंतलेली असल्याचे आपण पूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. ज्या यंत्रणेची संपूर्ण कार्यपद्धती आम्हांला अजून समजलेली नाही.
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, पिंड, व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे असते. ते त्याने निवडलेले नसते. त्याच्यात प्रवाहित झालेल्या पितरांच्या गुणसूत्रांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटा हिस्सा व्यापला असतो. पर्यावरण व संस्कारांनी आणखी एक छोटा हिस्सा तयार होतो. परंतु त्याला त्याच्या सख्ख्या भावंडांपासूनही वेगळे व्यक्तिमत्त्व, स्वभाव प्रदान करणारा व्यक्तीच्या स्वभावाचा मोठा हिस्सा कुठून व कसा निर्माण होत असेल? आणि कशासाठी?
मानवीमनाला म्हणजे जागृत मनाला बुद्धीची संगत लाभली आहे. अमूर्त स्वरूपात विचार करण्याची क्षमता हे बुद्धीचे एक लक्षण आहे. आमची भाषा हे या गुणाचे उत्तम उदाहरण आहे. 'राम' ही दोन अक्षरे खरेतर नुसत्या रेघोटय़ा आहेत. परंतु ती दोन अक्षरे एकत्र वाचली अथवा ऐकली, की आमच्या कल्पनेत धनुर्धारी, एकवचनी, एकपत्नीव्रती, त्यागी, पराक्रमी असा अवतारी पुरुष उभा ठाकतो. त्या दोन अक्षरी रेघोटय़ा म्हणजे त्या महामानवाचे अमूर्त रूप ठरतात. अमूर्त विचार करण्याच्या या क्षमतेने तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व गणितासारख्या शास्त्रांच्या रूपाने अतिउंच भरार्या मारल्या असून मानवाचा फार मोठा भौतिक व सांस्कृतिक विकास साधला आहे.
भोवतालच्या वस्तूंची, घटनांची परस्पर संगती लावण्याचा व कारणे आणि परिणामांची संगती लावण्याचा प्रयत्न करणे हेही बुद्धीचे लक्षण मानले जाते. तसेच तर्काद्वारे निवाडा करणे, योग्य-अयोग्य ठरविणे, नियोजन करणे, शिकणे हीदेखील बुद्धीची कामे मानली जातात. आमच्या सचेतन, जागृत मनाच्या धारणा, पूर्वग्रह, श्रद्धा, संस्कार, आम्ही ज्या पाळत आलो त्या परंपरा व सामाजिक संस्थात्मक रचना यांना जाणीवपूर्वक बदलविण्याची क्षमता बुद्धी आम्हांला प्रदान करते. परंतु अवचेतन मनाला व आमच्यातील वासनांना, भावनांना, कल्पनांना जोश, आवेश, आवेग पुरविणार्या प्राणाला नियंत्रित करणे बुद्धीला फारसे जमत नाही. एकतर उत्क्रांतीत त्यांचे स्थान बुद्धीच्या अगोदरचे असल्यामुळे जोमदार, आवेशपूर्ण, आवेगी व भरदार अशा नाटय़पूर्ण प्राणिक मनाची आम्हांला चटक लागलेली आहे किं वा त्याचेच दुसरे रूप म्हणजे हताश, उदास, खिन्न व भकास जे असते त्याचेही आमच्या अवचेतन मनाला मोठे आकर्षण असते. (त्यामुळेच बेगम अख्तर, तलत महमूद, मेहदी हसन किंवा गुलाम अलींनी सुरेल, पण उदास स्वरात गायलेल्या उर्दू शायरांच्या पराभूत मनोवृत्तीच्या गजला क्रांतिकारकांनादेखील आवडतात.) बुद्धीमध्ये असा आवेग अथवा हताशपणा नसल्यामुळे ती योग्य-अयोग्याचा निवाडा अधिक चांगला करू शकते. पण त्यासाठी तिला अधिकाधिक सचेतन होत जाणार्या मनाची व बलवान परंतु शांत प्राणाची साथ मिळावी लागते.जाणीव हा आमच्या अस्तित्वाचा आणखी वेगळाच घटक असावा. जाणीव (उेपीलर्ळेीीपशी) ही स्वतंत्र वस्तू नसून मेंदूच्या माध्यमातून घडणारी एक प्रक्रिया आहे असे बहुतांश वैज्ञानिक मानतात. प्राण-मन-बुद्धी यांचेदेखील प्रक्रियांच्या स्वरूपातच विश्लेषण व अध्ययन करण्याकडे विज्ञानाचा कल आहे.
परंतु एक गंमत म्हणून आपण एक प्रयोग करून पाहू शकतो. बाहेरच्या जगातून चित्त काढून स्वत:वर केंद्रित करून पाहावे. त्यासाठी पद्मासनासारखे कठीण आसन लावून बसण्याची गरज नाही. परंतु मन सैरभैर होऊ नये अशा तत्पर सुखासनात साधी मांडी घालून जरी एकाग्रतेने स्वत:कडे पाहत राहिलो तरी आपली जाणीव ही शरीराच्या सर्व अवयवांमध्ये, मनाच्या भावनांमध्ये, विचारांमध्ये वगैरे पसरली, विखुरली असल्याचे लक्षात येते. दोन्ही स्तनाग्रांना जोडणार्या रेषेच्या मध्यभागी अथवा टाळूवर चित्त एकाग्र करत राहिलो तर हळूहळू ही विखुरलेली, पसरलेली जाणीव त्या ठिकाणी एकवटू लागते. ती आपल्याला हळुवारपणे छातीत खोलवर अथवा टाळूच्या वर ढकलू पाहते. तिचे स्वतंत्र अस्तित्व तर जाणवतेच, परंतु ही जाणीव जेव्हा पलटून स्वत:लाच निरखू लागते तेव्हा एक विशेष आनंद शरीरात, मनात पसरू लागतो. हा अनुभव मानवजातीसाठी नवीन नसून लक्षावधी मानवांना जाणिवेची अशीच अनुभूती वेगवेगळ्या काळी व स्थळी झालेली आहे.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Wednesday, September 12, 2012
मानसिक पिंड, स्वभाव व्यक्तीच्या हाती नाही
आपल्या अस्तित्वाचे अनेक अंग अथवा घटक असतात. पदार्थमय भौतिक शरीर हा एक घटक, प्राण दुसरा, मन तिसरा, बुद्धी चौथा आणि जाणीव हा आणखी वेगळा घटक आहे. त्याखेरीज आत्मा हाही एक घटक अतिमहत्त्वाचा असल्याचे आध्यात्म मानते, परंतु आत्म्याचे अस्तित्व हा वादाचा विषय आहे.
प्राण आणि बुद्धीच्या मधात मन आहे. मन म्हणजे वासना, भावना, विचार अथवा कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना आली किंवा विचार आला असे आपण म्हणतो. म्हणजेच आपण मनाला कल्पनेपेक्षा किंवा विचारापेक्षा वेगळे मानतो. थोडे तटस्थ होऊन आपण आपल्या मनाला न्याहाळले तर असे दिसून येते की, त्यात अनेकानेक भावना, कल्पना, विचार तरंगत येतात. त्यापैकी जी भावना, कल्पना अथवा विचार त्या त्या वेळी आपल्या प्रकृतीला हवीहवीशी वाटते, त्या भावनेच्या, कल्पनेच्या वा विचाराच्या स्वाधीन मनाला करून आपण त्या मागे फरफटत जातो. सामान्यत: मनावर आपला अंकुश नसतो व आपले बाह्य मन हे भोवतालच्या वातावरणातून ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेल्या स्पंदनांना प्रतिसाद देण्यात गुंतले असते.
बुद्धी ही बहुतांश मनाच्या दासीसारखे कार्य करते. बुद्धीचे कार्य विश्लेषण तर्क करण्याचे असते. आम्ही वकील लोक आमची बुद्धी पक्षकारांना भाडय़ाने देतो. म्हणजे त्यांना हवे तसे विचार व तर्क सुसंगत पद्धतीने पुरवितो. त्या तर्काचा सत्याशी संबंध असेलच असे नाही. आपली बुद्धी हमखास आपल्या मनाला हवे तसेच घटनांचे विश्लेषण करते व तर्क पुरविते.
