Tuesday, February 26, 2013
मानवजातीच्या प्रकृतीचेच दिव्य रूपांतरण व्हायला हवे
भौतिकवादी असोत वा अध्यात्मवादी, आत्म्या-परमात्म्याचे अस्तित्व नाकारणारे असोत वा तशा अस्तित्वावर श्रद्धा असणारे असोत, ज्या ज्या व्यक्तींना जीवनाविषयी आस्था आहे आणि संकुचित स्वार्थापलीकडे समाजाच्या भल्याचा जे विचार करतात, अशा सर्वाना मानवाची सर्वागीण उन्नती कशी साधता येईल, याबाबत समान चिंता असते. प्रत्येक मानवात सुप्त क्षमता दडलेल्या असतात; त्या क्षमता व्यक्तिगणिक वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्येक व्यक्तीला स्वत:मधील क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळावी, त्यासाठी आवश्यक ते स्वातंर्त्य आणि पोषक वातावरण मिळावे, परंतु एकाच्या क्षमतांचा विकास हा दुसर्यांच्या विकासाला बाधक ठरू नये, तर पूरकच ठरावा. मानवी व्यक्तित्वातील ज्या क्षमतांचा विकास हा इतर मानवांना अथवा जीवसृष्टीला दडपणारा व घातक ठरत असेल, त्या क्षमतांना आपण पाशवी अथवा आसुरी मानू व अशा पाशवी, आसुरी इच्छा-आकांक्षांना समाजात व मानवाच्या मनात थारा न मिळावा यासाठी कोणती उपाययोजना करता येईल, याबाबत सर्व प्रकारचे समाजचिंतक विचार करीत असतात.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजातील अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, कुटुंबव्यवस्था इ. सामाजिक रचना या व्यक्तींच्या वागणुकीवर, विचार करण्याच्या पद्धतीवर व भावभावनांवरदेखील सतत परिणामकारक नियंत्रण करत असतात; त्यामुळे या व्यवस्था बदलणे अधिक महत्त्वाचे आहे व सामाजिक रचना बदलल्या, तर व्यक्ती आपोआप बदलतील किंवा व्यक्तींमधील बदल अधिक सुलभ होतील अशा प्रकारे चिंतन करणार्यांना आपण ढोबळमानाने 'समाजवादी' विचारक म्हणू. या विचारसरणीमध्ये निश्चितच तथ्य आहे, परंतु समाजव्यवस्था काही आपोआप बदलत नाही. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उत्पादन साधनामध्ये वेळोवेळी बदल होतात. या बदलांना पचविण्याची क्षमता प्रचलित अर्थ, राज्य, कुटुंबव्यवस्थेत नसल्यास त्या सर्व व्यवस्थादेखील बदलण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. मात्र या व्यवस्था बदलविण्यासाठी काही व्यक्तींनाच पुढाकार घ्यावा लागतो व संघटित प्रयत्न करावे लागतात. ही जी समाजपरिवर्तनासाठी संघटित होणारी व पुढाकार घेणारी माणसं आहेत, त्यांना तरी स्वत:मधील पाशवी, आसुरी वृत्तींचा त्याग करावा लागेलच, अन्यथा त्यांनी बदलविलेल्या सामाजिक, आर्थिक, राज्यव्यवस्थेतही वेगळ्या प्रकारे, जुन्याच पाशवी, आसुरी वृत्तींचे प्राबल्य वाढत जाऊन अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही.
आम्ही जेव्हा सर्व दोषांचे खापर समाजव्यवस्थेवर फोडतो, तेव्हा आमचे स्वत:कडे लक्षच नसते. मानवी स्वभावच असा आहे की, स्वत:मधील उणिवांकडे, दोषांकडे आपले कमी लक्ष असते व इतरांमधील उणिवा, दोष आपल्याला लवकर जाणवतात. अगदी लहानपणीदेखील मी व माझ्या भावाने जर सारख्याच निष्काळजीपणे एखादी वस्तू हाताळली असेल तर 'माझ्या हातून कप पडला' आणि 'त्याने कप फोडला' असे उत्स्फूर्त स्पष्टीकरण आपण आईबापांना देत असतो. म्हणजे माझा दोष काहीच नसून माझ्या हातातून एक चूक घडली आहे; पण भाऊ मात्र दोषी आहे! आज सर्व टीव्ही चॅनल्सवर चालणार्या चर्चा, वृत्तपत्रीय लेख, ठिकठिकाणी होत असलेल्या लोकांच्या गप्पा सर्वत्र दुसर्यांना अथवा व्यवस्थेला दोष देण्याची स्पर्धा कोलाहल निर्माण करीत आहे. स्वत:खेरीज इतर सर्वाच्या हेतूबद्दल शंका घेत राहण्याची वृत्तीदेखील झपाटय़ाने पसरत आहे.