मन काय आहे? उत्क्रांतीच्या ओघात सस्तन प्राण्यांमध्ये असे वेगळे वैशिष्टय़ निर्माण झाले की, प्रत्येक प्राणी त्याच्या प्रजातीतील इतर प्राण्यांसारखीच प्रकृती धारण करत असला तरी त्याच्याच प्रजातीतील इतर प्राण्यांपेक्षा त्याच्या स्वभावात जाणवण्यासारखे वेगळेपण आढळून येते. मानवामध्ये या व्यक्तिस्वातंर्त्याने कळस गाठला. प्रत्येक माणसाचे मन हे त्याचे अत्यंत खाजगी क्षेत्र असते, ज्यातील घडामोडींबाबत इतर लोक केवळ अंदाज बांधू शकतात; परंतु प्रत्यक्ष जाणू शकत नाहीत. मनुष्येतर प्राण्यांच्या जगण्याच्या प्रेरणा उपज म्हणजे निसर्गदत्त असतात. सोप्या भाषेत असे म्हणता येईल की, त्या त्या प्राणिजातीचे एक सामुदायिक मन असेल जे त्यातील व्यक्तींच्या जीवनाचे संचालन अबोध पातळीवर करत असावे. परंतु मानव हा निसर्गापासून तुटलेला प्राणी आहे. त्याला स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे भान आलेले आहे. 'मी' आणि 'ते' (म्हणजे माझ्याबाहेरील सर्व जग) अशी स्पष्ट विभागणी व्यक्तीच्या मनात झालेली आहे. शिवाय स्मृती व कल्पकता हे दोन वर म्हणा अथवा शाप म्हणा, मानवाला जास्तीचे मिळाले आहेत. त्यामुळे त्याच्या मनात असंख्य स्मृतींचा साठा आहे आणि कल्पकतेच्या बळावर त्याचे मन गतिमान भरार्या घेऊ शकते. शिवाय उपजत प्रेरणा कमी झाल्यामुळे मनाला सतत निवड करावी लागते व ते हेलकावे खात राहते.
मानवी मनाची खोली व व्याप्ती अथांग आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव उत्क्रांती मानवाच्या मनात अवचेतन स्वरूपात साठविलेली आहे. आपण केवळ आपल्या मनाचा पृष्ठभागच पाहू शकतो.
आपल्या जाणिवेच्या कक्षेत नसलेला अर्ध, अवचेतन भाग अतिशय मोठा आहे. परंतु आपल्या क्रिया-प्रतिक्रिया बहुतेक अवचेतन मनातून प्रगटलेल्या असतात. पूर्वजांकडून आनुवंशिकतेने प्राप्त झालेले गुणधर्म, बालपणापासून भोवतालच्या वातावरणातून झालेले संस्कार, आपल्या व्यक्तिगत अनुभवांतून झालेले शिक्षण इत्यादी बाबी आपल्या सचेतन मनाची जडणघडण करण्यात साहाय्यभूत ठरतातच. परंतु या सर्व गोष्टी सारख्या असूनही दोन जुळय़ा भावा-बहिणींचे स्वभाव अतिशय भिन्न असल्याचेही आपण नेहमी पाहतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना असे एक संस्कृत वचन आहे. प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगळा असतो. म्हणजे बाह्य जगाकडून आपल्यावर होणार्या क्रियेला प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद वेगवेगळा राहू शकतो. कोणत्या विषयात रुची घ्यायची, कोणत्या माहितीकडे दुर्लक्ष करायचे हे प्रत्येक व्यक्तीने अजाणताच ठरविलेले असते. एकाच घटनेमागील कारणांचे निष्कर्ष प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे आढळतात. बाह्य जगाविषयीचे एक स्वतंत्र चित्र प्रत्येक व्यक्तीच्या मनात अबोध पातळीवर बनलेले असते आणि ते वेगवेगळे असते. तसेच स्वत:च्या पिंडाचे, स्वभावाचे जोरदार समर्थनदेखील प्रत्येक व्यक्ती स्वत:शी करत असतो. तसे समर्थन त्याने केले नाही तर तो दुबळा ठरतो व त्याच्या व्यक्तीत्वाला टोक येत नाही.
विकार, संवेदना, सद्गुण, दुगरुण, आळस, कर्तृत्व सारे काही आपल्या मनात आहे. भौतिक जगातील भौतिक घडामोडींइतकेच मानसिक घडामोडींचे क्षेत्र विशाल आहे. कोणता मानसिक पिंड/स्वभाव घेऊन जन्माला यावे हे व्यक्तीच्या हाती नाही. बौद्धिक आटापिटा करून तो बदलताही येत नाही. परिस्थितीच्या रेटय़ाने हादरून टाकणार्या विपरीत अनुभवातून होणार्या शिक्षणामुळे नाईलाजाने, जगणे अधिक सुसह्य व्हावे म्हणून थोडाफार स्वभावात बदल होतो पण तो वरवरचाच! शालेय शिक्षणामुळे स्वभाव बदलत नाही.
आपल्या मनाच्या उथळ पृष्ठभागातच आपली जाणीव गुंतली असते. आपल्या पिंडाला साजेसे विश्लेषण बाह्य घटनांचे करून आपल्या आत आपोआप प्रतिक्रिया निर्माण होत राहतात. सहसा आपले मन सतत या भानगडीत गुंतले असल्यामुळे अशांत व अस्वस्थ असते. परंतु आपल्या पिंडाचा एक आंतरिक हिस्साही असतो, जो तुलनेने अधिक स्वस्थ असतो. त्याला आपण अंत:करण म्हणतो. पश्चात्ताप हा अंत:करणाच्या उपस्थितीमुळेच होतो व तो आपल्याला असंख्य वेळा होत राहतो. बहुधा एखाद्या आकस्मिक घटनेवर आकस्मिक प्रतिक्रिया दिल्यानंतर काही वेळाने मनाची उत्तेजना कमी झाल्यावर आपल्याला चुकल्यासारखे वाटते; कारण अंत:करणातून जाणिवेपर्यंत येणारी स्पंदने स्वीकारण्याच्या अवस्थेत आपण आधी नव्हतो व आता आलो.
मन व अंत:करण या काय वस्तू आहेत हे आपण सर्व एका अबोध पातळीवर जाणतो, परंतु त्यांची व्याख्या करणे महाकठीण आहे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, विज्ञान, धर्म हे आपापल्या परीने मनाची व्याख्या करून पाहतात. परंतु आपली व्याख्या अपूर्ण आहे, याचेही भान सर्व शास्त्रांना आहे. अवचेतन मनात बुडी मारून त्याचा तळ शोधण्याचे मानसशास्त्रीय प्रयत्न व मज्जातंतूंच्या विद्युत-रासायनिक उत्तेजनांचा अभ्यास करून त्याद्वारे मनाची व्याख्या करू पाहणारे विज्ञानाचे प्रयत्नदेखील सध्यातरी प्राथमिक अवस्थेतच आहेत. ध्यान व योगासारख्या पद्धतींचा ताळमेळ वैज्ञानिक प्रयोगांशी करून मनाचा शोध घेण्याचे प्रयत्न अलीकडे सुरू झाले आहेत. मनापासून जाणिवेला वेगळे करून त्या जाणिवेच्या साहाय्याने स्वत:च्या मनाचा तळ शोधण्याच्या अनेक पद्धती प्राचीन काळापासून विकसित झालेल्या आहेत.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत)
भ्रमणध्वनी - 9881574954
Wednesday, August 29, 2012
जगणे आणि जगविणे ही आदिम प्रेरणा
जड पदार्थातून व जडाच्या आधारे उगवलेले जीवन क्षणभंगुर असते. पदार्थमय देहात दीर्घकाळ प्राण टिकू शकत नाही. त्यामुळे प्राणाचा अथवा जीवनाचा विकास होण्यासाठी जगण्याची व प्रजातीच्या पुनरुत्पादनाची मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) सर्व सजीवांच्या अंतरंगात दृढ होणे गरजेचे होते. जीवनाचा विकास म्हणजे अधिकाधिक वाढत्या प्रमाणात सृष्टीचा बोध होण्याची, सृष्टीवर नियंत्रण मिळविण्याची व अनेक प्रकारे उपभोग घेण्याची प्रक्रिया.
वैज्ञानिक असे सांगतात, की जर एखाद्या जीवाणूवर संकट आले म्हणजे तो नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तो जीवाणू स्वत:मधील 'डीएनए' रेणू भोवतालच्या वातावरणात विखरून टाकतो आणि आजूबाजूचे जीवाणू लगेच त्या विखुरलेल्या 'डीएनए' रेणूंना स्वत:मध्ये शोषून घेतात. 'डीएनए'ची ही देवाणघेवाण कल्पनातीत वेगाने होत राहते व काही महिन्यांतच संपूर्ण पृथ्वीवरील जीवाणूंच्या डीएनए रचनेत काही बदल घडून येतात, जे त्यांना संकटांचा मुकाबला करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनवितात. त्यामुळेच कालपर्यंत प्रभावी ठरलेले अँण्टिबायोटिक औषध अथवा कीटकनाशक आज निष्प्रभ ठरल्याचा अनुभव येतो.
म्हणजेच जगणे व स्वत:ची प्रजाती वाढविणे या सर्व सजीवांच्या मूलभूत प्रेरणा आहेत. त्या नसत्या तर पृथ्वीवर जीवनाचा विकासच झाला नसता. शिवाय आपल्या देहाच्या पोषणासाठी, रक्षणासाठी व देहाच्या पुनर्निर्मितीसाठी देहाबाहेरील पर्यावरणातून पोषक घटक (पदार्थ व ऊर्जा) देहाच्या आत ओढून घेणे, त्या घटकांवर देहांतर्गत प्रक्रिया करून जीवपेशी बनविणे व नको असलेले घटक पुन्हा विष्ठेच्या रूपात बाह्य पर्यावरणात टाकून देणे (जी विष्ठा इतर कोणत्यातरी सजीवाचे अन्न असते) हे कार्य प्रत्येक सजीव अखंड करीत राहतो. भोवतालच्या पर्यावरणातील संभाव्य बदलांचा अंदाज घेऊन अनुकूल काळातच अन्नाचे साठे जमवून ठेवण्याची अथवा पाऊस-वार्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी भक्कम निवार्याची तजवीज करण्याची कल्पकबुद्धीही मुंगीसारख्या क्षुद्र सजीवांमध्येदेखील आढळून येते. अर्थात, 'पावसाळ्यापूर्वी आपण अन्न साठवून वारुळाची डागडुजी केली पाहिजे' असा माणसारखा विचार कोणतीही एक मुंगी करू शकत नसेल. परंतु 'मुंगी' या प्रजाती (स्पेसीज)मध्ये ते शहाणपण उत्क्रांतिक्रमात जगण्याच्या व वृद्धिंगत होण्याच्या मूलभूत प्रेरणेतून पर्यावरणीय संकटांना तोंड देता देता विकसित झाले असणार.
आमच्या घराच्या मागील भिंतीच्या आश्रयाने एक वेल वर चढत गेली. खोलीच्या खिडकीइतकी उंची होताच त्या वेलीने खिडकीच्या आतून गजाला वळसा घातला व पुन्हा उंची वाढल्यावर दुसर्याही वरच्या गजाला वळसा घातला. स्वत:चा आधार भक्कम करण्याचे हे 'शहाणपण' वेलीत प्रकटले.
माझ्या घराच्या मागील बाजूचे तारेचे कम्पाउंड तुटले होते. मागच्या सर्व्हिस गल्लीतून डुकराची एक गर्भार मादी आमच्या परसदारी असलेल्या झुडपामध्ये मोठा खड्डा स्वत:च्या पायांनी करू लागली. सुरुवातीला हाकलले तर ती पळून जायची. परंतु जसजसे तिचे दिसत भरत आले तसतशी ती धीट व आक्रमक होत गेली. खड्डा करून तिने त्यात पाचोळा अंथरला व पिलांना जन्मही दिला. पिले जन्मल्यावर ती अधिकच आक्रमक होऊन त्यांचे संरक्षण करीत होती. पुढे पिले चालू लागून स्वतंत्र झाल्याबरोबर या डुकरिणीची सर्व आक्रमकता लोप पावली व ती हाकलल्यावर घाबरून पळू लागली. स्वत:च्या प्रजातीची वृद्धी व्हावी यासाठी प्राण्यांची नित्याची प्रकृतीदेखील प्रसंगविशेषी कशी बदलते व असहाय अवस्थेतील पिलांचे रक्षण करण्यासाठी एरवी भित्रा स्वभाव असलेली मादी-
माता कसा चंडिकेचा अवतार धारण करते याची असंख्य उदाहरणे प्राण्यांमध्ये आढळून येतात.
उत्क्रांतीच्या खालच्या टप्प्यांतील सजीवांच्या प्रजातीतील प्रत्येक जीवाचे स्वत:चे वेगळेपण (त्या प्रजातीतील इतर जीवांपेक्षा) प्रकटताना दिसत नाही. त्या-त्या प्रजातीची एकूण सामुदायिक प्रकृती जगण्याच्या ओघात अधिक शहाणी होत गेली. व्यक्तिगत जीवांची नव्हे, असे म्हणता येईल. मात्र उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यात म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये मात्र प्रजातीतील वैयक्तिक जीवांमध्येदेखील स्वत:चे वेगळेपण व वैशिष्टय़च उमलू लागले. सर्व गायी साधारणपणे सारख्याच दिसत-वागत असल्या तरी प्रत्येक गायीच्या रूपात व स्वभावात इतर गायींपेक्षा वेगळेपण कसे असते हे आपण जाणतोच. असे डास अथवा मुंग्यांच्या बाबतीत म्हणता येत नाही.
निर्जीव व सजीवांमधला एक महत्त्वाचा फरक वैज्ञानिक असाही सांगतात की, आपण एखाद्या दगडाला लाथ मारली तर त्याची प्रतिक्रिया काय होईल याचा अचूक अंदाज करता येतो. परंतु एखाद्या कुर्त्याला लाथ मारली तर त्याच्या प्रतिक्रियेचा अचूक अंदाज करणे अशक्य असते. दुसर्या शब्दांत सांगायचे तर लाथ मारल्यावर दगड किती दूर जाऊन पडेल हे न्यूटनच्या भौतिकीय सिद्धान्ताच्या आधारे लाथेतील जोर व दगडाचे वजन माहीत करून अचूक वर्तविता येते. कारण त्या लाथेमुळे दगडाच्या आतील संरचने (स्ट्रक्चर)मध्ये बदल होत नसतो. परंतु सजीव प्राण्याला लाथ बसल्यावर त्याच्या अंतरंगातील एकूण संरचनेत काही बदल होऊ लागतात व त्या बदलांसह त्याची प्रतिक्रिया घडते. भोवतालच्या जगाकडून घडणारी क्रिया ही सजीवांच्या आतील संरचनांमध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरू शकते. परंतु ते बदल नेमके कशा स्वरूपाचे असावे हे त्या बाह्य जगाला ठरविता येत नाही. क्रियेला प्रतिसाद देणार्या सजीवाची एकूण प्रकृती ते ठरविते.
व्यक्तिस्वातंर्त्याची ही प्राथमिक सुरुवात आहे
भोवतालच्या पर्यावरणाशी आपले जीवन सुसंगत करण्याकरिता सर्व सजीव प्रजातींच्या प्रकृतीमध्ये उत्क्रांतीच्या ओघात बदल होत गेले. हे बदल त्यांनी ठरवून जाणतेपणी केलेले नाहीत. परंतु ही यांत्रिकपणे अथवा अपघाताने घडलेली प्रक्रिया असावी, असेही म्हणता येत नाही. जगणे व आपली प्रजाती वृद्धिंगत करणे या आदिम प्रेरणा सजीवांमध्ये इतक्या बलवान आहेत की, जगणे व प्रजा वाढविणे शक्य व सुसह्य होण्यासाठी प्रकृतिपरिवर्तन ही अपरिहार्य व क्रमप्राप्त बाब ठरत गेली. खरे पाहता, जगणे व आपल्या प्रजातीची संख्या वाढविणे या दोन वेगळ्या प्रेरणा नसून 'आपली प्रजाती प्रदीर्घकाळ टिकून राहणे' ही एकच मूळ प्रेरणा त्या-त्या सजीवाच्या प्रजातीच्या ठायी असते. एक व्यक्ती म्हणून सजीवाचे जगणे-मरणे ही गौण बाब असून निसर्गाला खरे मोल प्रजातीच्या टिकून राहण्याचे असते. पृथ्वीवर जीवनाचा सर्वागीण विकास पदार्थमय देहांच्या आधारे होण्यासाठी ही मूलभूत प्रेरणा अत्यावश्यक ठरते.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Tuesday, August 21, 2012
'प्राण' हा प्राकृतिक पण अ-भौतिक घटक
रॉडनी ब्रुक्स नावाचे एक वैज्ञानिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणार्या संशोधकांपैकी एक आहेत. त्यांचा एक लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व कृत्रिम जीव निर्माण करण्याच्या वैज्ञानिक प्रयोगांद्वारे आजवर एकही जीव निर्माण करता आलेला नाही हे ते कबूल करतात. मंगळावर जे स्वयंचलित 'रोव्हर यान' पाठविण्यात आले ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट उदाहरण होते. खरेतर संगणक जी कृत्रिम बुद्धिमत्ता व्यक्त करतो ती विज्ञानाची थक्क करणारी भरारीच आहे. बुद्धिबळात निष्णात खेळाडूला हरविण्याचे सामर्थ्य वैज्ञानिकांनी यंत्रमानवांना प्राप्त करून दिले आहे. तथापि, अतिप्रगत तंत्रज्ञानाने घडविलेला यंत्रमानव व खरा मानव यांच्यातील फरक क्षणार्धात लहान मुलेदेखील ओळखू शकतात. या अपयशाची अनेक कारणे असू शकतात, असेही ब्रुक्स मानतात. त्यापैकी एक कारण म्हणजे सजीवांमध्ये त्यांना निर्जिवांपासून वेगळे करणारा एक असा घटक असावा जो आजतरी विज्ञानासाठी अदृश्य आहे. अर्थात, ब्रुक्स हे अत्यंत आशावादी वैज्ञानिक असल्यामुळे विज्ञान त्या घटकाचा शोध लावेलच, असा त्यांना विश्वासही आहे. परंतु कदाचित तो शोध जीवशास्त्राच्या आजवरच्या धारणा मोडून टाकणाराही असू शकेल, अशीही शक्यता ब्रुक्स वर्तवितात. सापेक्षतेच्या (रिलेटिव्हिटी) सिद्धांताने जशी न्युटनप्रणीत पारंपरिक पदार्थविज्ञान शास्त्रात खळबळ माजवून दिली तसाच प्रकार जीवशास्त्राबाबत घडू शकतो, अशी प्रांजळ कबुली ते देतात.