प्राणिमात्रांच्या ठिकाणी जगत राहण्याची व स्वत:ची प्रजाती वाढविण्याची मूलभूत प्रेरणा नैसर्गिक व बलवान असल्याचे आपण या आधीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. माझ्या जगण्यासोबत मला माझे कुटुंब, जाती, धर्म, प्रांत व देशाच्याही जगण्याचे उतरत्या क्रमाने मोल वाटते. माझे कुटुंब मला जगू देत नसेल, तर स्वत:च्या कुटुंबासोबत संघर्ष करून मी जगत राहील. तसेच इतर जाती, धर्म, प्रांत व देशांच्या बाबतीतही म्हणता येईल, हे सर्व स्वाभाविक आहे.
परंतु माझ्या जीवनासाठी मला इतरांना फसविणे, लुबाडणे, दडपणे वा नष्ट करणे आवश्यक व योग्य वाटत असेल, तर ती माझ्यातली 'आसुरी' वृत्ती आहे आणि अशी आसुरी वृत्ती माझ्या स्वत:च्याच सर्वागीण उन्नतीला बाधक ठरते. शिवाय या वृत्तीमुळे समाजव्यवस्थादेखील सतत अशांत, अस्थिर व स्फोटक राहते. याउलट सर्वाचे भले व्हावे, सर्वाची उन्नती व्हावी अशी जी इच्छा आपल्या मनात कधीकधी डोकावते, तिला आपल्यातला उन्नत, विकसित व दिव्य अंश म्हणता येईल. या दिव्यत्वाचा विकास सर्व मानवांमध्ये होण्यासाठी आर्थिक, राजकीय, सामाजिक रचनांमध्येही सुयोग्य मूलभूत परिवर्तन घडवून आणता येईल. परंतु हे परिवर्तन करू इच्छिणार्या व्यक्तींना स्वत:मधील दिव्यत्वाचा विकास करण्याकडेदेखील प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे लागेल.
पृथ्वीवरील प्राणिसृष्टीच्या व मानवजातीच्या जीवनाच्या विकासासाठी भय, क्रोध, मोह, मत्सर यांसारख्या विकारांची आणि हिंसक व आक्रमक मनोवृत्तीची याआधीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर गरजही असावी. म्हणूनच ते विकार वारशाने आपल्याला मिळाले आहेत. परंतु उत्क्रांतीच्या यापुढील टप्प्यांना गाठण्यासाठी हे विकार पोषक ठरणार नसून अडथळे ठरू शकतील. अशा विकारांना मानवी मनातून कसे नष्ट करता येईल व मनाची उन्नत अवस्था सहज व नित्याची कशी साधता येईल, हा मोठा प्रश्न आहे. शिक्षण, संस्कार व योग्य आर्थिक, राजकीय व्यवस्थेचे पर्यावरण लाभल्यास असे विकास दूर होऊ शकतील, अशी समाजवादी विचारवंतांना आशा वाटते. उलटपक्षी विकार हे नैसर्गिकच असल्यामुळे ते नष्ट होणे शक्य नाही. कायद्याचे व समाजाचे दडपण व्यक्तीवर असले, तरच ते विकार काबूत राहतील; दाबून ठेवता येतील अशीही एक विचारधारा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभवी साधकांच्या मते विकारांना वारंवार दूर सारावे लागते; ते पुन:पुन्हा डोके वर काढतच असतात; म्हणून चित्तशुद्धीची साधना आध्यात्मिक साधकाला सततच करावी लागते.
श्री अरविंद असे म्हणतात की, ''विकारांना दाबून ठेवणे अथवा विकारांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करणे (म्हणजे विकारांचे जे विषय असतात, त्यांच्यापासून लांब अंतरावर राहणे)'' या पद्धतींमुळे विकार नष्ट होणार नाहीत. ते साधकाच्या अवचेतन मनात दडून राहतील व संधी मिळताच उफाळून वर येतील. आमच्या प्रकृतीचे असे रूपांतरण आवश्यक आहे की, ज्यामुळे विनाशक, विद्रूप विकारांना अवचेतनेमध्येदेखील थारा मिळणार नाही. आणि असे रूपांतरण एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये होऊन भागणार नाही. कारण मानवजातीच्या सामुदायिक अवचेतनेतून त्या विकारांना दूर सारावयाचे असल्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या प्रकृतीचेच दिव्य रूपांतरण व्हायला हवे. म्हणूनच व्यक्तिगत सिद्धी वा मोक्षासाठी आध्यात्मिक साधना करणे इष्ट नसून ती सर्वासाठी केल्यानेच फलदायी ठरेल.
(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
Subscribe to:
Comments (Atom)