ते कोणते तत्त्व आहे जे सजीवांना निर्जिवांपासून वेगळे करते? सामान्य भाषेत ते तत्त्व 'प्राण' या नावाने ओळखले जाते. परंतु प्राण हे एक स्वायत्त तत्त्व आहे की ती केवळ भौतिक देहात चालणारी 'प्रक्रिया' आहे, याबाबत विज्ञान निश्चित काही सांगत नाही. भौतिक देहात विशिष्ट प्रक्रिया (पोषण, धारणा व पुनरुत्पादन) सुरू होणे म्हणजे जीवन आणि ती प्रक्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू, अशी सध्यातरी विज्ञानाची बहुमान्य धारणा आहे. भौतिक देहात 'प्राण' नावाचा कोणी अभौतिक घटक प्रवेश करतो वा देहातून निघून जातो ही बाब विज्ञानमान्य नाही. परंतु जीवसृष्टी निर्माण करण्यात येत असलेल्या अपयशामुळे ब्रुक्ससारखे वैज्ञानिक त्या शक्यतेला एकदम नाकारतही नाहीत. आपण सामान्य माणसं मात्र हजारो वर्षापासून 'प्राण निघून गेला', 'निष्प्राण शरीर', ' प्राण कंठाशी आले' असे शब्दप्रयोग अनुभवांच्या आधारे करीत असतो. 'प्राणी' हा शब्दच प्राणाचा अस्तित्व-वाचक आहे.
प्राण आणि मन वा बुद्धी यातील फरकही सामान्य माणसांना समजतो. मनाचा संबंध कल्पना व विचारांशी आहे, तर प्राणाचा संबंध देहाला जिवंत राखण्यासाठी करावयाच्या घडामोडींशी आहे. श्वासोच्छवास, तहान-भूक, निद्रा, भय, चापल्य, कामवासना इ. प्राणांशी निगडित बाबी आहेत. मनाशी अथवा बुद्धीशी नव्हेत. मानवी पातळीवर भय व कामवासनेसारख्या प्राणिक प्रेरणांमध्ये मनही मिसळते ही बाब वेगळी.
निर्जीवातून उगवला असो वा निर्जीवांत अवतीर्ण झालेला असो. परंतु प्राण हा एक वेगळाच प्राकृतिक पण अ-भौतिक घटक असावा असे वाटते. सर्व सृष्टी ही केवळ भौतिक पदार्थाचीच बनलेली असून अ-भौतिक असे कोणतेही तत्त्व सृष्टीत नाही, अशी धारणा बाळगणार्यांना 'भौतिकवादी'(मटेरियालिस्ट) म्हणतात. 'भौतिकवाद म्हणजेच विज्ञानवाद' असा एक गैरसमज आहे. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जे गम्य व आकलनीय असेल तेच सत्य मानू अशी धारणा बाळगणे म्हणजे वैज्ञानिक मनोवृत्ती होय.
आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जर स्थिरचित शांत अवस्थेत एखादे अ-भौतिक तत्त्व सातत्याने अनुभवास आले तर तेही सत्यच मानले पाहिजे. सृष्टीत जे काही आहे त्या सर्वास 'प्राकृतिक' अथवा 'नैसर्गिक' अशी संज्ञा आहे. परंतु जे जे प्राकृतिक किंवा नैसर्गिक आहे ते सर्व भौतिकच असणे आवश्यक नाही. विज्ञान प्रकृतीचा शोध घेते; केवळ भौतिक पदार्थाचा नव्हे! भौतिक पदार्थाशी प्राणाचा संयोग झाल्यावर पृथ्वीवर लक्षावधी जीवजातींची निर्मिती झाली. भोवतालच्या वातावरणातून प्राणवायू(ऑक्सिजन), कर्बाम्ल (कार्बनिक अँसिड), पाणी, नत्रवायू (नायट्रोजन) व अमोनियम ऑक्साईड हे विपुल प्रमाणात व त्यांच्या प्राथमिक स्वरूपात उपलब्ध असलेले निर्जीव घटक शोषून वनस्पती त्यांचे विविध सेंद्रिय पदार्थात रूपांतर करतात. वनस्पतींना खाणारे प्राणी पुन्हा त्या क्लिष्ट रचना असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर कर्बाम्ल, पाणी, नत्र व अमोनियम ऑक्साईड या मूळ घटकांत करून वातावरणास ते मूळ घटक परत करतात. दुसर्या शब्दांत असे म्हणता येईल की काही सुटे-सुटे निर्जीव पदार्थ हवेतून शोषून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती त्या निर्जीव पदार्थाना संघटित करून एक क्लिष्ट सेंद्रिय रचना तयार करतात, प्राण्यांना मात्र ही पदार्थाची सेंद्रिय रचना वनस्पतींना खाऊन आयती प्राप्त होते. प्राण्यांमध्ये या सेंद्रिय घटकांना पचविण्याचे अथवा जाळण्याचे कार्य चालते, ज्यातून ऊर्जा निर्माण होते. उष्णता व हालचालींची शक्ती 'प्राणी'जगतास अशा प्रकारे प्राप्त करून देणारे 'वनस्पती'जगत हे खरे पाहता ज्वलनशील सेंद्रिय पदार्थाचे महाभंडारच आहे. वनस्पतींचा मुख्य उपयोग हवेच्या शुद्धीकरणासाठी नसून प्राण्यांना पोषक द्रव्य पुरविण्यासाठी होतो, जेणेकरून प्राणी अधिक शक्तिशाली हालचाली करू शकतील. आणखी वेगळ्या परिभाषेत असेही म्हणता येईल की, 'वनस्पती'जगतात बाल्यावस्थेत उगवलेला 'प्राण' प्राणीजगतात अधिकाधिक विकसित व सामर्थ्यशाली होत जातो. प्राणाची ऊर्जा ही भौतिक ऊर्जेपेक्षा वेगळी आहे. परंतु भौतिक ऊर्जा ही प्राणास बलवान करण्यात साहाय्यभूत निश्चितच ठरते. मरतुकडय़ा शरीराचा परंतु अत्यंत साहसी अथवा अत्यंत निर्भय अथवा अत्यंत कोपिष्ट मनुष्य असू शकतो. धाडस, साहस, निर्भयता, चपळपणा ही बलवान व विकसित प्राणाची लक्षणे आहेत. हे गुण बलवान देहाशी अथवा उच्च वैचारिक बुद्धीशी निगडित असतीलच असे नाही. लक्षावधी प्रकारांच्या प्राणी-देहांमध्ये प्राणांचा जो विविधांगी विकास उत्क्रांतीक्रमांत साधल्या गेला त्याचे चित्तथरारक व मनोहारी दर्शन नॅशनल जिऑग्राफिक अथवा डिस्कव्हरी चॅनेल्सच्या माध्यमांतून टीव्हीवर नित्य होत राहते. मुख्य म्हणजे या सर्व प्राणिक हालचाली देहाचे पोषण, रक्षण व प्रजनन या मूलभूत गरजांतून उद्भवतात व देहाच्या रचनेनुसार आणि भोवतालच्या पर्यावरणानुसार प्राणामध्ये भय, चपळपणा, चलाखी, साहस इ. गुणावगुण उमलतात व वाढतात. निर्जीव पदार्थाना वनस्पती खातात, वनस्पतींना शाकाहारी प्राणी तर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खाऊन पुन्हा मूळचे निर्जीव पदार्थ निसर्गास परत करतात. या अद्भुत सृष्टिचक्रात सूक्ष्मजीवाणूंची कामगिरीसुद्धा अतिशय मोलाची असते. ते सर्व काडीकचरा व निष्प्राण देहांना फस्त करून पृथ्वीची स्वच्छता कायम राखतात.
सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच जीवापासून!
आपण कोण आहोत? आपल्या जीवनाला काही हेतू आहे का? या प्रश्नांचा वेध घेत असता पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राकडून जी सामान्य माणसांना समजू शकेल अशी माहिती मिळू शकते. तिची मांडणी या आधीच्या लेखांकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, ही माहिती मुख्यत: निर्जीव पदार्थाबाबत आहे. आमचे व सर्व सजीवांचे देहदेखील पदार्थमय आहेत, जे निष्प्राण झाल्यानंतर निर्जीव पदार्थातच रूपांतरित होतात. या विश्वातील सर्व निर्जीव पदार्थ व ऊर्जा एकाच मूलतत्त्वाची निर्मिती असून सृष्टीच्या आरंभी तर अवकाश - काळासह सर्व ब्रह्मंड एकाच बिंदूमध्ये सामावले होते, असा विज्ञानाचा बहुमान्य तर्काधारित निष्कर्ष असल्याचेही आपण मागील लेखांकात पाहिले. परंतु या माहितीने आपल्या मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
भौतिक पदार्थमय देह हा आपल्या मानवी अस्तित्वाचा केवळ एक भाग आहे. कोणताही जीव निव्वळ पदार्थमय नसतो. पदार्थमय देहात प्राण असेल तरच आपण त्या देहाला 'सजीव' म्हणतो. अचेतन सृष्टीची सचेतन होण्याकडे जी वाटचाल सुरू झाली, त्या यात्रेतील पहिला टप्पा प्राण आहे. प्रत्येक सजीव देह हा सूक्ष्म पेशींचा (सेल) बनलेला असतो. एकच पेशी असलेले कित्येक सूक्ष्म जीवाणू असतात तसेच कोटी-कोटी पेशींनी मिळून घडविलेले मानवासारखे व मानवापेक्षाही अगडबंब देह असलेले प्राणी असतात. मात्र या नानाविध देहरचनांचा मूळ घटक असलेल्या पेशींची कार्यपद्धती बरीचशी सारखी असते. अगदी वेगळी कार्यपद्धती असणार्या पेशी कदाचित पृथ्वीवर फार पूर्वी अस्तित्वात आल्याही असतील; परंतु त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. विशाल अंतराळातील दूरवरच्या एखाद्या किंवा अनेक ग्रहांवर अशी वेगळी कार्यपद्धती असणार्या पेशी व त्या पेशींपासून तयार झालेले सजीव प्राणी अस्तित्वात असतीलही, मात्र त्याबाबत कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजूनतरी आढळलेला नाही.
पृथ्वीवरील प्रत्येक जीवपेशीला एक पातळ त्वचा असते, ज्या त्वचेतून काही द्रव व अतिसूक्ष्म घन पदार्थ आत येऊ शकतात व बाहेरही टाकले जाऊ शकतात. ही पातळ त्वचा त्या पेशीला बाह्य जगापासून वेगळे करते. भोवतालच्या वातावरणातून पोषक घटक आत शोषून घेणे, त्या घटकांवर रासायनिक प्रक्रिया करून स्वत:चे पोषण व दुरुस्ती करणे आणि स्वत:सारखीच दुसरी पेशी निर्माण करून निष्प्राण होणे, हे कार्य प्रत्येक सजीव पेशीमध्ये अविरत सुरू असते. पेशीच्या गाभ्यात लांबलचक साखळी असलेले न्यूक्लिक अँसिडचे 'डीएनए' नावाने ओळखले जाणारे जे रेणू असतात, त्या 'डीएनए'मधील जीन्स नावाचे घटक हे त्या-त्या सजीवांच्या देहरचनेचे गुणधर्म ठरवितात. पेशींच्या आत सतत सुरू असलेले हे नवनिर्मितीचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे, जलदगतीचे व प्रचंड उलाढालीचे असते. हजारो रेणूंची त्यासाठी ठरावीक कार्यक्रमानुसार धावपळ सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारचे रेणू वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पाडत असतात. एखाद्या अजस्र कारखान्यासारखी प्रत्येक पेशीच्या आतली कार्यपद्धती असते. पोषण, दुरुस्ती व नवनिर्माण या कामांसाठी आवश्यक ते पदार्थमय घटक बाह्य वातावरणातून शोषून घेणे व प्रक्रिया झाल्यानंतर अनावश्यक द्रव्य पुन्हा बाह्य वातावरणात सोडून देणे, हे कामही अखंड सुरूच असते. अगदी स्वत:च्या त्वचेची निर्मिती व दुरुस्तीदेखील पेशींच्या आतूनच होत राहते.
अशा लक्षावधी पेशींचा मिळून आपला एक-एक अवयव बनतो. त्या पूर्ण अवयवांच्या निर्मितीचा आराखडा प्रत्येक पेशीजवळ असतो. अनेक अवयवांचा मिळून आपला देह बनतो. प्रत्येक अवयवाचे कार्य वेगळे; परंतु सर्व अवयव एकमेकांना पूरक असतात. कोटय़वधी पेशींचा समूह असलेला देहदेखील ढोबळमानाने पेशींसारखेच कार्य करतो. देहाबाहेरून पोषक अन्न आत घेणे, त्यावर प्रक्रिया करून देहाचे पोषण करणे, अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे, नवीन देहाची निर्मिती करणे व नंतर निष्प्राण होणे!
पृथ्वीच्या पोटात, पृष्ठभागावर व वातावरणात सूक्ष्म जीवाणूंची अफाट संख्या असते. आपल्या मानवी दृष्टीला हे जीवाणू दिसत नाही; परंतु आपल्या देहाच्या आत व देहाच्या त्वचेवरदेखील अब्जावधी जीवाणू नांदत असतात. आपल्या देहातील नित्य निष्प्राण होणार्या पेशी हे जीवाणू फस्त करतात. ते अतिशय उंच जागी व अतिखोल विवरांमध्ये तसेच कडाक्याच्या थंडीत व होरपळणार्या उष्णतेतदेखील टिकाव धरून राहतात. हे सूक्ष्म जीवाणूदेखील पेशींचेच बनले असतात व त्यांच्या पेशीतदेखील व नमूद केलेले कार्य सुरू असते.
सर्व सजीव पेशींची रचना व कार्यपद्धती मूलत: समान असल्यामुळे पृथ्वीवर आता आढळून येणार्या व ज्यांच्या देहरचनांचा अभ्यास होऊ शकतो अशा पूर्वी नष्ट झालेल्या सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच आद्य जीवापासून किंवा पेशीपासून झाली असावी, असा जीवशास्त्राच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. म्हणजेच पदार्थविज्ञानशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्रदेखील अद्वैताकडे इशारा करते असे मानावे लागेल.
सजीवसृष्टीचा प्रारंभ आपल्या पृथ्वीवर सुमारे साडेतीन कोटी वर्षापूर्वी झाला असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. प्रथम जीव कसा जन्मला. याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत. ज्वालामुखीच्या स्फोटातून निर्माण झालेल्या ढगात मिथेन, अमोनिया व हायड्रोजन विपुल प्रमाणात एकत्र असावे व विजेच्या कडकडाटामुळे त्यांच्या संयोगातून अमिनो अँसिड्स व साखरेसारखे क्लिष्ट रचना असलेले रेणू तयार होऊन जीवनाची उत्पत्ती झाली असावी, असा काही वैज्ञानिकांचा अंदाज आहे. दुसरे काही वैज्ञानिक मात्र सूक्ष्म सजीव प्रथम परग्रहावरून अथवा अंतराळातून उत्कापातासोबत अथवा धूमकेतूच्या शेपटीवर स्वार होऊन पृथ्वीवर आले व त्यांनीच येथे जीवनाचा विस्तार केला, असे मानतात. वैज्ञानिकांचा तिसरा गट असे मानतो की, तीन कोटी वर्षापूर्वी सूर्य सध्यापेक्षा कमी तेजस्वी असल्यामुळे पृथ्वीवर हिमयुग होते व शेकडो फूट जाडीचा बर्फाचा थर समुद्रावर पसरला होता. त्या थराखाली समुद्राच्या तळाशी जीवनिर्मितीला पोषक वातावरण व घटक असल्यामुळे तिथे प्रथम जीवनिर्मिती झाली असावी. इतरही काही वेगळ्या मान्यता आहेत.
सारांश, पृथ्वीवर सजीवसृष्टीचा प्रारंभ नेमका कसा व कोणत्या कारणाने झाला याबाबत वैज्ञानिकांचे एकमत नाही. मात्र आज अस्त्विात असलेल्या सर्व सजीवांचा आद्य पूर्वज एकच असावा याबाबतीत मात्र दुमत आढळून येत नाही. आपल्या सामान्य भाषेत असे म्हणू की किडय़ामुंग्यांसह आपण सर्व सजीवांमध्ये एकच प्राणतत्त्व प्रवाहित असतो.
विश्वाचा प्रारंभ एकाच बिंदूपासून!
निर्जीव पदार्थ (मॅटर) व विविध प्रकारच्या ऊर्जा (एनर्जी) मूलत: एकाच तत्त्वापासून विस्तारल्या आहेत ही बाब आता विज्ञानमान्य झाली असून या प्रचंड विश्वाचा प्रारंभदेखील एकाच बिंदूपासून झाला असावा, असाही अनेक मोठमोठय़ा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. कारण असे, की पृथ्वीवरून अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने अंतराळाचे निरीक्षण केले असता दिसणार्या सर्व आकाशगंगा (प्रत्येक आकाशगंगेत करोडो सूर्यमाला असतात.) पृथ्वीपासून सर्व दिशांनी दूर दूर जाताना दिसतात. एखाद्या फुग्यावर अगदी छोटय़ाछोटय़ा अनेक चकत्या चिकटवून त्या फुग्यात हवा भरू लागलो, तर त्या
फुग्यावरील सर्व चकत्या एकमेकांपासून दूर जातात. परंतु त्या चकत्यांचे आकार वाढत नाहीत. तसेच काहीसे घडत आहे. आकाशगंगांच्या दूर दूर जाण्याचा वेगदेखील शास्त्रज्ञांनी मोजला असून त्या वेगाची दिशा बघूनच त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, फार-फार पूर्वी म्हणजे विश्वाच्या आरंभी विश्वातील सर्व ग्रहतारे हे एकाच बिंदूमध्ये सामावले असावे व त्या बिंदूतून झालेल्या अतिप्रचंड स्फोटामुळे (बिगबॅंग) दशदिशांना ऊर्जा फेकली गेली. जिचे रूपांतर हळूहळू तारे व ग्रहगोलांमध्ये आणि विविध पदार्थामध्ये होत गेले. आपण ज्याला काळ (टाइम) व अवकाश (स्पेस) म्हणतो त्यांना विश्वारंभापूर्वी अस्तित्वच नव्हते ही कल्पना समजणे अवघडच आहे!
काळ आणि अवकाश यांनी बद्घ असलेल्या लांबी, रुंदी व उंची या त्रिमितीतच जाणवणार्या भौतिक विश्वाचाच एक क्षुद्रातिक्षुद्र घटक असलेला मनुष्यप्राणी त्या त्रिमितीपलीकडे व अवकाश-काळापलीकडे काही असून शकेल अशा शक्यतेच्या पातळीवरच सूट देऊ शकतो. परंतु ते पलीकडील अस्तित्व कसे असेल याबाबत कल्पना करण्यास तो असमर्थ ठरतो.
असो. परंतु महास्फोटाचा (बिगबॅंग) हा सिद्धान्त सर्वच वैज्ञानिकांना मान्य नाही. फ्रेड हॉईल व आपले डॉ. जयंत नारळीकर यांच्या संशोधनातील अनुमानानुसार दृश्य विश्व अनादिअनंत असून त्यातील काही भागात अधूनमधून स्फोट होत राहतात व पदार्थाचा नाश व नवनिर्मिती या क्रियाही घडत राहतात. त्यामुळे विश्वाचे संतुलन कायम राहते. सर्व आकाशगंगा (गॅलॅक्सीज) एकमेकांपासून वेगाने दूर जाताना आढळत असल्या तरी अधूनमधून विश्व थोडेबहुत आकुंचनही पावते व पुन्हा प्रसरणशील होते. मात्र अलीकडील काळात महास्फोटाच्या सिद्घान्तालाच वैज्ञानिक जगतात जास्त मान्यता मिळत असल्याचे आढळून येते.
विश्वनिर्मितीबाबत सध्या अंदाजाच्या स्वरूपातच असलेल्या वेगवेगळ्या सिद्धान्तांमध्ये काही मूलभूत गृहीतके मात्र समान आहेत. उदाहरणार्थ, प्रकाशापेक्षा अधिक वेग कोणत्याही पदार्थाचा असू शकत नाही व विश्वातील एकूण ऊर्जा नेहमीच कायम असते. ऊर्जा रूपांतरित होते; पण नष्ट होत नाही. मध्यंतरी वृत्तपत्रांत एक खळबळजनक बातमी प्रसिद्ध झाली, की प्रकाशापेक्षा अधिक वेगवान असलेला एक मूलकण वैज्ञानिक प्रयोगात आढळून आला. ही बातमी खरी असल्यास पदार्थविज्ञानशास्त्राला पुन्हा शीर्षासन करावे लागेल.
आतापावेतो वैज्ञानिकांना ही बाब स्पष्टपणे उमजली आहे, की या विश्वात करोडो आकाशगंगा (गॅलॅक्सीज) असून प्रत्येक आकाशगंगेत आपल्यासारख्या करोडो सूर्यमाला असू शकतात. आपल्या पृथ्वीवरून पाहिले असता प्रत्येक आकाशगंगा आपल्यापासून वेगाने दूर जात आहेत. त्यातही जी आकाशगंगा आपल्यापासून जितकी दूर तितका तिचा वेग जास्त. हे दृश्य फक्त पृथ्वीवरूनच अनुभवता येईल असे नव्हे. विश्वातील प्रत्येक जागेवरून पाहिले असता असेच आढळून येईल. म्हणजेच विश्व एखाद्या फुग्यासारखे प्रसरण पावत आहे व प्रसरणासोबतच अवकाश व काळाची नवनिर्मितीही करत आहे.
अवकाश (स्पेस) आणि काळ (टाइम) या परस्परांशी मुळीच संबंधित नसलेल्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे पूर्वी मानले जाई. परंतु महान प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी लांबी, रुंदी व उंची या अवकाशाच्या तीन मितींशी/आयामांशी (डायमेन्शन्स) घट्टपणे निगडित असलेली चौथी मिती म्हणजे काळ होय हे शोधून काढले. एकाच जागी उभे असलो तर आपण फक्त काळातून प्रवास करतच असतो. परंतु चालू लागताच आपण अवकाश-काळाच्या चौमितीतून प्रवास करू लागतो. आपण अतिशय वेगाने अवकाशातून प्रवास करू लागलो, तर अवकाश वाढल्यामुळे काळ लहान होतो म्हणजेच घडय़ाळ हळू चालू लागते. प्रकाशाचा वेग जवळपास 3 लक्ष कि.मी. प्रतिसेकंद इतका आहे. त्या वेगाच्या आसपास आपला वेग वाढल्यास काळ जणू स्तब्ध होतो. म्हणजे घडय़ाळ थांबून जाईल. दोन तरुण जुळ्या भावांपैकी एक जण जर अंतराळयानातून भ्रमण करून अनेक वर्षानी पृथ्वीवर परतला, तर त्याचे वय फारसे वाढलेले नसेल. पण पृथ्वीवरचा भाऊ मात्र तोपावेतो चक्क म्हातारा झाला असणार.
असे हे अवकाश-काळयुक्त चौमिती विश्व आरंभी केवळ लांबी-रुंदी-उंची नसलेल्या एका बिंदूत महाऊर्जेच्या रूपात सामावले होते अशी गंभीर मांडणी आता वैज्ञानिक करताहेत. विश्व शून्यातून निर्माण झाले असे विज्ञान म्हणू शकत नाही. कारण विश्वातली एकूण ऊर्जा ही अक्षय आहे म्हणजे तिचे रूपांतर दुसर्या ऊर्जेत अथवा पदार्थात होईल. परंतु ऊर्जेचा र्हास कधीच होत नसतो - हा विज्ञानाचा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. त्यामुळेच विश्वनिर्मितीपूर्वी हे आज असीम भासणारे संपूर्ण विश्व, त्यातील अब्जावधी ग्रहतार्यांसह महाप्रचंड ऊर्जेच्या स्वरूपात एकाच बिंदूमध्ये सामावले असणार आणि महास्फोटानंतर ती महाऊर्जा प्रकट होऊन अवकाश-काळाची निर्मिती करत प्रसरण पावू लागली. या महास्फोटाच्या वेळी जी अतिप्रचंड उष्णता निर्माण झाली असेल त्या उष्णतेमध्ये पदार्थाचे अणूसारखे घटक तयार होणे अशक्य होते. तापमान पुरेसे कमी झाल्यानंतर प्रोटॉन-न्यूट्रॉनयुक्त अणुगर्भाच्या रचना तयार झाल्यात व कालांतराने पदार्थमय वायुगोळे निर्माण होऊन तार्यांची सृष्टी झाली.
एक गमतीचा भाग असा, की शास्त्रज्ञांच्या मते, सृष्टिनिर्मितीच्या अगदी सुरुवातीस चारपेक्षा अधिक मिती (डायमेन्शन्स)मध्ये विश्व साकार होत गेले. परंतु लवकरच त्यापैकी बाकीच्या मिती (बहुतेक 6 किंवा 7) आपल्या चौमिती विश्वापासून वेगळ्या होऊन अतिसूक्ष्म आकारात आकुंचन पावल्या. दुसरी गंमत अशी, की प्रत्येक पदार्थ (मॅटर) कणासोबत त्याच्या विरुद्ध गुणधर्म असणारा परंतु समान वस्तुमानाचा दुसरा पदार्थकण (अँण्टिमॅटर)देखील सुरुवातीस निर्माण झाला. उदा. इलेक्ट्रॉन इतकेच वस्तुमान असलेला परंतु घन (पॉझिटिव्ह) विद्युतभार असलेला पॉझिट्रॉन नावाचा मूलकण. इलेक्ट्रॉनमध्ये ऋण (निगेटिव्ह) विद्युतभार असतो. मॅटर व अँण्टिमॅटर एकमेकांस नष्ट करू लागले. परंतु अंतिमत: मॅटरची मात्रा अँण्टिमॅटरपेक्षा किंचित जास्त होऊन पुढे मॅटरचाच फैलाव झाला. यावरून आपल्या पुराणकथांमधील देवदानव संघर्षाची कथा स्मरते. दानव देवांना भारी पडत होते. पुराणानुसार अशा वेळी देव महादेवांचा धावा करायचे आणि महादेवांना हस्तक्षेप करून दानवांची बाजू लंगडी करावी लागे. त्या सृष्टी आरंभकाळात दानवांची सरशी झाली असती, तर पृथ्वीचा विनाश निश्चित होता.
प्रश्न असा पडतो, की अँण्टिमॅटरपेक्षा मॅटर भारी ठरले. हे केवळ योगायोगाने, अपघाताने की, त्या महाऊर्जेच्या उदरात असलेल्या चैतन्याच्या संकल्पामुळे?
ब्रह्मंडाचा थक्क करणारा पसारा
असामान्य बुद्धिमत्ता, कल्पकता व अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने विश्वाच्या जडणघडणीचे, त्याच्या स्वरूपाचे व नियमांचे जे दर्शन वैज्ञानिकांना झाले त्यापैकी आपल्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत जितकी माहिती झिरपते, त्यावरून असे निश्चितच म्हणता येते की, ब्रह्मंडाचा हा पसारा थक्क करून सोडणारा आहे. सतत जळत राहून प्रचंड ऊर्जा प्रस्फुटित करत राहणारे सूर्यासारखे अब्जावधी तारे, त्या तार्यांच्या भोवती एका निश्चित गतीने व निश्चित कक्षेत फिरत असलेले ग्रह, त्या ग्रहांभोवती तसेच काटेकोर कक्षेत फिरत असलेले उपग्रह, या कोटी-कोटी सूर्याची, ग्रहांची व उपग्रहांची मिळून बनलेली एक आकाशगंगा, ज्यातील सर्व
सूर्यमाला एका केंद्राभोवती फिरत आहे; अशा अनेकानेक आकाशगंगांचे समूह जे सर्व मिळून पुन्हा एका तिसर्याच केंद्राभोवती फेर धरतात! शिवाय हे सर्व आकाशगंगाचे समूह त्याचवेळी एकमेकांपासून विलक्षण गतीने दूर-दूर जातच आहेत. हे सर्व सूर्य अब्जावधी तारे, ग्रह, उपग्रह करोडो वर्षापासून नियमबद्ध वागत आहेत.
शिवाय या ब्रह्मंडात मध्येच कुठेतरी प्रचंड कृष्णविवरेदेखील आहेत, जे त्यांच्या विशिष्ट कक्षेच्या आत शिरणार्या सूर्यमालांनाच नव्हे तर अख्ख्या आकाशगंगेला गिळून टाकतात. या कृष्णविवरांना (ब्लॅकहोल्स) आकार नसतो, परंतु लक्षावधी तार्यांचे वस्तुमान (मास) व ऊर्जा त्या विवरातील एकाच बिंदूत सामावलेली असते. त्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी वाढलेली असते की प्रकाशकिरणदेखील त्या विवरातून बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच ते कृष्णविवर आम्हाला दिसू शकत नाही.
काही वैज्ञानिकांच्या मते या कृष्णविवरांमध्ये ओढल्या जाणार्या वस्तू (वस्तू म्हणजे महाकाय तारे व त्यांचे ग्रह, उपग्रह) आतील भयानक उष्णतेने पूर्णत: वितळून त्यांचे पदार्थरूप नष्ट होऊन निव्वळ एकाच मूलभूत ऊर्जेत रूपांतरित झाल्यावर ती ऊर्जा आम्हाला सध्या माहीत नसलेल्या वेगळ्याच कोणत्यातरी विश्वाच्या किंवा आमच्याच विश्वातील वेगळय़ा ठिकाणी नवनिर्मितीसाठी उपयोगात आणली जात असावी.
जी कथा ब्रह्मंडाची तीच अणूची. प्रत्येक पदार्थातील सर्वात सूक्ष्म घटक म्हणजे अणू. तो आकाराने इतका सूक्ष्म असतो की एका केसाच्या टोकावर पाच लक्ष अणू मावतात! इतक्या सूक्ष्म पदार्थापेक्षा आणखी सूक्ष्म ते काय असणार? वैज्ञानिकांनी त्या अणूचेही अंतरंग शोधून काढलेच. ते तर आणखी थक्क करणारे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्व आहे. सूर्याभोवती जसे पृथ्वीसारखे ग्रह फिरत राहतात व मध्ये पोकळी असते तसेच अणूच्या पोटात मध्यभागी एक अतिसूक्ष्म असे केंद्र असते व त्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन नावाचे सूक्ष्म कण प्रचंड वेगाने फिरत असतात. हे गरगर फिरणारे इलेक्ट्रॉन आणि अणूचे केंद्र यांच्यामध्ये खूप मोठी पोकळी असते. केंद्रस्थानी प्रोटॉन व न्यूट्रॉन नावाचे इलेक्ट्रॉनपेक्षा खूप जास्त वस्तुमान असलेले सूक्ष्मकण असतात. अणूच्या आतली पोकळी किती मोठी असते? एखाद्या मोठय़ा सभागृहाच्या मध्यभागी एक माशी ठेवली तर त्या सभागृहाच्या आकाराच्या मानाने माशीचा आकार लक्षात घेऊन मधल्या पोकळीची जी कल्पना आपण करू, त्याच प्रमाणात अणूचा आकार व त्याचे केंद्र यांच्यातील पोकळी असते. म्हणजे आमच्या दृष्टीला व स्पर्शाला जे जे भरीव व ठोस भासणारे पदार्थ जाणवतात ते प्रत्यक्षात अतिशय विरविरीत व महापोकळ असतात. परंतु एखादे अनेक आरे असलेले चक्र वेगाने फिरत असले तर त्यातील आर्यांमधील पोकळी आपल्या नजरेस दिसत नाही. तसेच इलेक्ट्रॉन्सच्या प्रचंड गतिमान
फेर्यांमुळे आम्हाला पदार्थ ठोस वाटू लागतो.
अणुगर्भातील प्रोटॉन व न्यूट्रॉन हे सूक्ष्म कणदेखील अविभाज्य नसून तेसुद्धा क्वार्क नावाच्या अतिसूक्ष्म कणांपासून बनले आहेत. त्याशिवाय या अतिसूक्ष्म कणांना एकमेकांशी जोडून ठेवणारे 'फोर्स पार्टिकल्स' या जातीत मोडणारे आणखी वेगळेच अतिसूक्ष्म कण आहेत. अणूच्या आतली रचना अशाप्रकारे चक्रावून सोडणारी आहे.
एकापेक्षा अधिक अणू (अँटम) एकत्र येऊन रेणूची (मॉलिक्युल) रचना होते. जसे हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येऊन पाण्याचा रेणू तयार होतो. आता या रेणूचे गुणधर्म पुन्हा त्याच्या घटक अणूंच्या गुणधर्मांपेक्षा विपरीत असू शकतात. म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू ज्वलनशील असतात, पण पाणी मात्र पेटूच शकत नाही!
सर्व सजीवांचा आधार असलेले डीएनए रेणू त्या त्या सजीव प्राण्याच्या संभाव्य विकासाचा सर्व आराखडा बाळगून असतात. आपल्या देहाच्या प्रत्येक पेशीमध्ये हे डीएनए रेणू आहेत. ज्युरासिक पार्क या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एका डीएनए रेणूतून संपूर्ण प्राण्याची निर्मितीही करता येईल. देहाच्या प्रत्येक अवयवाचा रंग, रूप, आकार व अंतर्गत रचनेचा स्पष्ट आराखडा या अतिसूक्ष्म डीएनए
रेणूमध्ये कसा साठवला जातो? त्याच्या मदतीला धावपळ करणारे 'निरोप्ये' आरएनए नावांचे रेणू असतात. ते सुजाण असतात काय? प्रत्येक जीवपेशीतील डीएनए रेणू हे त्या त्या पेशीचे आर्किटेक्ट, इंजिनिअर, गवंडी, डॉक्टर, नर्स, आई वगैरे सर्व ऑल-इन-वन असतात.
एका जीवपेशीच्या उदरात दुसरी जीवपेशी सुखाने नांदू लागल्यावर मोठय़ा आकारांचे सजीव निर्माण झाले. कोटी-कोटी पेशी (सेल्स) एकत्र येऊन देहरचना करतात. देहाच्या प्रत्येक अवयवाची रचना वेगळी, कार्यही वेगळे. देहातील लक्षावधी पेशी दरक्षणी नष्ट होतात, त्यांची जागा नवनिर्मित पेशी घेत राहतात आणि तरीही त्या देहाचे जीवन अखंड सुरू राहते. गळून पडणार्या पेशींपेक्षा नवनिर्मित पेशींची संख्या कमी होत गेली की वार्धक्य व मृत्यूकडे वाटचाल सुरू होते., परंतु मृत्यूपूर्वी स्वत:सारखा दुसरा देह निर्माण करूनच सहसा प्रत्येक प्राणी-जीवनाचा अंत होतो.
ही सर्व एकाचवेळी महाविराट व अतिसूक्ष्म, गुंतागुंतीची पण नियमबद्ध रचना काय दर्शविते? आणि पृथ्वीवर सजीवांच्या उत्क्रांतीसोबत विकसित होत गेलेली ती असतेपणाची जाणीव, त्या जाणिवेला
फुटलेले वासनांचे, विकारांचे, बुद्धीचे, विचारांचे, कल्पनांचे, प्रतिभेचे धुमारे-ते कशासाठी?
जीवनाचा खरंच काही हेतू आहे?
आपण कोण आहोत? आपल्याला दिसणार्या, जाणवणार्या सृष्टीपलीकडे आणखी काही अस्तित्वात आहे का? सृष्टीच्या निर्मितीला काही प्रयोजन आहे का? या जन्मापूर्वी आपण अस्तित्वात होतो का? मृत्यूनंतर आपण पूर्णपणे संपणार की काही आपला अंश शिल्लक राहणार? सृष्टीचा कोणी निर्माता आहे की ती नुसतीच प्रयोजनशून्य अनादि-अनंत अपघातांच्या व योगायोगांच्या मालिकेतून साकारत चाललेली स्वयंभू जड ऊर्जा आहे? आपले शरीर, अंत:करण, बुद्धी, ज्ञानेंद्रिये, संवेदना, इच्छा, भय, विकार, वासना, विचार या सर्वाचा समुच्चय म्हणजे आपण आहोत, की या समुच्चयापेक्षाही वेगळे असे आपले 'स्वत्व' आहे? आपला व सृष्टीचा निर्माता जर कोणी खरंच असला, तर तो कुठे असतो? कसा दिसतो? काय करतो? त्या निर्मात्याचा निर्माता कोण? आणि निर्मितीचा उद्देश काय? या निर्मितीवर निर्मात्याचे नियंत्रण आहे, की ती केवळ भौतिक नियमांनी बांधलेली स्वयंचलित यंत्रणा आहे? जीवनाचा हेतू काय? खरंच जीवनाला काही हेतू आहे, की ही सर्व एक निर्हेतुक, उद्देश्यविहीन, प्रयोजनशून्य गतिमानता आहे?
सर्व मानवांना नव्हे, परंतु भिन्न-भिन्न संस्कृतींमधील परस्परांना सर्वस्वी अनोळखी असलेल्या व वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या असंख्य मानवांना वरील प्रकारच्या प्रश्नांनी सतत भेडसावलेले आहे.
सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याचा प्राचीन काळापासून मानवाने जो प्रयत्न चालविला, त्यातून एक गोष्ट तर निर्विवाद सिद्ध झाली आहे की, पदार्थाच्या व ऊर्जेच्या अंतरंगापर्यंत पोहोचून, जड सृष्टीतील अनेकानेक नियम जाणून घेऊन व त्या नियमांचाच वापर करीत मानवाने आपल्या भोवतालच्या सृष्टीवर बरेचसे नियंत्रण प्राप्त केले आहे. म्हणजे आज आपल्याला जे काही नैसर्गिक पदार्थ दिसतात व वीज, उजेड, चुंबक यासारख्या विविध ऊर्जा जाणवतात, त्या सर्वाची निर्मिती हेतुपूर्वक झाली असो वा योगायोगाने अनेक अपघातांच्या मालिकेतून झालेली असो, ते सर्व पदार्थ व ऊर्जेची ती विविध रूपे काही कठोर नियमांनी बांधलेली आहेत. ते नियम समजून घेतल्यास त्या पदार्थाना वा बहुरूपी ऊर्जेला काही प्रमाणात मानव आपल्या नियंत्रणात आणू शकतो.अगदी मुळाशी जाऊन पाहिले तर पदार्थ आणि ऊर्जा या दोन वेगळ्या वस्तू नसून मूलत: एकच वस्तू आहे, असेही आता विज्ञानाने शोधले आहे. प्रकाशाचे उष्णतेत, विजेत, ध्वनीत वगैरे रूपांतर तर होतेच. विद्युत-चुंबकीय बल, परमाणूमध्ये इलेक्ट्रॉन्सना धरून ठेवणारे क्षीण बल, अणुगर्भातील प्रोटॉन, न्यूट्रॉन इ. मूलकणांना धरून ठेवणारे भारी बल व गुरुत्वाकर्षण अशी चार प्रकारची ऊर्जेची रूपे वैज्ञानिकांना सध्या तरी दिसतात. या चार बलांचे एकमेकांत रूपांतर होत असते काय व होत असल्यास ती एकमेव मूळ ऊर्जा कोणती, हे बहुधा लवकरच कळेल. पदार्थाच्याही अंतरंगात शोध घेतल्यावर परमाणूच्या पोटातील मूलकणांची यादी झाली असून त्या मूलकणांची वर्तणूक कधी पदार्थासारखी तर कधी ऊर्जेसारखी असल्याचे आढळून आले आहे. एक मजेशीर बाब म्हणजे परमाणूच्या अंतरंगातील व सृष्टीतील दूरवरच्या अंतराळातील पदार्थाच्या हालचाली बहुधा कठोर नियमांनी बांधलेल्या नसून त्यात काही अनिश्चितता व गोंधळही जाणवतो (आपल्याला परिचित असलेल्या ढोबळ पदार्थाच्या तुलनेत), असेही वैज्ञानिकांना वाटते.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाने कमालीची झेप घेतली असून सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य शोधून काढण्यासाठी आता वैज्ञानिक प्रचंड महागडे प्रयोग करत आहेत. एकीकडे परमाणूच्या अंतरंगात तर दुसरीकडे अथांग अंतराळात चाललेल्या संशोधनाने दूरसंचार क्षेत्रामध्ये घडवून आणलेल्या अभूतपूर्व क्रांतीचा लाभ सामान्य माणसाच्या पदरात मागील दोन-तीन दशकांपासून पडू लागलाय. याचे ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, अतिप्रगत रंगीत टी.व्ही. संच, संगणक, इंटरनेट या गोष्टी आता सामान्यांच्या आवाक्यात आल्या. त्यांची कल्पनादेखील 40-50 वर्षापूर्वी करणे अशक्य होते.
अचेतन सृष्टीसोबतच सचेतन सृष्टीचा म्हणजेच जीवनाचाही शोध मानव विविध पद्धतींनी घेत राहतो. अचेतन पदार्थ व सचेतन जीव यांच्या सीमारेषेवर नक्की काय घडले हे जाणून घेण्याची विज्ञानाची उत्कंठा कायम आहे. जीवनाला धारण करण्याची क्षमता असणारी एक किमान संरचना पदार्थात निर्माण झाल्यावरच त्यातून जीवन प्रस्फुटित झाले हे निश्चित! पण मग जीवनाची संभावना निर्जीवामध्ये प्रारंभापासून होती, फक्त योग्य ती रचना साकारण्यात वेळ गेला असे मानावे लागेल. नाही तर पदार्थाची धारणक्षमता तयार झाल्यानंतर त्यात प्राण एका वेगळ्या पातळीवरून अवतरला व नंतर विविध रचना व आकारांच्या माध्यमातून विकसित होत गेला, असे तरी मानावे लागेल.
जीवसृष्टीच्या उत्क्रांतीक्रमात काही जीवांमध्येच मन व बुद्धीचा विकास होत गेला व त्या विकासाने सध्या गाठलेले शिखर म्हणजे मनुष्यप्राणी होय, असे दिसून येते; परंतु मानवाची निर्मिती हा पृथ्वीवरील उत्क्रांतीचा अंतिम टप्पा आहे काय? की आज आम्हाला अज्ञात असलेल्या चेतनेच्या उच्चतर पातळ्यांना धारण करू शकणारा अथवा स्वत:तून प्रगट करू शकणारा नवा 'प्राणी' उत्क्रांतीक्रमात जन्माला येईल, जो मानवापेक्षा अधिक विकसित जीव सिद्ध होईल? विज्ञानाच्या दृष्टीतून पाहिले असता अतिसूक्ष्म जीवाणूंपासून मानवापर्यंत जीवनाची उत्क्रांती टप्प्याटप्प्याने होत गेल्याचे समजते. आता तर जैवपूर्व (प्रि-बायोटिक) म्हणजे सजीव पेशी प्रथम निर्माण होण्यापूर्वी निर्जीव पदार्थात जी उत्क्रांतीची प्रक्रिया घडली असेल तिचाही अभ्यास पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व जीवशास्त्राच्या आधारे होत आहे. त्या अभ्यासात बरीच प्रगतीही झाल्याचे समजते.; परंतु प्रत्यक्षात निर्जीव पदार्थातून प्राण नेमका कसा प्रगटला व प्राणी जीवनात आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) मनुष्य पातळीवर कसे प्रगटले, या टप्प्याबाबत विज्ञान अजूनही चाचपडत असून केवळ अंदाज व्यक्त होतोय. असो. मात्र प्राण आणि बुद्धी व अंत:करण यांना देहाशिवाय वेगळे अस्तित्व नाही असे मानले व देहाच्या उत्क्रांतीतूनच ते प्रगटले असे गृहीत धरले तर आणखी एक बाब गृहीत धरणे भाग पडते. ती म्हणजे प्राण, जीवन, अंत:करण, बुद्धी, कल्पनाशक्ती, विचारक्षमता, वासना, भावभावना, प्रतिभा या सर्व बाबी निर्जीवांच्या ठायीदेखील बीजरूपाने असणारच! कारण बीजरूपाने मुळात अस्तित्वात असलेली संभावनाच उत्क्रांतीक्रमात प्रगटू शकते.
Subscribe to:
Comments (Atom)